नगर । प्रतिनिधी - प्रेम, शांती व एकात्मतेचा संदेश जेथून दिला जाईल, जेथे अनेकतेत एकता, विश्वबंधुत्व आणि मानवतेचे साकार चित्र प्रस्तुत होतील असा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा, राज्यस्तरीय तीनदिवसीय 52 वा वार्षिक निरंकारी संत समागम सोहळा शुक्रवार दि.25 ते 27 जानेवारी या कालावधीत सिडको मैदान, खारघर, नवीमुंबई येथे निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आयोजित करण्यात आला आहे.
या संत समागमात देश विदेशातील लाखो भाविक-भक्तगण सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून तसेच नगरसह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक समागम सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे मंडळाचे सेवादल संचालक आनंद कृष्णानी यांनी सांगितले. शुक्रवार दि.25 ते 27 जानेवारीपर्यंत चालणार्या संत समागमात तिन्ही दिवस दुपारी 2 ते 8.30 या वेळेत सत्संगचा कार्यक्रम होईल व शेवटी सद्गुरु माताजींचे मार्गदर्शनपर प्रवचने होतील. समागमाचा दुसर्या दिवशी (शनिवारी) सकाळी निरंकारी सेवादलच्या महिला व पुरुष स्वंयसेवकांची रॅली होईल. यात शारीरिक कवायती, मार्चिंग, प्रार्थना व सेवेविषयी प्रेरणादायी लघुनाटिका सादर करतील.
सोमवार दि.28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता समागम स्थळी आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 100 हून अधिक जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.समागम स्थळी मिशनचा इतिहास, विचारधारा, संदेश, सामाजिक उपक्रम तसेच सद्गुरूंच्या देशविदेशातील कल्याणयात्रांची सचित्र माहिती दर्शविणारी भव्य निरंकारी प्रदर्शनी मांडण्यात आली असून सोबतच बाल प्रदर्शनी, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनची प्रदर्शनी, प्रकाशन स्टॉल्स, कॅन्टीन्स, लंगर, दवाखाने इत्यादी अनेक प्रकारची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अहमदनगर क्षेत्राचे विभागीय प्रमुख हरीश खुबचंदानी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment