नगर । प्रतिनिधी - आपल्या पदापेक्षा मी तुमच्यातील एक सामान्य मुद्रक आहे. एकटा मनुष्य मुद्रण व्यवसाय करू शकत नाही. मुद्रकांच्या घरच्या सर्व मंडळींनी व्यवसायात हातभार लावावा. संघटनेशिवाय समस्यांवर तोडगा नाही. अहमदनगर प्रेस अॅण्ड अलाईड ओनर्स असोसिएशनचे नगरमध्ये चांगले काम सुरू आहे. त्यास आपले सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी केले.
दि. 1 ते 6 फेब्रुवारी 2019 दरम्यान प्रिंट पॅक हे प्रदर्शन नवीदिल्ली, ग्रेटर नोएडा येथे भरत आहे. दर दोन वर्षांनी भरणारे हे प्रदर्शन मुद्रकांसाठी एक पर्वणी असते. संपूर्ण देश व परदेशातून मुद्रक बांधव येथे भेट देण्यासाठी येत असतात. या 14 व्या प्रदर्शनाची माहिती देशभरातील मुद्रकांना व्हावी, यासाठी इंडियन प्रिंटींग अॅण्ड अलाईड मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (इपामा), महाराष्ट्र मुद्रण परिषद व दि अहमदनगर प्रेस अॅण्ड अलाईड ओनर्स संघटनेच्यावतीने नगरमध्ये रोड शो व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी रवींद्र जोशी, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, संघटक केशव तुपे, राजेश कारखानिस, नगर संघटनेचे अध्यक्ष गिरीश बच्चा आदी उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय सेक्रेटरी पोपट शेळके यांनी करुन दिला. सूत्रसंचालन मनोज बनकर यांनी केले. तिरमलेश पासकंटी यांनी आभार मानले. यावेळी इपामाच्यावतीने आयोजित प्रदर्शनासंबंधीची सर्व माहिती प्रोजेक्टद्वारे दाखविण्यात आली. युनिसिटी सोल्युशन प्रा. लि. ने आपली विविध झेरॉक्स मशिनरींची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी संघटनेचे सभासद व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment