Wednesday, 30 January 2019

आरजे मनीषा इंगळे-जोशी यांना चौथा स्तंभ पुरस्कार


नगर । प्रतिनिधी - येथील रेडिओ धमालच्या रेडिओ जॉकी (आरजे), महानगर न्यूजच्या वृत्त निवेदिका सौ. मनीषा इंगळे-जोशी यांना यावर्षीचा अप्रतिम चौथा स्तंभ पुरस्कार रेडिओ पत्रकारिता गटातून जाहीर झाला आहे. दि युनिसेफ, वृत्तपत्रविद्या विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अप्रतिम मीडिया फाउंडेशनने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पर्यावरण ते राजकारण या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांना ही संस्था राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविते. यावर्षी रेडिओ विभागात सौ. इंगळे-जोशी यांची निवड झाली. रेडिओ धमाल व आकाशवाणीत रेडिओ जॉकी म्हणून काम केलेल्या सौ. इंगळे-जोशी यांचे मॉनिर्ंगपूर, खुसुर फुसूर, धडकन, युवा मंच हे कार्यक्रम लोकप्रिय आहेत. स्थानिक वृत्तवाहिनीवर तसेच लेटस्अप, व्हाटस्अप वाणी आणि मी मराठी या ऑडिओ बुलेटिनवर त्या वृत्तनिवेदक म्हणून काम करतात. ऑडिओ-व्हिडीओ जाहिरातीसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील त्यांचा नावलौकिक आहे.

अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी अशोक कटारिया बिनविरोध


नगर । प्रतिनिधी - 108 व्या वर्षात पदार्पण करणार्‍या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या उपाध्यक्षपदी बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष खा. दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संचालक राधावल्लभ कासट यांनी कटारिया यांचे नाव सुचविले. त्यास दीपक गांधी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अशोक कटारिया यांचा संचालक मंडळाच्यावतीने अध्यक्ष खा. दिलीप गांधी व मावळते उपाध्यक्ष नवनीत सुरपुरिया यांनी सत्कार केला. याप्रसंगी संचालक अनिल कोठारी, अजय बोरा, किशोर बोरा, राजेंद्र अग्रवाल, मीना राठी, मनेष साठे, गौरव गुगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीनचंद गांधी, प्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे, सतीश शिंगटे यांच्यासह बँकेचे सभासद व पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खा. गांधी म्हणाले, नगर अर्बन बँकेची आज चौफेर प्रगती होत आहे. बँकेच्या शाखा स्व:मालकीच्या व अत्याधुनिक होत आहेत. त्यामुळे अर्बन बँकेच्या माध्यमातून सर्व अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना मिळत आहेत. स्वत:चे डाटा सेंटर सुरु केल्याने या मिळणार्‍या सुविधांना वेग आला आहे. बँकेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचार्‍यांचे मोलाचे योगदान आहे. अर्थक्षेत्रातील जुने जाणते अनुभवी व्यक्तीमत्व अशोक कटारिया यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या अनुभवामुळे बँकेच्या कामकाजात नक्कीच आणखी वाढ होईल.
अशोक कटारिया म्हणाले, नगर अर्बन बँक अध्यक्ष खा. गांधी यांच्या कुशल नेतृत्वामुळे प्रगतीच्या शिखरावर गेली आहे. येथे मिळणार्‍या चांगल्या सुविधांमुळे बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार समाधानी आहेत. एवढ्या मोठ्या बँकेचे उपाध्यक्षपद मला देऊन बँकेच्या संचालक मंडळाने मोठा विश्वास माझ्यावर व्यक्त केला आहे. या विश्वासास पात्र राहत बँकेच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त योगदान देऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
यावेळी बँकेचे सहप्रमुख व्यवस्थापक एम. पी. साळवे, डी. के. साळवे, राजेंद्र डोळे, सुनील काळे, मनोज फिरोदिया, शहर बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. विजय भंडारी, आरती कटारिया, सुवेंद्र गांधी आदी उपस्थित होते.

मुद्रकांनी परस्पर बंधूभाव जपावा ः रवींद्र जोशी


नगर । प्रतिनिधी - आपल्या पदापेक्षा मी तुमच्यातील एक सामान्य मुद्रक आहे. एकटा मनुष्य मुद्रण व्यवसाय करू शकत नाही. मुद्रकांच्या घरच्या सर्व मंडळींनी व्यवसायात हातभार लावावा. संघटनेशिवाय समस्यांवर तोडगा नाही. अहमदनगर प्रेस अ‍ॅण्ड अलाईड ओनर्स असोसिएशनचे नगरमध्ये चांगले काम सुरू आहे. त्यास आपले सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी केले.
दि. 1 ते 6 फेब्रुवारी 2019 दरम्यान प्रिंट पॅक हे प्रदर्शन नवीदिल्ली, ग्रेटर नोएडा येथे भरत आहे. दर दोन वर्षांनी भरणारे हे प्रदर्शन मुद्रकांसाठी एक पर्वणी असते. संपूर्ण देश व परदेशातून मुद्रक बांधव येथे भेट देण्यासाठी येत असतात. या 14 व्या प्रदर्शनाची माहिती देशभरातील मुद्रकांना व्हावी, यासाठी इंडियन प्रिंटींग अ‍ॅण्ड अलाईड मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (इपामा), महाराष्ट्र मुद्रण परिषद व दि अहमदनगर प्रेस अ‍ॅण्ड अलाईड ओनर्स संघटनेच्यावतीने नगरमध्ये रोड शो व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी रवींद्र जोशी, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, संघटक केशव तुपे, राजेश कारखानिस, नगर संघटनेचे अध्यक्ष गिरीश बच्चा आदी उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय सेक्रेटरी पोपट शेळके यांनी करुन दिला. सूत्रसंचालन मनोज बनकर यांनी केले. तिरमलेश पासकंटी यांनी आभार मानले. यावेळी इपामाच्यावतीने आयोजित प्रदर्शनासंबंधीची सर्व माहिती प्रोजेक्टद्वारे दाखविण्यात आली. युनिसिटी सोल्युशन प्रा. लि. ने आपली विविध झेरॉक्स मशिनरींची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी संघटनेचे सभासद व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कॅप जेमिनी कंपनीत निवड


नगर । प्रतिनिधी - अहमदनगर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाचे विद्यार्थी विलफ्रेड कुटिनो व श्रद्धा सुराणा यांची कॅम्प्स् मुलाखतीद्वारे कॅप जेमिनी या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी पुष्पगुच्छ देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ. कमलाकर भट, ए. वाय. बळीद, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रजाक सय्यद आदी उपस्थित होते.
या निवड प्रक्रियेमध्ये अ‍ॅप्टीट्यूट परीक्षा, टेक्निकल व एच. आर. मुलाखत या फेर्‍या झाल्या. या मुलाखतीसाठी 2559 विद्यार्थी होते. त्यातील 249 विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये विलफ्रेड व श्रद्धा यांचा देखील समावेश आहे.

कृषी महोत्सवात 97 लाखांची उलाढाल


नगर । प्रतिनिधी - सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. आपल्याकडे असलेले पीक कसे वाचवायचे? यासाठी धान्य महोत्सवाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांचे स्टॉल येथे लावण्यात आले होते. सगळ्या योजना शेतकर्‍यांना पाहता याव्यात, हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा महोत्सव आयोजित केला. दुष्काळात चारा कसा उपलब्ध होईल, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. तसेच या 5 दिवसांच्या कालावधीत 97 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी दिली आहे.
प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर कृषी विभाग (आत्मा) च्या वतीने कृषी महोत्सवाचे दि.25 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास शहरासह जिल्ह्यातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काल, मंगळवारी या महोत्सवाचा समारोप झाला.
कृषी विभाग (आत्मा) आयोजित कृषी महोत्सवातील सहभागी स्टॉलधारक शेतकर्‍यांना सन्मानचिन्हांचे वितरण लोणारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महोत्सवात खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ आयोजिण्यात आला होता. या लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान ठरलेल्या एकूण 40 ग्राहकांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी उपसंचालक सुरेश जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी अधिकारी सुनील राठी, अनिल गवळी आदी उपस्थित होते.
या महोत्सवात गहू, ज्वारी, तांदूळ, कडधान्ये, गावरान गायीचे ताक, तूप, सर्व तेले, मध, भाजीपाला, फळे, गृहोपयोगी वस्तु अशी एकूण 97 लाखांची उलाढाल झाली. या ठिकाणी शिपी आमटी, थालपीठ, उसाचा रस आदींचाही अनेकांनी आस्वाद घेतला. 
समारोप प्रसंगी सहभागी स्टॉलधारक शेतकरी व बचतगटांना सन्मानचिन्ह देण्यात आले. महोत्सवात सादर झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपस्थितांनी आनंद घेतला. या महोत्सवाच्या मोठ्या संख्येने नगर शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्राहकांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला. महोत्सव यशस्वीतेसाठी प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे, देवेंद्र जाधव, प्रकाश आहेर, नंदकुमार घोडके, धिरज कदम, अनिल औटी, श्रीकांत जावळे, तुषार कोल्हेकर, बाळनाथ सोनवणे, वैभव कानवडे, किशोर कडुस, सुजित गायकवाड, प्रशांत पुलाटे, प्रकाश महाजन, दानिश शेख, अनंत ढमाळ, प्रेरणा निंबाळकर, दीपाली दरेकर, नीलेश भागवत, सुनील म्हस्के, मीनाक्षी गोरे, संजय जाधव आदींनी प्रयत्न केले.

रोबोटिक सेंटरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने ध्वजारोहण


नगर । प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनानिमित्त रोबोटिक सेंटरच्या सावेडी शाखेत अत्याधुनिक पध्दतीने ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा कारागृहाचे अधिक्षक नवनाथ सावंत व सामाजिक कार्यकर्ते सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते कळ दाबून ध्वज फडकवण्यात आला.  याप्रसंगी देश संरक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या प्रतिकात्मक वाहनांचे संचलनही रोबोटिक्स यंत्रणेमार्फत करण्यात आले.
यावेळी सावंत म्हणाले, भविष्यकाळात या रोबोटिक विश्वाची मोठी गरज आहे. पुस्तकी ज्ञानाएवढेच महत्व प्रात्याक्षिक अनुभवी ज्ञानास आहे. हे तंत्रज्ञान घरोघरी पोहचविण्याची गरज आहे. सध्या औद्योगिक जगतातही या रोबोटिक्स यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेला आहे. मी येरवडा, पुणे येथे जेलर म्हणून कार्यरत होतो. त्यावेळेस असलेल्या 6 हजार कैद्यांनी नुसतेच बसण्यापेक्षा त्यांच्या वेळेचा वापर करुन आम्ही बोलेरो या चारचाकी कंपनीसाठी हार्नेस्ट वायर बनविण्याचे प्रशिक्षण या कैद्यांना दिले. त्याची निर्मिती करुन रोजगारही उपलब्ध झाला. त्यातून कमाईही सुरु झाली. नगरच्या जेलमध्येही असा प्रयोग करण्याचा मानस आहे.
सेंंटरच्या संचालिका प्रियंका संकलेचा, निशा शाह यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक मनीष कुमार, सागर गडकर, अनमोल पाटील, प्रवीण बिराटे, मेघा अरगुंटला, ऐश्वर्या खताडे यांनी परिश्रम घेतले. प्रितेश संकलेचा यांनी आभार मानले. 
रोबोटीक्स सेंटरच्या नगर व सावेडी शाखेमध्ये सुमारे 150 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

अण्णा हजारे यांचे राळेगणसिध्दीत उपोषण सुरू


नगर । प्रतिनिधी -  लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व शेतकर्‍यांच्या मालाला दीडपट हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून (बुधवार) राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करताना अण्णांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकावर जोरदार टीका केली. या सरकारला भ्रष्टाचारमुक्त देश नको आहे. त्यामुळेच लोकपाल कायदा लागू केला जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राळेगणमधील यादव महाराज समाधी मंदिरासमोर अण्णांनी उपोषण ंसुरू केले आहे. विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांनीही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रीय किसान महासभेनेही दिल्लीतील जंतरमंतरवर अण्णांच्या मागण्यांना पाठिंबा देत उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू केल्यानंतर पहिल्याच भाषणात अण्णांनी भाजप सरकारवर तोफ डागली. हे सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यांना शेतकर्‍यांचे हाल दिसत नाहीत. त्यांचा टाहो ऐकायला येत नाही. या सरकारला केवळ उद्योगपतींची चिंता आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे, असे अण्णा म्हणाले.
दरम्यान आंदोलन मागे घेण्याची सरकारची विनंती अण्णांनी फेटाळली आहे. अण्णांच्या भेटीसाठी निघालेल्या गिरीश महाजनांचा यामुळे हिरमोड झाला आहे. महाजन हेलिकॉप्टरमधून उतरून मुंबईतील जुहू ऐरोड्रोमवरून परतले आहेत. वय आणि तब्येतीचा विचार करता आंदोलन मागे घेण्याची विनंती गिरीश महाजन यांनी केली आहे.

रोजंदारीवरच्या पुढार्‍यांच्या म्हणण्याकडे आपण लक्ष देत नाही : डॉ. सुजय विखे


नगर । प्रतिनिधी - मी ताकाला जाऊन भांडे लपवणारा माणूस नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणारच आणि का लढवणार याची भूमिका सातत्याने गेली तीन वर्षे लोकांसमोर मांडत आहे. अशावेळेस ज्यांना उमेदवारीचे स्वप्न पडत आहे ते आपले घर सोडायला तयार नाहीत. अशी माणसे ज्यांच्या अंगी कुठली कर्तबगारी नाही व पक्षाच्या कुबड्यावर अवलंबून आहेत ते वल्गना करत आहेत. परंतु यापूर्वी आपण अनेकवेळा स्पष्ट केले की मी लोकसभा निवडणूक सामान्य माणसाच्या पाठिंब्यावर, आशीर्वादावर लढवत आहे. त्यामुळे रोजंदारीवरचे पुढारी काय म्हणतात याकडे आपण लक्ष देत नाही. लोकसभा निवडणूक सन 1991 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
डॉ. विखे यांचे शेवगाव तालुक्यातील निंबेनांदुर, वाघोली, ढोरजळगाव येथे कार्यकर्ता मेळावे झाले. या दौर्‍याची सांगता गरडवाडी येथे कार्यकर्ता सभा घेऊन केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे, निंबेनांदुर, ढोरजळगाव, वाघुली, भातकुडगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अनेकांना उमेदवारीचे दिवास्वप्न पडत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला आहे. अशावेळेस ज्यांना खरोखरच लोकसभा उमेदवारीच्या माध्यमातून जनसेवा करायची आहे, प्रश्न समजून घ्यायचे आहेत, अशी माणसे दोन महिन्यांमध्ये दक्षिण मतदार संघातल्या 700 पेक्षा जास्त गावांमध्ये व 70 पेक्षा जास्त गणांमध्ये पोहचू शकतील काय, असा खडा सवाल करत एवढ्या कमी कालावधीमध्ये मतदार संघामध्ये फिरणे, लोकांपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य आहे. अशावेळेला भूछत्राप्रमाणे उगवलेले उमेदवार कुठल्यातरी नेत्याचे उंबरठे झिजवून आदेशाची याचना करतील. तुम्हाला कुठल्याही पुढार्‍यांचा आदेश आल्यानंतर त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे कर्तुत्व, त्याची कर्तबगारी याची विचारणा करा व मगच मतदान करा. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या सात वर्षांपासून मी सक्रिय राजकारणात आहे. दोन बंद पडलेले साखर कारखाने सभासदांनी अत्यंत विश्वासाने माझ्या ताब्यात दिले. स्व. बाळासाहेब विखे पाटील व कै. मारुतराव घुले पाटील यांनी पाहिलेले सहकाराचे स्वप्न जोपासण्याचे काम आपण अत्यंत प्रामाणिकपणे करत आहोत. मागील तीन वर्षात मी दक्षिणेतल्या 400 पेक्षा जास्त गावांना भेटी दिल्या, 29 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 57 हजार पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्यसेवा करण्याचे भाग्य मला लाभले.
डॉ. विखे पुढे म्हणाले, शेवगाव-पाथर्डीचे अनेक प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. या मतदारसंघाची रचना त्याला काहीअंशी कारणीभूत आहे. त्यामुळे या मतदारसंघाला खासदाराची जास्त आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीत साहेबांचा आदेश आला तर प्रथम आपल्या पुढार्‍यांना त्यांनी सुचवलेल्या, सांगितलेल्या उमेदवाराची कर्तबगारी व असा उमेदवार आपल्यासाठी काय करू शकतो हा विचार करून आपले मतदान करावे. मागील पंधरा वर्षांपासून खासदार साहेबांचा चेहरा पण बघितला नाही, त्या खासदारांना आपण बिनबोभाटपणे इतके दिवस मतदान केले. परंतु आता या खासदार साहेबांना फुरसत मिळाल्यानंतर आपण आमच्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. येणारी निवडणूक ही अस्तित्वाची आहे. त्यामुळे आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता सारासार विचार करून योग्य उमेदवार निवडावा असे आव्हान डॉ. विखे यांनी उपस्थितांना केले.

पोलिस अधिकार्‍यांनी पैसे घेऊन माझ्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला : अनिल राठोड


नगर । प्रतिनिधी - माझ्यावर राजकीय गुन्हे आहेत, अत्याचार, खंडणी किंवा जीवे मारण्याचा एकही गुन्हा दाखल नाही. केडगाव खून प्रकरणातील आरोपी दहा महिन्यांपासून मोकाट फिरतात. त्यांना येथील पोलिस अधिकारी अटक करीत नाहीत किंवा त्यांचा तडीपारीचा प्रस्तावही तयार करीत नाहीत. कारण ते पोलिसांना पैसे देतात. आम्ही एकही रूपयाही पोलिसांना देत नाही. पोलिसांनीच समोरील पार्टीकडून पैसे घेऊन माझ्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. शहरातील व जिल्ह्यातील पोलिस यंत्रणाच पूर्णपणे भ्रष्ट असल्याचा आरोप शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला. 
पोलिस प्रशासनाने राठोड यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस यंत्रणेवरच आक्षेप घेतला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक गणेश कवडे, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. 
राठोड म्हणाले की, केडगाव खून प्रकरण झाल्यानंतर पोलिसांवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. मला नोटीस पाठविण्यात आली होती. त्या नोटिशीला मी उत्तर दिले आहे. परंतु पोलिस यंत्रणा पूर्णपणे पैसे घेऊन काम करीत असल्याने त्यांनी सेना टार्गेट केली आहे. मला तसेच शिवसेना संपविण्याचा त्यांनी डाव आखला आहे. मला नोटीस दिल्यानंतर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते घाबरतील असा त्यांचा समज आहे. परंतु जसा नेता तसाच कार्यकर्ता ही ओळख शिवसेनेची आहे हे त्यांनी विसरू नये. सेना ही कोणाच्या ताकदीवर उभी नाही. माझा शिवसैनिक हीच माझी ताकद आहे. या तडीपारीच्या प्रस्तावामुळे माझी जी मानहानी  झाली आहे त्यासंदर्भात मी न्यायालयातही जाणार आहे. 
गणपती उत्सवाच्या दरम्यान सेनेचाच मंडप त्या नायर या अधिकार्‍याने पाडला होता. त्यांची नगरविकास विभागाकडून नियुक्ती झालेली नव्हती. जिल्हाधिकार्‍यांनीही त्यांना नेमलेले नव्हते. दंगल व्हावी म्हणून अधिकार्‍यांनी सेनेचा मंडप पाडला होता. परंतु त्या परिस्थितीत सेना अतिशय शांत पद्धतीने वागली. सेनेला त्रास देण्यासाठीच तो अधिकारीच मुद्दामहून या ठिकाणी आणला होता असा आरोप राठोड यांनी यावेळी केला. तडीपारीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tuesday, 29 January 2019

हवालदार सचिन पवार यांचा ‘उत्कृष्ट प्रशिक्षक’ पदकाने सन्मान


नगर । प्रतिनिधी - सोनई (ता. नेवासा) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार सचिन वसंत पवार यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षक पदकाने सन्मानित करण्यात आले. जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रजासत्ताक दिनी झालेल्या समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट प्रशिक्षक पदक व प्रशस्तिपत्र देऊन श्री. पवार यांचा गौरव करण्यात आला.
जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असताना सचिन पवार यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडे उत्कृष्ट प्रशिक्षक पदकासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याअंतर्गत  सन 2015-16च्या बॅचमधून ही निवड झाली. याबद्दल पवार यांचे अभिनंदन होत आहे.

करिअरच्या बदलत्या संधी ओळखाव्यात


नगर । प्रतिनिधी - दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन अभ्यासक्रम येत आहेत. स्पर्धेच्या युगात मातृभाषेबरोबर इंग्रजीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागातही अनेक होतकरू, गुणवंत विद्यार्थी आहेत. परंतु शिक्षण क्षेत्रात काळानुरूप बदल होत गेल्यामुळे करिअरच्या संधी देखील बदलत गेल्या आहेत. या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी माहीत करून घेतल्या पाहिजे. कर्डिले ब्युरो नर्सिंग होम संस्थेने मागील अनेक वर्षांपासून अनेक होतकरू विद्यार्थी घडविले आहेत. राज्यात विविध हॉस्पिटलमध्ये येथील विद्यार्थी कार्यरत आहेत, असे प्रतिपादन जि. प. सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.
कर्डिले ब्युरो नर्सिंग होम संस्थेच्या बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, किड स्टार प्री प्रायमरी स्कूल व यश इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड हेल्थ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे उदघाटन सखाराम कर्डिले व लक्ष्मीबाई कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. लामखडे बोलत होते. 
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष कर्डिले, प्राचार्या मंगल कर्डिले, कांतीलाल कांडेकर, आबासाहेब कर्डिले, राजेंद्र जरे, सविता कर्डिले, नगरसेवक अमोल येवले, अशोक कर्डिले, संतोष कर्डिले, भास्कर कराळे, कांतीलाल माने, सरपंच सविता कर्डिले, जनार्दन माने, बी. आर. कर्डिले, डॉ. संतोष पोटे, डॉ. पानगे, डॉ. इमलवार आदी उपस्थित होते.सिव्हील हॉस्पिटलचे माजी अधीक्षक कांतीलाल कांडेकर म्हणाले की, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट, सिटी स्कॅन टेक्निशिअन, डायलीसीस टेक्निशिअन, कॅथलॅब टेक्निशिअन अशा प्रकारची अनेक पदे असतात. परंतु हे कोर्सेस करणारे तुलनेत कमी आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी नगण्यच आहेत. त्यामुळेच मुलांनी या कोर्सेसकडे करिअर म्हणून पहावे. प्राचार्या मंगला कर्डिले यांनी ही संस्था सुरू करण्यामागे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून करिअरच्या नवनवीन संधी त्यांना उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन दीपक कर्डिले यांनी केले, तर अशोक कर्डिले यांनी आभार मानले.

आठ बालकांना मिळाले आई-बाबा!


नगर । प्रतिनिधी - गर्भ मुलीचा असल्याने पूर्ण वाढ होण्यापूर्वी 27 आठवड्यांतच प्रसूती करण्यासाठी तिचे जन्मदाते आई-वडील कसाई बनले होते. तथापि अथक परिश्रमांनी बहुविध व्याधींनी ग्रस्त मातेचे आणि पवित्रा या बालिकेचे जीवन संरक्षित केले. पवित्रा हे नाव दिलेल्या या बालिकेला आज  अमेरिकन पालकांना दत्तक देताना वैद्यकीय पेशाचे सार्थक झाले, असे मत डॉ. राजेंद्र आणि डॉ. हेमलता वैरागर यांनी व्यक्त केले.
लैंगिक भेदभाव, पूर्वग्रह, आरोग्यविषयक समस्या, सामाजिक आणि कायदेशीर अडचणींना तोंड देणार्‍या 8 बालकांना एका विशेष महादत्तक सोहळ्यात आई-बाबा आणि घर मिळाले. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या केडगाव येथील सौ. रूपाली जयकुमार मुनोत बालकल्याण संकुलात हा महादत्तक विधान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा न्यायाधीश सत्यनारायण नावंदर, साईदीप रुग्णालयाचे संस्थापक डॉ. एस. एस. दीपक आणि ज्योती दीपक, राहुरी येथील डॉ. हेमलता व डॉ. राजेंद्र वैरागर, मॅकॉक्स आणि श्रीमती जॉयस कोनोली, पत्रकार विजयसिंह होलम यांच्याहस्ते या बालकांचे दत्तकविधान करण्यात आले. यातील 5 बालके भारतातील तर 3 बालकांना परदेशातील पालकांना दत्तक देण्यात आले.
भारताच्या विविध प्रांतातील पाच सक्षम पालक स्नेहांकुरने आपल्या बाळांसाठी निवडले. 3 परदेशी पालकांपैकी दोन पालक माल्टा या देशातील असून एक अमेरिका येथून आले. यावेळी डॉ. राजेंद्र वैरागर म्हणाले, कोणीतरी संस्थेच्या दारात बालक आणून देते आणि संस्था ते दुसर्‍या पालकांना देते एवढे दत्तक विधान सोपे नाही. पवित्रा या मुलीचे जीवन संरक्षित करताना स्नेहांकुर संस्थेने आणि 24 तास राबणार्‍या कार्यकर्त्यांनी अनेक आव्हानात्मक मानसिक आणि कायदेशीर प्रश्नांना तोंड दिले.
दत्तू वैरागर म्हणाले, एका बालिकेचे रक्षण करून सक्षम परिवारात पोहोचविताना अनेकदा निराशेचा अनुभव आला. तथापि देशात सर्वाधिक दत्तक विधाने मागील तीन वर्षात स्नेहांकुरने केली. आजवर 800 बालकांना कुटुंब आणि भविष्य देणार्‍या स्नेहांकुर संस्थेच्या कार्यकर्त्यांना या प्रक्रियेत तणावग्रस्त झालेले कधीही पाहिले नाही. संकटग्रस्त बालकांसाठी जीवाची बाजी लावणारी अशी बालसेवा हीच भारताच्या भविष्याची आशा आहे.
डॉ. प्रिती भोंबे म्हणाल्या, हजारो अनाथ मुलांना पालक आणि घर देण्याचे अभियान स्नेहांकुर राबविते. त्याचाच एक भाग म्हणून दत्तक विधानाबद्दल व्यापक जनजागृती करण्यासाठी महादत्तक विधान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण 4 मुले आणि 4 मुलींचे दत्तक विधान झाले. यातील चार प्रकरणात स्नेहांकुर संस्था अत्याचारांबाबत कायदेशीर लढाई करीत आहे. या बालकांच्या मातांच्या सोबत स्नेहांकुर परिवाराने केलेले सक्षमीकरण आणि पुनर्वसनाचे काम कसे चालते याविषयी स्नेहालय परिवाराचे पालक मिलिंद कुलकर्णी यांनी माहिती दिली.
दत्तकविधान प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी हेल्प लाईन 9011026483 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्काचे आवाहन स्नेहांकुरने केले आहे.

कचरा रॅम्पला शिवसेनेचाच विरोध


नगर । प्रतिनिधी - नालेगावातील वारुळाचा मारुती परिसरात नव्याने करण्यात येणार्‍या कचरा रॅम्पला राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे तर शिवसेनेचाच विरोध असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी केला आहे. शिवसेनेचे मागील सत्तेच्या काळात गटनेते असलेले संजय शेंडगे यांच्यासह सेनेच्या अन्य काही नगरसेवकांनी या नव्या कचरा रॅम्पला स्थायी समितीच्या सभेत विरोध केला होता, असा दावाही गाडळकरांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिध्दीपत्रकात गाडळकर यांनी म्हटले आहे की, माळीवाड्यातील जुन्या महापालिका कार्यालयासमोरील कचरा रॅम्प हटवून तो वारुळाचा मारुती परिसरात नेला जाणार आहे. तीन-चार दिवसांपूर्वी नव्या कचरा रॅम्पचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदार वारुळाचा मारुती परिसरातील महापालिकेच्या जागेची साफसफाई करीत असताना काही जणांनी त्याचे काम थांबवून त्याला पिटाळून लावले. यावर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी राष्ट्रवादी समर्थक गुंडांनी ठेकेदाराला काम करू दिले नसल्याचा दावा करून जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गाडळकर यांनी प्रत्युत्तर देताना कदम यांच्यासह शिवसेनेवरही टीका केली आहे. नालेगावातील नव्या प्रस्तावित कचरा रॅम्पला राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे तर स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. पण शिवसेनेकडून याचे राजकीय भांडवल केले जात आहे. या कामाबाबत मंजूर नकाशा अद्याप बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराला उपलब्ध करून दिला गेलेला नाही, त्यामुळे काम सुरू करण्याचा वा बंद करण्याचा प्रश्न येत नाही. पण उठसूट राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करून स्वतःची पोळी भाजण्याचा उद्योग शिवसेनेकडून सुरू आहे, असाही आरोप गाडळकरांनी केला आहे. दरम्यान, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कचरा रॅम्पवरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच इंग्रजांना भारत सोडावा लागला ः सिन्हा


नगर । प्रतिनिधी - आपल्या देशाला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळाले आहे, असे शिकवले गेले. मात्र हे जगातील सर्वात मोठे खोटे आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच इंग्रजांनी भारत सोडला, असे 1956 साली ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कबूल केले आहे. स्वातंत्र्याचे पूर्ण श्रेय सुभाषबाबूंना जाते. देशाला स्वातंत्र्य अहिंसेने नाही तर आर्म स्ट्रगलने मिळाले आहे आणि हे आर्म स्ट्रगल नेताजींची देण आहे. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी बाहेरून आक्रमण करावे लागेल हे नेताजींनी जाणले आणि त्यांनी हिटलरसारख्या महान  नेत्याशी मैत्री करून फौज उभारली, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल एस. पी. सिन्हा यांनी केले.
भारत भारतीच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त हॉटेल संजोग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतमाता पूजन, देशभक्तीवर व्याख्यान, विविध राज्यातील खाद्यपदार्थांचे फूड फेस्टीव्हल, तसेच विविध राज्यातील पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण या कार्यक्रमांना नगरच्या रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी एस. पी. सिन्हा, प्रसिद्ध अभिनेते व संस्कार भारती कोकण विभागाचे अध्यक्ष विक्रम गोखले यांच्या हस्ते भारतमाता पूजन झाले. या कार्यक्रमास भारत भारतीचे संस्थापक विनय पत्राळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी भारत भरतीचे अध्यक्ष दामोधर बठेजा, उपाध्यक्ष राजू लक्ष्मण, राजेंद्र अग्रवाल, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे उपस्थित होते.
सिन्हा पुढे म्हणाले, आझाद हिंद सेनेमध्ये कोणताही जातिवाद, प्रांतवाद, धर्मवाद नव्हता. संपूर्ण फैजमध्ये देशभक्ती जागृत केली होती. एवढ्या मोठ्या ब्रिटीशांच्या फौजेला फक्त 66 हजार आझाद हिंद सेनेने तोंड दिले. त्यामुळे त्यांना भारत सोडावा लागला. महिलांमध्ये देशभक्ती जागृत करून त्यांनी महिलांचीही फौज उभारली. अशा महान नेत्याचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात झाल्याचे खोटे आहे. रशियाच्या मदतीने पंडित नेहरूंनी त्यांना मारण्याचा कट करुन हत्या केली. आपल्या पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलून काहींनी हा इतिहास दूषित केला आहे. मात्र स्वातंत्र्याचा खरा इतिहास नव्या पिढीपुढे आला पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. यासाठी महिलांनी जिजामाता होऊन शिवाजी महाराजांसारख्या वीर पुरुषांना जन्माला घालावे.
सूत्रसंचालन वीणा दिघे व अविनाश कराळे यांनी केले. कमलेश भंडारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरेष हरवानी, दिनेश छाबरिया, चेतन जग्गी, चंद्रशेखर आरोळे, अनिल धोकरीया, हरिष रंगलानी, मोहन मानधना, बाबूशेठ टायरवाले, रामेश्वर बिहाणी, कमलेश भंडारी, मुन्ना आगरवाल, राजू ढोरे, प्रदीप पंजाबी, के. के. शेट्टी, अशोक मवाळ, राजेंद्र जोशी, वाल्मिक कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, कॅप्टन रावत, गणेश गायकवाड, आदेश चंगेडिया, सतीश हिंदाणी यांनी परीश्रम घेतले.

भाजयुमोच्या राज्यस्तरीय सी. एम. चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ


नगर । प्रतिनिधी - राज्यातील युवक-युवतींना हक्काचे मैदान व व्यासपीठ या सी. एम. चषक स्पर्धेमुळे मिळाले आहे. सामान्य खेळाडूही मोठा व्हावा, तसेच युवक पुन्हा मैदानाशी जोडला जावा, या उद्देशाने प्रदेश युवा मोर्चाच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी दिली.
राज्यस्तरीय सी. एम. चषक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या सी. एम. चषक अंतर्गत होणार्‍या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद नगरला मिळाले आहे. आज (मंगळवार) सकाळी वाडिया पार्क मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. योगेश टिळेकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. यावेळी आ. टिळेकर यांनी खेळपट्टीचे पूजन करुन चेंडू टोलावून स्पर्धेचे उद्घाटन केले.  याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, युवा मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किशोर वाकळे, कोषाध्यक्ष तुषार पोटे, जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, सुवेंद्र गांधी, राष्ट्रीय खेळाडू अंजली वल्लाकट्टी, नगरसेवक राहुल कांबळे, मनोज कोतकर, संजय ढोणे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील 32 जिल्ह्यांमधून युवक-युवतींचे संघ सहभागी झाले आहेत. युवकांचे सामने वाडिया पार्क मैदानावर तर युवती संघांचे सामने नगर कॉलेजच्या मैदानावर होणार आहेत.
आ. टिळेकर पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यात सी. एम. चषक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्व जिल्ह्यात झालेल्या स्पर्धांमधून अंतिम विजेत झालेल्या संघांना येत्या 3 फेब्रुवारीला मुंबईत पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आ. पूनम महाजन यांच्याहस्ते व राज्यातील सुमारे 1 लाख युवकांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
खा. गांधी म्हणाले, तुमच्यातूनच एखादा महान खेळाडू निर्माण व्हावा, यासाठी या सी. एम. चषक स्पर्धा फलदायी ठरतील. नगर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला एवढे मोठ्या स्पर्धाचे यजमानपद मिळाल्याने संपूर्ण राज्यातून युवक-युवती स्पर्धक येथे आले आहेत.
प्रास्ताविक शहराध्यक्ष नितीन शेलार यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. सुवेंद्र गांधी यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश साठे, अज्जू शेख, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, अविनाश साखला, कैलास गर्जे यांनी परीश्रम घेतले. यावेळी मिलिंद भालसिंग, नाना भोरे, सागर गोरे, सुमित खरमाळे, अभिजित चिप्पा उपस्थित होते.

मेहेराबादला उद्यापासून अमरतिथी उत्सव


नगर । प्रतिनिधी - अरणगाव रस्त्यावरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी 50 वी अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा उद्या, बुधवारपासून सुरु होत आहे. जगातील 74 देशांतून व भारतातील सर्व राज्यांतून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी येणार असल्याचे गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 30 जानेवारी ते शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे.
मेहेरबाबांचे जगात असंख्य भक्त व केंद्रे आहेत. सर्व जाती-धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला. जगात कोठेही मी देह सोडला तरी मेहेराबाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधिस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते. दि. 31 जानेवारी 1969 रोजी त्यांचे महानिर्वाण झाले म्हणून या ठिकाणी लाखो भाविक येतात.
परदेशातून मेहेरप्रेमी येण्यास सुरुवात झाली असून यामध्ये चीन, साऊथ कोरिया, अर्जेंटिना, अमेरिका, इराणच्या भाविकांचे जथ्थे आले आहेत.
दि. 30 रोजी सकाळी 6 वाजता मेहेरबाबा समाधी दर्शनाला प्रारंभ होऊन दुपारी 2 वाजता प्रेममिलन कार्यक्रमास आरती व प्रार्थनेने प्रारंभ होईल. नंतर देश-विदेशातील मेहेरप्रेमी भजने,गजल, नृत्ये, कव्वाली, गाणी, नाटिका सादर करतील. त्याच बरोबर बाबांवरील फिल्मही दाखवण्यात येतील. प्रेममिलन कार्यक्रम तीन दिवस सुरू राहील. दि. 31 रोजी सकाळी 7 वाजता दौंड रोडवरील बाबांची धुनी प्रज्वलित करण्यात येणार आहेे. सकाळी 11 वाजता अध्यक्ष श्रीधर केळकर हे उपस्थितांना संबोधित करतील. सकाळी 11.30 ला घोषणा सुरु होतील. 11.45 ला बिगिन दि बिगिन हे गाणे व 11. 50 ला मेहेरधून म्हटली जाईल. बाबांनी देहत्याग केला, त्यावेळी दुपारी 12 वाजेपासून  15 मिनिटे मौन पाळले जाईल.
शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत प्रेममिलन कार्यक्रम, नंतर आरती व प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता होईल.

डेंटल क्लिनीक बोगसच


नगर । प्रतिनिधी - शहरातील सावेडी उपनगरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या एक डेंटल क्लिनिक जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी रात्री उशिरा सील केले. मात्र, त्यादरम्यान एकही डॉक्टर त्यांच्या हाती लागला नाही. शल्य चिकित्सकांनी दोन डॉक्टरांची चौकशी केली असता आम्ही भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो अशी उत्तर देऊन त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. परंतु हे डेंटल क्लिनीक आहे की लॅब याची चौकशी केली असता अनधिकृत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे डॉ.संदीप बुळवे यांनी सुरू केलेले डेंटल क्लिनीक व स्वयंघोषित लॅब चौकशीच्या फेर्‍यात अडकली असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. असा प्रकार शहरात इतरत्रही सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही शल्य चिकित्सक मुरंबीकर यांनी सांगितले. या सर्व प्रकाराची गंभीर चौकशी झाल्यास बोगस डॉक्टरांचे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील सावेडी उपनगरातील एका इमारतीत डेंटल क्लिनिक सुरू आहे. या क्लिनिकमध्ये ज्या डॉक्टरांची नावे नमूद आहेत, ते डॉक्टर न थांबता, पदवी नसलेला डॉक्टर वैद्यकीय उपचार करतो, अशी माहिती समजली होती. त्यावरून जिल्हा शल्य चिकित्सक, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे आदींच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा डेंटल क्लिनीकवर छापा टाकला.  मात्र, पोलीस येण्यापूर्वीच रूग्णालय चालविणारा डॉक्टर संदीप बुळवे पसार झाला होता.
डेंटल क्लिनीकमध्ये ज्या डॉक्टरांची नावे व पदवी लिहिलेली आहे, अशा डॉक्टरांना बोलावून घेण्यात आले. रूग्णालयात लावलेल्या डॉक्टरांचे पदवी प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले. पोलिस व वैद्यकीय अधिकार्‍यांनी पंचनामा करून क्लिनिक सील केले. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. रूग्णालयात नावे लिहिलेल्या डॉक्टरांच्या पदव्यांची चौकशी होणार आहे. 
याबाबत चौकशी करून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मुरंबीकर यांनी दिली.

Monday, 28 January 2019

शहरातील भिंती रंगवून सुशोभीकरण


नगर । प्रतिनिधी - सामाजिक जाण असलेला युवक समाजामध्ये निर्माण व्हावा, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने समाजाचे प्रश्न सोडविले पाहिजे. यासाठी नगर शहरामध्ये वूई सपोर्ट संग्रामभैय्या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील अस्वच्छ भिंती रंगवून त्या भिंतीवर सामाजिक सुविचार, संदेश व चित्रे रेखाटली जाणार आहेत. हे सर्व उपक्रम ग्रुपचे कार्यकर्ते दर रविवारी स्वखर्चातून व श्रमदानातून करणार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सारडा कॉलेजच्या भिंती रंगून वूई सपोर्ट संग्रामभैय्या ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम शहरात सुरु करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, सारंग पंधाडे, वैभव ढाकणे, साहेबान जहागिरदार, नीलेश बांगरे, शाहनार खान, लंकेश चितळकर, अजिंक्य नारळे, शुभम नेहे, प्रशांत धपले, दादा शिंदे, नीलेश साळवे, राकेश सायखेडकर, अभिजित म्हस्के, सोहेल सय्यद, सौरव पवार, प्रशांत बेल्हेकर, भाऊ पुंड, प्रथमेश औटी, सारडा कॉलेजचे अशोक असेरी आदी उपस्थित होते.
प्रा. विधाते म्हणाले, नगर शहरातील दर्शनी भागातील सुमारे 50 भिंतींचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. युवा पिढीच्या माध्यमातून नगर शहर सुंदर बनविण्याचा एक संकल्प वूई सपोर्ट संग्रामभैय्या ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी केला आहे.
याप्रसंगी सुरेश बनसोडे म्हणाले, शहरातील युवकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे. गटनेते संपत बारस्कर म्हणाले, कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव


नगर । प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे, जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके, गृहचे उपअधीक्षक अरुण जगताप, एलसीबी पीआय दिलीप पवार, कोतवालीचे पो.नि. नितीन गोकावे, राहुरी पो.स्टे.चे पो.नि. हनुमंतराव गाडे, सहा. फौजदार आर. एस. मुळे, पो. नाईक सुनील चव्हाण, हेड कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, पो.नि. अभय परमार (संगमनेर), पो.नि. संपत शिंदे, पो.नि. सुनील पाटील (संगमनेर), पो.नि. श्रीहरी बहिरट (श्रीरामपूर), सहा. पो.नि. संदीप पाटील, सहा. पो.नि. विनोद चव्हाण, उपनिरीक्षक पंकज निकम, उपनिरीक्षक पंढरीनाथ खंडागळे, पो.ना. मल्लिकार्जुन बनकर, पो.हे.कॉ. रमेश वराट, पो.कॉ. फुरकान शेख आदींचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा म्हणाले की, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामावर मी समाधानी आहे. त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन आज सन्मानित करण्यात आले. प्रसंगी जीव धोक्यात घालून अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले आहे. जिल्ह्यातील अनेक घटनांचा तपास करून विविध गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. 
अनेकांना शिक्षाही झाली आहे, असे सांगून सन्मानित अधिकारी व कर्मचार्‍यांचे त्यांनी कौतुक केले.

जैन तत्त्वज्ञानात जगाला सुखसमृद्ध करण्याची ताकद


नगर । प्रतिनिधी - आज संपूर्ण जग अनेक समस्यांनी वेढलेले आहे. हिंसा, दुराचार, अत्याचार, पराकोटीचा व्देष वाढत आहे. अशावेळी संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा मंत्र देवून जगात खर्‍या अर्थाने सुखसमृध्दी व शांतता आणण्याची ताकद जैन धर्माच्या महान तत्त्वज्ञानात आहे. दिव्यशक्ती व ज्ञानाने परिपूर्ण अशा जैन धर्माची गौरवशाली परंपरा जतन करण्यासाठी समस्त जैन बांधवांनी एकजुटीने कायम प्रयत्नरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन गणिवर्य नयपद्मसागरजी म.सा. यांनी केले.
नगरमध्ये आलेल्या पूज्य नयपद्मसागरजी म.सा.यांचे माणिकनगर येथील श्री वासूपूज्यस्वामी जैन मंदिरात दोन दिवस प्रवचन झाले. ’विश्व के बदलते के समीकरण और जैन धर्म’ या विषयावर सलग दोन दिवस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांच्यासमवेत जैन इंटरनॅशनल वुमन्स ऑर्गनायझेशन संस्थेच्या पूज्य साध्वीजी मयणाश्रीजी म.सा.उपस्थित होत्या. या दोनही प्रवचनांना नगरमधील जैन समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती.  गुरुदेव नयपद्मसागरजी म्हणाले की, हजारो वर्षांचा जैन धर्म आपल्या विशिष्ट तत्त्वज्ञानासाठी नावाजला जातो. जगभरातील भिन्न संस्कृतींवर या धर्माच्या तत्त्वांचा प्रभाव पहायला मिळतो. नगरच्या भूमीलाही जैन धर्मात विशेष महत्त्व आहे कारण ही भूमी जैनांचे महान तपस्वी आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. जैन धर्म हा जगाला मार्ग दर्शवणारा, अहिंसेचा विचार मांडणारा धर्म आहे. आजच्या आधुनिक जगात प्रत्येकाला अनेक आव्हानांना सामोर जावे लागत आहे. अशावेळी जैन धर्मियांनी आपली श्रध्दा कायम ठेवून स्वत:बरोबरच आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. या दोन दिवसीय विशेष प्रवचनानिमित्त सौरभ बोरा यांच्यावतीने नवकारशीची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवचनाची संपूर्ण नियोजन व्यवस्था श्री संभवनाथ जैन मंदिर, कापडबाजार, श्री वासूपूज्यस्वामी जैन मंदिर माणिकनगर व सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आली होती.

गुरव समाजाचा व्रतबंध, वधू-वर मेळावा उत्साहात


नगर । प्रतिनिधी - अखिल गुरव समाज संघटना, व जिल्हा गुरव समाज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात प्रथमच व्रतबंध (मुंजी) सोहळा, तसेच गुरव समाजबांधवांचा मेळावा आणि वधू-वर मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त गुरव समाजबांधव जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अखिल गुरव समाज संघटनेेचे अध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा तोरडमल, शिवसेना उपनेते अनिल राठोड, उपमहापौर मालनताई ढोणे, संदीप कर्डिले, दादाभाऊ तापकिरे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्तात्रय मसुरकर, रंगनाथ गुरव, बंडूशेठ खंडागळे, नवल शेवाळे, सुधीर लांडगे, अ‍ॅड. सुरेश कौदरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सामुदायिक व्रतबंध सोहळ्यानिमित्त बटूंची नगर शहरातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. हा सोहळा वैदिक पद्धतीने मोठ्या थाटात व उत्साहात झाला. बटूंना पळी भांडे, तामण, गडवा, भिक्षावळ लाडू, तसेच धार्मिक विधी व त्यासाठी लागणारे साहित्य संघटनेने दिले. या सर्व कार्यक्रमास उपस्थितांना चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती, तसेच मिष्टान्न भोजनही देण्यात आले.
कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल यावेळी अखिल गुरव समाज संघटनेेचे अध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
नगरच्या संयोजन समितीने पुढील वर्षी अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचा राज्यव्यापी मेळावा, वधूवर मेळावा, तसेच सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करण्याचा मानस याप्रसंगी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल तोरडमल, महिला जिल्हाध्यक्ष स्मिता शेलार, महेश शिर्के, नरेश भालेराव, पंकज काळे, शिवाजी शेलार, प्रशांत शेलार, डॉ. सुरेश थोरात, सुधाकर शिंदे, अरविंद आचार्य, उमेश शिर्के आदींनी प्रयत्न केले.

जीवनात भगवान बाबांच्या संदेशाचे आचरण करा : आ. संग्राम जगताप


नगर । प्रतिनिधी - देवाचे नामस्मरण केल्याने रोजच्या कामासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसभरात एकदातरी परमेश्वराचे नाव मुखात असावे. प्रत्येक कामाची  सुरुवात देवाच्या नामस्मरणाने  करावी, संत-महात्म्यांनी केलेल्या उपदेशामुळे अनेकांचे जीवन सुजलाम्-सुफलाम् झाले आहे. त्यामुळेच तरुण पिढीने आधुनिक युगात तंत्रज्ञानाबरोबर धार्मिक कार्यातही उत्साहाने भाग घेतला पाहिजे. संत भगवान बाबांनी सत्कर्माचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आपल्या जीवनात आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सारसनगर येथे संत भगवान बाबा यांच्या कीर्तन महोत्सवाच्या सांगताप्रसंगी काल्याची दहिहंडी ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.संग्राम जगताप बोलत होते. 
याप्रसंगी संदीप कर्डिले, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, शीतल जगताप, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, संजय चोपडा, झुंबर आव्हाड, बबन घुले, अनिल पालवे, भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर खेडकर, विलास शिंदे, उद्योजक भिमराज फुंदे, बाबासाहेब जाधव, म्हतारदेव घुले, देवराम घुले, पाराजी ढाकणे, भगवान ढाकणे, रामदास बडे, मयुर विधाते आदी उपस्थित होते.
सप्ताहादरम्यान विविध किर्तनकारांनी आपली सेवा दिली. तसेच समारोपप्रसंगी भाविकांनी परिसरातून शोभायात्रा काढली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सप्ताह यशस्वीतेसाठी भगवान बाबा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, महिला भक्तमंडळाने परिश्रम घेतले. 
यावेळी बाबा गाडळकर, दत्ता जाधव, किसनराव घुले, दराडे, नीलेश बडे, नामदेव गिते, गणेश बडे, अमोल जाधव, सुधाकर चेमटे, भैरु सानप, उद्धव ढाकणे, दादा कर्‍हाड, मच्छिंद्र कराळे आदींसह महिला, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जितो ट्रेड फेअरमध्ये विचारांचे आदानप्रदान


नगर । प्रतिनिधी - नगरमध्ये सहा महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या जितो अहमदनगर शाखेने गरुडझेप घेत आयोजित केलेल्या ‘जितो ट्रेड फेअर’ने नगरमध्ये इतिहास घडविला. जिल्ह्यासह राज्यातून सुमारे 60 ते 65 हजारांपेक्षाही जास्त लोकांनी या फेअरला भेट दिली आहे. लहानांपासून ते वृद्धापर्यंत, छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठे उद्योजक, सामाजिक संस्था अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर अनेकांना येथे व्यवसायाच्या नवीन संधीही उपलब्ध झाल्या आहेत. या ‘फेअर’निमित्त हेलिकॉप्टर राईडचा अनुभव नातवा पासुन ते आजी-आजोबांनी घेतला. या उपक्रमांमुळे अनेकांचे हवाई सफारीचे व आकाशातून नगर कसे दिसते? हे पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 
‘जितो ट्रेड फेअर’ निमित्त आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या ‘टॉक शो’ अर्थातच व्याख्यानमालेस उत्तम प्रतिसाद मिळाला. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचेच या ठिकाणी व्याखाने झाली. ‘जितो ट्रेड फेअर’ ला लाभलेला प्रचंड प्रतिसादात अनेकांचे योगदान असून नगरच्या विकासाची ही सुरवात म्हणावी लागेल. ‘जितो ट्रेड फेअर’ निमित्त आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या  टॉक शोला (व्याख्यान) अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. 
यावेळी राजेश मालपाणी, रोहन गांधी, एन.एच.सहस्त्रबुद्धे, प्रा.सर्जेराव निमसे, अमित शर्मा, निकेत करंजके, चकोर गांधी, निवेदिता साबू यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

अर्बन बँकेने विश्वासार्हता जपली ः हरिभाऊ बागडे


नगर । प्रतिनिधी - पंचावन्न वर्षांत पदार्पण करणार्‍या नगर अर्बन बॅँकेच्या नेवासा शाखेनेसर्व ग्राहकांची विश्वासार्हता जपून केलेले कार्य कौतुकास्पद आहे. बँकेने ग्राहकांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी. स्पर्धेच्या काळातही बँकेची होत असलेली प्रगतीची घोडदैड वाखाणण्याजोगी असल्याचे गौरवोद्गार विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काढले.
नगर अर्बन बँकेच्या नेवासा शाखेच्या नवीन स्वमालकीच्या अद्यावत वास्तूचा लोकार्पण सोहळा व कोनशिलेचे अनावरण बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. जुन्या सेंट्रल बँकेच्या चौकात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन खासदार दिलीप गांधी होते. कार्यक्रमास आमदार बाळासाहेब मुरकुटे, नगराध्यक्षा संगीता बर्डे, व्हा.चेअरम ननवनीत सुरपुरीया, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीनचंद गांधी, संचालक विजयकुमार मंडलेचा, अशोक कटारिया, राधावल्लभ कासट, अनिल कोठारी, अजय बोरा, दीपक गांधी, शैलेश मुनोत, किशोर बोरा, राजेंद्र अग्रवाल, मीना राठी, मनेष  साठे, शंकर  अंदानी, भाजपचे नितीन उदमले, औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दामूअण्णा नवपुते, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. बागडे म्हणाले, नगर अर्बन बँक ही 108वर्षे पूर्ण करणारी राज्यातील सर्वात जुनी बँक आहे. गरीब व गरजूंना बँकेमुळे हातभार मिळाला आहे. सभासद, ठेवीदरांचा विमा काढून त्यांना संरक्षण देण्याचा अर्बन बँकेने महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. बँकेचा लवकरच राज्या बाहेरही विस्तार होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 
अध्यक्षस्थानावरून चेअरमन खासदार गांधी म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकार सहकाराची स्थापना करताना दिल हे सर्व तत्त्व आज आम्ही तंतोतंत पाळत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग क्षेत्रात मोठे अमुलाग्र बदल केले आहेत. बँकिंग क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे अर्बन बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळवून दिला. कालांतराने मल्टीस्टेटमध्ये बँक रूपांतरित केली. अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करून राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांच्या स्पर्धांमध्ये टिकून आहे. बँकेची चौफेर प्रगती होत आहे, बँक सुदृढ होत आहे. 
आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, संपूर्ण राज्यात नावाजलेल्या या बँकेच्या शाखेने नेवाशामधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सहकार्य करून आर्थिक आधार दिला आहे. तसेच अनेक गरीब सर्वसामान्य कुटुंबांनाही आधार दिला आहे. त्यामुळे आज छोटे व्यवसायिक व्यापारी व उद्योजक झाले आहेत.
सोहळ्यास लक्ष्मण पाटील, ज्येष्ठ व्यापारी रमेश ओस्तवाल, अनिल फिरोदिया, मोहन चोरडिया, प्रकाश गुजराती, कृष्णा डहाळे, राजेंद्र मुथा, जुम्मा खान पठाण, शंकर नळकांडे, संतोष गांधी, अरविंद मापारी, सतीश गांधी, राम जगताप, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मापारी, दिनेश व्यवहारे, वरिष्ठ अधिकारी सतीश रोकडे एम.पी. साळवे डि.के. साळवे, नेवासा शाखेचे  मॅनेजर खंडागळे व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व्हाईस चेअरमन नवनीत सुरपुरिया यांनी केले. सूत्रसंचलन प्रसाद बेडेकर यांनी केले. राधावल्लभ कासट यांनी आभार मानले.

अर्बन बँकेचे सर्वसामान्यांकरीता कायम योगदान ः खा. गांधी


नगर । प्रतिनिधी - देशाला व आपल्याला संरक्षण देण्यासाठी सैनिकांचे बहुमोल योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. सैनिकांच्या या बहुमोल योगदानातून उत्तरदायित्व व्हावे यासाठी देशाच्या सीमा सुरक्षित करतांना, कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींच्या हस्ते ध्वजारोहन करण्याचा उपक्रम अर्बन बँकेने प्रजासत्ताक दिनानिमित्त राबविला. वीर पत्नींच्या प्रति आदर व्यक्त करत अर्बन बँकेने त्यांना बँकेचे सभासदत्व दिले असून, त्यांचा सन्मानही करत आहेत. आजच्या या कार्यक्रमामुळे एका डोळ्यात आश्रु तर एका डोळ्यात अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वारंवार सर्व सैनिकांप्रती आदर व्यक्त करत त्यांचाही सन्मान केला आहे. अर्बन बँक कायम सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्यांकरीता योगदान देत स्वातंत्र्यपूर्व काळापासून अर्थक्षेत्रात काम करत आहे, असे प्रतिपादन अर्बन बँकेचे अध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी केले.
नगर अर्बन बँकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयात शहिद जवानांच्या वीरपत्नींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच खा. गांधी यांच्या हस्ते सर्व वीरपत्नींचा सन्मान करुन त्यांना अर्बन बँकेचे सभासदत्व देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक अनिल कोठारी, दीपक गांधी, किशोर बोरा, अजय बोरा, मनेष साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीनचंद गांधी, प्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे, सतीश शिंगटे, एम. पी. साळवे, डि. के. साळवे, मनोज फिरोदिया, सुनील काळे, हेमंत बल्लाळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वीरपत्नी श्रीमती माधुरी गुंड (श्रीगोंदा), श्रीमती कृष्णाबाई नागे (शेवगांव), श्रीमती अनिता कडूस (नगर), श्रीमती वृषाली धामणे (नगर), श्रीमती निर्मला भंडारे (कर्जत), श्रीमती कृष्णाबाई कोरके (राहुरी), श्रीमती पुष्पा किणकर (पारनेर), श्रीमती मोहिनी म्हस्के (श्रीगोंदा) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांचा अर्बन बँकेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी अर्बन बँकेने केलेल्या सन्मानाने सर्व वीरपत्नी भारावून गेल्या. प्रतिक्रीया देतांना अनेकींचे डोळे पाणावले. अर्बन बँकेने शहिद जवानांच्या प्रति आदर व्यक्त करत वीर पत्नींचा सन्मान केल्याबद्दल सर्वांनी अर्बन बँकेचे आभार मानले.
प्रास्ताविक संचालक अनिल कोठारी यांनी केले. सूत्रसंचालन किशोर गांधी यांनी केले. दीपक गांधी यांनी आभार मानले.

भाजपचा गड आला पण सिंह गेला!


नगर । प्रतिनिधी - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी घोडदौड कायम राखत भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी श्रीगोंदा नगरपालिकेवरही वर्चस्व मिळविले आहे. एकूण 19 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांचा विजय झाला. त्यामुळे भाजपचा गड आला पण सिंह गेल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसी नाराजी दिसून आली. तर त्यांचे आघाडीचे विरोधकांना आठ जागांवर समाधान मानावे लागले असले तरी त्यांनी जंगी मिरवणुक काढून नगराध्यक्ष पदाची जल्लोष केला.  
श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आज मतमोजणी पार पडली. बहुमतासाठी 10 जागांची आवश्यकता होती. भाजपने बहुमतापेक्षा एक जागा जास्त जिंकत नगरपालिकेवर वर्चस्व मिळविले. मात्र, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा तब्बल दीड हजार मतांनी पराभव झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार पोटे यांनी त्यांचा पराभव केला. पोटे या पूर्वी भाजपमध्येच होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षांतर करून त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली होती. शिवसेना-भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढली होती. शिवसेनेने काही जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

महिला प्रांताधिकार्‍याच्या अंगावर मुरुमाचा डंपर घालण्याचा प्रयत्न


नगर । प्रतिनिधी - शासनाचा कर वाचविण्यासाठी खोट्या पावत्या बनवून मुरुम घेऊन जाणार्‍या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर व त्यांच्या पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला. तसेच शिवीगाळ करुन अधिकार्‍यांना दगड फेकून मारण्यात आले. हा प्रकार काल (रविवार) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास औरंगाबाद रस्त्यावरील तपोवन महालाजवळील उदमले यांच्या साईटवर घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी डंपरचालक साठे, हयात खान, दिलावर खान, अय्युब असीर पठाण, समीर पठाण, निसार पठाण, युसुफ पठाण, अज्जु व इतर 4 ते 5 जणांवर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक अशोक सूर्यभान मासाळ (वय 30, रा. पाईपलाईनरोड, सावेडी) यांच्या फिर्यादीवरुन भादंविक 307, 308, 379, 143, 147, 465, 468, 420, 353, 427, 504, 506, मुंबई पोलिस अधिनियम कलम 37 (1)(3), 135, महाराष्ट्र महसूल संहिता अधिनियम कलम 48 (7), (8) पर्यावरण कायदा कलम 8, 15 प्रमाणे तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींनी लिपीक अशोक मासाळ यांचा मोबाईल हिसकावून रस्त्यावर आपटून फोडून नुकसान केले. महिला अधिकार्‍याच्या अंगावर डंपर घालण्याचा पयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील हे करत आहेत.

Friday, 25 January 2019

नगर विकासासाठी सल्लागार समिती नेमणार ः महापौर


नगर । प्रतिनिधी - नगर शहराचा ऐतिहासिक वारसा विकसित करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नगर विकासासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, एनजीओ, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी अशा सर्व घटकांतील लोकांची संघटन करून सल्लागार समिती नेमणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
एशियन नोबल हॉस्पिटलच्या वतीने नवनिर्वाचित महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालनताई ढोणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नोबलचे संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. प्रीती थोरात, विजय निकम, राहुल हिरे, डॉ. अमोल कासवा, डॉ. महेश घुगे, डॉ. अमोल गडाख, डॉ. सचिन उदमले, डॉ. संदीप सायकर, डॉ. दर्शन चकोर, युनूस टेंगे आदी उपस्थित होते.
श्री. वाकळे पुढे म्हणाले की, नगरच्या विकासाबद्दल सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. नगर एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. सीनानदीचे लवकर सुशोभीकरण करणार असून, एक वर्षाच्या आत 100 आसन क्षमता असणारे सर्व सोयींनी युक्त नाट्यगृह उभारणार असल्याचे ते म्हणाले. 
यावेळी डॉ. कांडेकर म्हणाले की, नगरची आरोग्य सेवा पुणे, मुंबईप्रमाणेच चांगली आहे. नगरच्या विकासासाठी एनजीओला सामावून घेतल्यास निश्चितच नगरचा चेहरा बदलेल.
उपमहापौर ढोणे यांनीही मनोगत व्यगक्त केले. प्रास्ताविक विजय निकम यांनी केले. राहुल हिरे यांनी आभार मानले.

कन्या दिनानिमित्त जनजागृती रॅली


नगर । प्रतिनिधी - कन्या दिनाचे औचित्य साधून ‘बेटी बचाव’चा संदेश देण्याच्या उद्देशाने कन्या दिनानिमित्त तक्षिला स्कूलच्या वतीने रॅली काढून जनजागृती करण्यात आली. 
स्त्री-भ्रूणहत्या थांबवून मुलीचा जन्मदर वाढविणे काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर कन्या दिनाचे औचित्य साधून तक्षिला स्कूलच्या विद्यार्थिनींनी रॅली काढून बेटी बचावचा संदेश दिला. शहरातील एम. जी. रोड, घास गल्ली, नेताजी सुभाष चौक, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. रॅलीत 7वी, 8 वीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.  रॅलीचा समारोप दिल्लीगेट येथे झाला.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ’ या रॅलीदरम्यान पथनाट्य सादर केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, बेटी बचाओ, बेटी पढाओ अशा घोषणांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिसर दणाणून सोडला. 
कन्या दिनाच्या कार्यक्रमासाठी तक्षिला स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा समन्वयक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

पर्यावरणाशी समतोल साधून विकास करण्याची गरज ः डॉ. मूर्ती


नगर । प्रतिनिधी - ही भूमी आपल्याला सर्वकाही देते. पण आपण त्याचा सुयोग्य असा वापर करुन त्या भूमातेचे नुकसान होईल असे काहीही करु नये. पूर्वी गंगा नदीचे पाणी हे जसेच्या तसे पिण्यासाठी वापरत असत. पण आज त्यामध्ये प्रदुषण झालेले आपणांस दिसते. म्हणूनच शासन गंगा स्वच्छ करण्यासाठीचे बर्‍याच प्रोजक्टसवर काम करत आहे. नैसर्गिक संसाधनांचा आपण योग्य तो विनीयोग केला तरच पर्यावरणाशी समतोल साधून आपण आपला विकास करु शकतो, असे प्रतिपादन एन. आय. टी. आय. ई. मुंबईचे डॉ. शंकर मूर्ती यांनी केले.
येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने काल (बुधवार) व आज (शुक्रवार) एकविसाव्या शतकातील पर्यावरण आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जळगावच्या एस.एस.बी.टी. चे डॉ. मुजाहिद हुसेन, एस.व्ही.एन.आय.टी. सूरतचे डॉ. के. डी. यादव, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. संदीप माळी, एस. सी. ओ. ई. पुण्याचे डॉ. समीर शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. मुजाहिद हुसेन म्हणाले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी घोषित केल्याप्रमाणे 20 व्या शतकात सायन्स व टेक्नॉलॉजीमध्ये भरीव प्रगती होत आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे व वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला वातावरणामध्ये बदल झाल्याचे चित्र दिसत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश न करता आपला विकास साधता आला पाहिजे. यासाठी स्थापत्य अभियंत्यांना यापुढे या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.
या राष्ट्रस्तरीय चर्चासत्रासाठी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 55 अभियंते व विद्यार्थी आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ. उर्मिला कवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. मंदार गुंजाळ, प्रा. सूरज असावा,  उपसंचालक प्रा. सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आले होते.

