Monday, 28 January 2019

जैन तत्त्वज्ञानात जगाला सुखसमृद्ध करण्याची ताकद


नगर । प्रतिनिधी - आज संपूर्ण जग अनेक समस्यांनी वेढलेले आहे. हिंसा, दुराचार, अत्याचार, पराकोटीचा व्देष वाढत आहे. अशावेळी संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा मंत्र देवून जगात खर्‍या अर्थाने सुखसमृध्दी व शांतता आणण्याची ताकद जैन धर्माच्या महान तत्त्वज्ञानात आहे. दिव्यशक्ती व ज्ञानाने परिपूर्ण अशा जैन धर्माची गौरवशाली परंपरा जतन करण्यासाठी समस्त जैन बांधवांनी एकजुटीने कायम प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन गणिवर्य नयपद्मसागरजी म.सा. यांनी केले.
नगरमध्ये आलेल्या पूज्य नयपद्मसागरजी म.सा.यांचे माणिकनगर येथील श्री वासूपूज्यस्वामी जैन मंदिरात दोन दिवस प्रवचन झाले. ’विश्व के बदलते के समीकरण और जैन धर्म’ या विषयावर सलग दोन दिवस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांच्यासमवेत जैन इंटरनॅशनल वुमन्स ऑर्गनायझेशन संस्थेच्या पूज्य साध्वीजी मयणाश्रीजी म.सा.उपस्थित होत्या. या दोनही प्रवचनांना नगरमधील जैन समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती.  गुरुदेव नयपद्मसागरजी म्हणाले की, हजारो वर्षांचा जैन धर्म आपल्या विशिष्ट तत्त्वज्ञानासाठी नावाजला जातो. जगभरातील भिन्न संस्कृतींवर या धर्माच्या तत्त्वांचा प्रभाव पहायला मिळतो. नगरच्या भूमीलाही जैन धर्मात विशेष महत्त्व आहे कारण ही भूमी जैनांचे महान तपस्वी आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. जैन धर्म हा जगाला मार्ग दर्शवणारा, अहिंसेचा विचार मांडणारा धर्म आहे. आजच्या आधुनिक जगात प्रत्येकाला अनेक आव्हानांना सामोर जावे लागत आहे. अशावेळी जैन धर्मियांनी आपली श्रध्दा कायम ठेवून स्वत:बरोबरच आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. या दोन दिवसीय विशेष प्रवचनानिमित्त सौरभ बोरा यांच्यावतीने नवकारशीची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवचनाची संपूर्ण नियोजन व्यवस्था श्री संभवनाथ जैन मंदिर, कापडबाजार, श्री वासूपूज्यस्वामी जैन मंदिर माणिकनगर व सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment