Tuesday, 29 January 2019

कचरा रॅम्पला शिवसेनेचाच विरोध


नगर । प्रतिनिधी - नालेगावातील वारुळाचा मारुती परिसरात नव्याने करण्यात येणार्‍या कचरा रॅम्पला राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे तर शिवसेनेचाच विरोध असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी केला आहे. शिवसेनेचे मागील सत्तेच्या काळात गटनेते असलेले संजय शेंडगे यांच्यासह सेनेच्या अन्य काही नगरसेवकांनी या नव्या कचरा रॅम्पला स्थायी समितीच्या सभेत विरोध केला होता, असा दावाही गाडळकरांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिध्दीपत्रकात गाडळकर यांनी म्हटले आहे की, माळीवाड्यातील जुन्या महापालिका कार्यालयासमोरील कचरा रॅम्प हटवून तो वारुळाचा मारुती परिसरात नेला जाणार आहे. तीन-चार दिवसांपूर्वी नव्या कचरा रॅम्पचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदार वारुळाचा मारुती परिसरातील महापालिकेच्या जागेची साफसफाई करीत असताना काही जणांनी त्याचे काम थांबवून त्याला पिटाळून लावले. यावर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी राष्ट्रवादी समर्थक गुंडांनी ठेकेदाराला काम करू दिले नसल्याचा दावा करून जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गाडळकर यांनी प्रत्युत्तर देताना कदम यांच्यासह शिवसेनेवरही टीका केली आहे. नालेगावातील नव्या प्रस्तावित कचरा रॅम्पला राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे तर स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. पण शिवसेनेकडून याचे राजकीय भांडवल केले जात आहे. या कामाबाबत मंजूर नकाशा अद्याप बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराला उपलब्ध करून दिला गेलेला नाही, त्यामुळे काम सुरू करण्याचा वा बंद करण्याचा प्रश्न येत नाही. पण उठसूट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करून स्वतःची पोळी भाजण्याचा उद्योग शिवसेनेकडून सुरू आहे, असाही आरोप गाडळकरांनी केला आहे. दरम्यान, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कचरा रॅम्पवरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

No comments:

Post a Comment