Tuesday, 22 January 2019

कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी मंत्रालयावर नेणार पायी मोर्चा


नगर । प्रतिनिधी - राज्य शासनाविरूध्द वीज कंत्राटी कामगारांच्या मनात असंतोष, निराशा निर्माण झाली आहे. वीज कंत्राटी कामगार फक्त कागदोपत्री किमान वेतनावर, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा कमी वेतनावर काम करत आहे. कामगारांच्या न्याय व हक्कासाठी वीज उद्योगातील तिन्ही कंपनीतील वीज कंत्राटी कामगार पुणे येथून मंत्रालयापर्यंत 20 फेब्रुवारी रोजी पायी मोर्चा नेेणार आहोत. कामगारांना न्याय मिळेपर्यंत मंत्रालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा आयोजित सभेत संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला. 
नगर महाविद्यालयाजवळील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर सोमवारी (दि.21) दुपारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची नियोजन सभा घेण्यात आली. यावेळी संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, जिल्हा सचिव सचिन पाटील आदी उपस्थित होते.
वीज उद्योगात तात्पुरत्या कामगारांना न्याय देणारी पूर्वाश्रमीची रोजंदारी कामगार पध्दत, एनएमआर पध्दत वीज उद्योगातील सर्व कंत्राटी कामगारांना लागू करावी, वीज उद्योगात अनेक वर्षे काम केलेल्या परंतु सध्या नोकरीपासून वंचित असलेल्या सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, कामगारांकरिता बंधनकारक असलेले किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना यामध्ये आतापर्यंत झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकार्‍यांवर कारवाई करावी तसेच त्यातील थकित रक्कम वसूल करून कामगारांना न्याय द्यावा आदी मागण्या संघटनेने केलेल्या आहेत. 
सभेवेळी साईप्रसाद चव्हाण, बाळू किर्तने, राहुल काळे, आतिश लांडगे, कृष्णा साठे, नाथा पोले, दिगंबर व्यवहारे, सोहेल पटेल, आसीफ पठाण, राजेंद्र यादव, अमोल पवार आदींसह जामखेड, संगमनेर, कोपरगांव, तिसगांव, नेवासा, पाथर्डी, नगर शहरातील वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment