Thursday, 24 January 2019

जिल्हा परिषद कर्मचारी ‘सिंबा’ डान्सवर थिरकले


नगर । प्रतिनिधी - नगर जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित सभेवेळी लोकप्रतिनिधींकडून अधिकार्‍यांवर होणारी प्रश्नांची सरबत्ती सर्वांनाच परिचयाची आहे. लोकहिताचे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक प्रशासनाकडून करून घेण्याचे काम याच सभागृहातून होते. याच सभागृहात जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांचा थक्क करणारा कलाविष्कार नुकताच पहायला मिळाला. सध्या शाळा महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलनाची रेलचेल आहे. तसाच आनंद घेत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे कर्मचारी सिंबा डान्सवर पंधरा मिनिटे थरकले. या डान्सला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. 
जिल्हा परिषद आदर्श कर्मचारी पुरस्कार सोहळ्यानिमित्त झालेल्या कर्मचार्‍यांसाठीच्या सांस्कृतिक स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला. या सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी कविता, नाटिका, प्रबोधनात्मक संदेश देणारे कार्यक्रम, स्वच्छता अभियान यावर उदबोधक कार्यक्रम सादर करतानाच स्वत:मधील कलागुणांना मुक्तपणे सर्वांसमोर सादर केले. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करणार्‍या महिला कर्मचार्‍यांचा उत्साह तसेच अतिशय उत्साहात थेट सिंबा डान्स सादर करणारे कर्मचारी यात पहायला मिळाले. 
‘देवाक काळजी रे, ‘विठ्ठल नामाचा रे टाहो..’ या भक्तीगीतांबरोबरच ‘देश रंगिला रे’, ‘संदेसे आते है’ अशी देशभक्तीपर गाणीही स्पर्धकांनी सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात ‘मेंदीच्या पानावर’, ‘खुदाभी आसमा से जब जमीं पर देखता होगा’ अशा गाण्यांनी आणखी रंगत आणली. गझल गायन, तबला वादनही अनेकांनी सादर केला. 
‘शाळंच्या दारात कोण गं उभी...शिक्षणासाठी पहिलं पाउल शाळेत मी टाकलं गं..गुरूजी छडी नका मारूजी... लागतंय हातावरी.. या वेगळ्या धर्तीवरील गीताच्या सादरीकरणातून शिक्षणाचे महत्त्व विशद करणारा कार्यक्रमही एका स्पर्धकाने सादर केला.
सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, रोजच्या जीवनात कोणी कोणतेही काम करीत असला तरी प्रत्येकात काही ना काही कलागुण असतात. दैनंदिन व्यापामुळे त्याला आपल्या आवडत्या छंदासाठी, कलेसाठी वेळ देता येत नाही. नगर जिल्हा परिषदेत तब्बल साडेसोळा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेसाठी आवाहन करण्यात आले तेव्हा अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात प्रत्येकाने उत्साहात सहभाग नोंदवत आपले कलागुण सादर केले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment