Wednesday, 30 January 2019

पोलिस अधिकार्‍यांनी पैसे घेऊन माझ्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला : अनिल राठोड


नगर । प्रतिनिधी - माझ्यावर राजकीय गुन्हे आहेत, अत्याचार, खंडणी किंवा जीवे मारण्याचा एकही गुन्हा दाखल नाही. केडगाव खून प्रकरणातील आरोपी दहा महिन्यांपासून मोकाट फिरतात. त्यांना येथील पोलिस अधिकारी अटक करीत नाहीत किंवा त्यांचा तडीपारीचा प्रस्तावही तयार करीत नाहीत. कारण ते पोलिसांना पैसे देतात. आम्ही एकही रूपयाही पोलिसांना देत नाही. पोलिसांनीच समोरील पार्टीकडून पैसे घेऊन माझ्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. शहरातील व जिल्ह्यातील पोलिस यंत्रणाच पूर्णपणे भ्रष्ट असल्याचा आरोप शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला. 
पोलिस प्रशासनाने राठोड यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस यंत्रणेवरच आक्षेप घेतला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक गणेश कवडे, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. 
राठोड म्हणाले की, केडगाव खून प्रकरण झाल्यानंतर पोलिसांवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. मला नोटीस पाठविण्यात आली होती. त्या नोटिशीला मी उत्तर दिले आहे. परंतु पोलिस यंत्रणा पूर्णपणे पैसे घेऊन काम करीत असल्याने त्यांनी सेना टार्गेट केली आहे. मला तसेच शिवसेना संपविण्याचा त्यांनी डाव आखला आहे. मला नोटीस दिल्यानंतर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते घाबरतील असा त्यांचा समज आहे. परंतु जसा नेता तसाच कार्यकर्ता ही ओळख शिवसेनेची आहे हे त्यांनी विसरू नये. सेना ही कोणाच्या ताकदीवर उभी नाही. माझा शिवसैनिक हीच माझी ताकद आहे. या तडीपारीच्या प्रस्तावामुळे माझी जी मानहानी  झाली आहे त्यासंदर्भात मी न्यायालयातही जाणार आहे. 
गणपती उत्सवाच्या दरम्यान सेनेचाच मंडप त्या नायर या अधिकार्‍याने पाडला होता. त्यांची नगरविकास विभागाकडून नियुक्ती झालेली नव्हती. जिल्हाधिकार्‍यांनीही त्यांना नेमलेले नव्हते. दंगल व्हावी म्हणून अधिकार्‍यांनी सेनेचा मंडप पाडला होता. परंतु त्या परिस्थितीत सेना अतिशय शांत पद्धतीने वागली. सेनेला त्रास देण्यासाठीच तो अधिकारीच मुद्दामहून या ठिकाणी आणला होता असा आरोप राठोड यांनी यावेळी केला. तडीपारीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment