नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याची आढावा बैठक बोलावली आहे. सायंकाळी 5 वाजता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी भवनात येणार असून आढावा घेण्यात येणार आहे. सभेसाठी दुपारी 1.30 वाजण्याचा वेळ दिली होती. मात्र, बैठकीस उशीर झाला असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या अठरा नगरसेवकांना पाटील बैठकीचे आमंत्रण नाही. तरीसुध्दा हे नगरसेवक आता पाटील यांना भेटणार का? अशी चर्चा शहरात सुरू आहे.
नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीला मिळणार की काँग्रेसला जाणार? यावरून वरिष्ठ पातळीवर अद्याप निर्णय झालेला नाही. सुजय विखे यांनी या जागेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा विखे यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत आज पाटील काय बोलणार याचीही उत्स्ाुकता नगरकरांना लागली आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील माजी खासदार, आजी-माजी आमदार, प्रदेशचे पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे प्रमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन व संचालक, जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, सर्व नगरपालिका नगराध्यक्ष, पदाधिकारी व नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यांना उपस्थित राहण्याचे आदेश स्वत: जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिले आहेत. परंतु नगरसेवकांना बैठकीचे आमंत्रण देऊ नका असा आदेश वरिष्ठांनीच दिला असल्याने त्यांनी त्या बडतर्फ नगरसेवकांना बैठकीचे आमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे हे बडतर्फ नगरसेवक पाटील यांना भेटणार का? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
No comments:
Post a Comment