Tuesday, 22 January 2019

नगरच्या सावकारकीचे लोन औरंगाबादपर्यंत


नगर । प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड या शहरात नगरच्या सावकारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका ठेकेदाराने गळफास घेऊन कन्नडच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून त्यात नगरच्या एका सावकाराचा समावेश आहे. त्याला कन्नडच्या पोलिसांनी अटक केली आहे.  या घटनेने नगरच्या सावकारकीचे लोन थेट औरंगाबादपर्यंत पसरले असल्याचे सिध्द होत आहे. 
विष्णू किसन कळागते (रा.केडगाव, नगर) हा केडगावचा सावकार असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  
सविस्तर माहिती अशी की, कन्नड पोलिसांनी सांगितल्यानुसार कन्नड शहरातील एका हॉटेलमध्ये भाऊसाहेब घुगे या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात बुधवारी सकाळी 8 वाजता घडली. त्यावेळी त्या हॉटेलच्या खोलीतील टेबलवर सुसाईड नोट आढळून आली. त्यात विष्णू कळागते, अशोक पानकडे, सुभाष भारूका, संदेश भारूका हे पैशांसाठी त्रास देत असून, पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. 
या प्रकरणी मयताचा भाऊ सुरेश घुगे यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी कन्नड पोलिसांनी विष्णू कळागते, अशोक पानकडे, संदेश भारूका या तिघांना अटक केली असून सुभाष भारूका याचा पोलीस तपास करीत आहेत. 
नगर शहर व जिल्ह्यात वर्षभरात सावकारकीच्या पैशाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. ओम उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब पवार यांची आत्महत्याही सावकारकीतून झाली होती. त्यामुळे शहरातील अनधिकृत सावकारीचे बिंग फुटले होते. अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागले होते. त्यानंतर संगमनेर, नगर तालुका व पारनेरमध्येही सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची गुन्हा दाखल आहेत. 
नगरच्या सावकारकीचे लोन थेट औरंगाबादपर्यंत पसरले असल्याचे या घटनेतून पुढे येत आहे. अशा बेकायदा सावकारीमुळे अनेकांचा बळी जात असून त्याविरूध्द कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment