नगर । प्रतिनिधी - येथील प. पू. सद्गुरू श्रीरामकृष्ण स्वामी महाराजांच्या श्री दत्तक्षेत्रमध्ये शृंगेरी पीठाधीश्वर जगदगुरू शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखरभारती स्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात सुरू असलेल्या सोहळ्यात वेणुगंधर्व पं. केशव गिंडे यांनी केलेल्या वेणुवादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
देवस्थानचे विश्वस्त मोहन शुक्ल यांनी पं. गिंडे यांचा परिचय करून दिला. विश्वस्त देवराज काशीकर यांच्या हस्ते पं. गिंडे यांना गौरविण्यात आले. त्यांना तबल्याची साथ करणारे नंदकिशोर तिवारी व बासरीची साथ करणारे जितेंद्र रोकडे यांचाही सन्मान काशीकर यांच्या हस्ते करण्यात आला. विश्वस्त सुधीर माळी यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
पं. गिंडे यांनी वातापी गणपती भजे हम, या हंसध्वनी रागातील मध्यलयीच्या तीन तालातील संस्कृत भजनाने मैफिलीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर रूपक तालातील भटीयाली धून असलेले बाऊलगीत (बंगाली गीत) झाले. या गीतातील जीव-शिवाच्या भेटीतील व्याकुळता उपस्थितांना अधिक भावली. भीमपलास रागातील इंद्रायणी काठी देवाची आळंदी, या भजनावर अनेकांनी ठेका धरला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची, या पहाडी रागातील गीतप्रसंगी वेणुचे विविध प्रकारातील वादन झाले. गोड तुझी बासरी श्रीहरी, या भैरवीने संगीतसेवेची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये नंदकिशोर तिवारी यांनी श्रीमद् भागवतकथा निरूपणात दुर्लक्षित राहणारा भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा भाग पं. गिंडे हे नेमकेपणाने रसिकांच्या पुढ्यात ठेवून समाधीची भावावस्था अनुभवावयास प्रवृत्त करत असल्याकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे संगीतसेवा संपल्यावर अनेक जिज्ञासूंनी पं. गिंडे यांची भेट घेऊन वेणुमुळे लाभणारा समाधीसुखाचा सोहळा याच श्रीदत्तक्षेत्रमध्ये आम्हाला अनुभवता यावा, याकरिता खास येणे व्हावे म्हणून आम्ही देवस्थानकडे आपल्या कार्यक्रमाचा आग्रह धरू, असे सांगितले. बासरीवर वेदकालापासूनचा अभ्यास केलेल्या संशोधकवृत्तीच्या पं. गिंडे यांचे वेणुवादन महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांची वाहवा मिळवणारे ठरले.
No comments:
Post a Comment