‘जितो’मध्ये नगरदर्शन हेलीकॉप्टर राईडची पर्वणी


नगर । प्रतिनिधी - आकाशातून नगरचे सौंदर्य पाहण्याची संधी जितो ट्रेड फेअरमुळे उपलब्ध झाली.यामुळे नगरचे खरे स्वरूप मला पाहता आले, अशी भावना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली. 
 जितो ट्रेड फेअरनिमित्त नगर पर्यटन विकासाच्या उद्देशाने वैशाली चोपडा व सोनल चोपडा यांच्या संकल्पनेतून आयोजित नगरदर्शन हेलीकॉप्टर जॉय राईडचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत कायनेटिक चौक येथे झाला. यावेळी जितो ट्रेड फेअर समन्वयक जवाहर मुथा, जितो नगर शाखा अध्यक्ष गौतम मुनोत, सचिव अमित मुथा, सुभाष चोपडा, सिद्धार्थ चोपडा, पीडबल्यूडीचे सुरेश राऊत, कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितिन गोवाके, कमलेश मुथा व जितो पदाधिकारी तसेच जितो महिला विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, हेलीकॉप्टर राईडमुळे नगरच्या ऐतिहासिक वास्तूंचे वेगळ्या स्वरूपात दर्शन घडले. अतिशय अल्प दरात ना नफा ना तोटा या हेतूने राबविलेले हा उपक्रम नगरच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देईल.
सोनल चोपडा यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना हेलीकॉप्टरविषयी आकर्षण असतेच, मात्र संधी मिळत नाही अथवा परवडत नाही. म्हणूनच जितोच्या माध्यमातून नगरकरांना नगरचे विहंगम दृश्य पाहता यावे यासाठी हेलीकॉप्टर जॉय राइडचे नियोजन केले असून त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. येत्या 28 तारखेपर्यंत राईडचा लाभ घेता येईल.
गौतम मुनोत यांनी या उपक्रमास दिलेल्या प्रतिसादाबद्दल नगरकरांचे आभार मानले, तसेच जितो ट्रेड फेअरला भेट देण्याचे आवाहन केले. हेलीकॉप्टर राइडच्या अधिक माहितीसाठी  9767494333 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

नगरमध्ये ‘ठाकरे’चा फर्स्ट शो हाऊसफुल्ल


नगर । प्रतिनिधी - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट पाहण्यासाठी नगरकरांनी तुफान गर्दी केली. आज फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल झाला. तर पुढील शोची तिकिटेही आधीच संपली आहेत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘ठाकरे’ या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. आपल्या लाडक्या महानेत्याला एवढ्या भव्य स्वरुपात एकदम जवळून पाहता येणार असल्याने सारेच हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर तो दिवस आला असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी यावेळी केले.
हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळायला हवा म्हणून नगर भागात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बुक करून ठेवला होता. त्यांच्याकडून हा शो शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसह सामान्य जनतेला मोफत दाखवण्यात आला. चित्रपटगृहाच्या बाहेर शिवसेनाप्रमुखांचे प्रतिमा लावून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ घोषणा देत प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, जिल्हा युवा सेनेचे अधिकारी विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन शिंदे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.

‘स्वरगंधर्व’ पुरस्कार खोपटीकरांना प्रदान


नगर । प्रतिनिधी - पाटोदा (जि. बीड) येथील सौ.कुसुमताई आविळे संस्थेच्या वतीने किराणा घराण्याचे गायक महेश भास्करराव खोपटीकर यांना स्वरगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुधवारी (दि. 23) सायंकाळी पाटोदा येथे झालेल्या या कार्यक्रमात युवा नेते जयदत्त धस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन खोपटीकर यांंना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सौ. कुसुमताई आविळे  संस्थेचे अध्यक्ष बलराज आविळे, दीपक आविळे, गंगाधर जाधव, भानुदास आविळे गुरुजी, शहाजी खेंगरे, शिवलिंग लगड, महंत महादेव महाराज (बेलेश्वर संस्थान, लिंबागणेश), हभप महादेव महाराज (चाकरवाडी संस्थान), नरहर एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार अनिल लगड आदी उपस्थित होते.
या सोहळ्यानंतर खोपटीकर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. त्यांना हार्मोनियमवर भास्करराव खोपटीकर व तबल्यावर शेखर दरवडे यांनी साथसंगत केली. या बहारदार मैफलीत शास्त्रीय गायन तसेच भक्तिगीते सादर करून खोपटीकरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

जैन कॉन्फरन्सची मोठी प्रगती होईल ः आदर्शऋषीजी


नगर । प्रतिनिधी - नवी दिल्ली येथील श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स ही श्रमण संघाची मातृसंस्था असून गत 113 वर्षे सकल समाजाची जडण-घडण या संस्थेने केली आहे. या संस्थेत आजपर्यंत कार्य करणार्‍या अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच दिल्लीसारख्या राजधानीत आपल्या जैन समाजाचे मुख्यालय असणे ही समाजासाठी मोठ्या गर्वाची बाब आहे. माजी अध्यक्षांच्या पावलावर पाऊल ठेवून संस्काराचे प्रतिबिंब उमटवत नवनिर्वाचित अध्यक्ष पारस मोदी जैन आणि त्यांचे सर्व 14 प्रांतातील सहकारी संस्था प्रगतीपथावर नेतील, असा विश्वास प्रभुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांनी व्यक्त केला.
श्री ऑल इंडिया श्वेतांबर जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली या संस्थेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी जैन आणि त्यांचे सर्व नवोदित सहकारी, पदाधिकारी व देशातील सर्व संभागीय कार्यकारिणीचा शपथविधी नगरमधील आनंदधाम येथे पार पडला. यावेळी गुरु भगवंतांचे व साध्वीजींच्यावतीने आशीर्वचन देतांना आदर्शऋषिजी म. सा. बोलत होते.
पी. एच. जैन परिवारातर्फे महिला व युवती सदस्यांनी स्वागत गीत सादर केले. महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री. कुंदनऋषीजी महाराज यांनी मुंबईच्या पी. एच. जैन परिवार त्याचे प्रमुख कॉन्फ्रेंसचे माजी अध्यक्ष कांतीलाल जैन यांचा नामोल्लेख करुन पारस मोदी जैन यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. छाया मोदी जैन यांनी मंगलाचरण सादर केले. शिल्पा, पूनम, खुशबू, हर्षदा व प्राची मोदी-ब्रम्हेचा जैन यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत सुनंदा ब्रम्हेचा जैन, सुनीता, दीपाली, वैशाली, मनाली, रक्षणा यांनी गीतरुपाने केले. सूत्रसंचालन नूतन कार्याध्यक्ष बालचंद खरवड यांनी केले. इशिता मोदी जैन हिने पारस मोदी यांच्यासाठी शुभेच्छा गीत सादर केले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी डी. डी. खाबिया, उपअधिकारी राजीव जैन, अजित छल्लाणी यांचा सत्कार पी.एच.जैन परिवारातर्फे करण्यात आला. अनिल जैन, विवेक जैन, उमेश जैन, विशाल जैन, चिराग व राजेश जैन यांनी या अधिकार्‍यांचे आभार मानले. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोदी जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. पंचम झोनच्या महिला अध्यक्षा सुरेखा कटारिया यांनी पारस मोदी यांच्या कार्याची महिती सादर करणारी डॉक्युमेंटरी जैन समाज का चमकता सितारा प्रदर्शित केली. आरवी अमित मोदी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन राष्ट्रीय महामंत्री शशिकांत कर्नावट, कोषाध्यक्ष विमल जैन व पदाधिकार्‍यांना शपथ देण्यात आली. यावेळी अहमदनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या. 
माजी अध्यक्ष मोहनलाल चोपडा, राष्ट्रीय महामंत्री अशोक पगारिया यांना सन्मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास देशभरातील 3000 हून अधिक सदस्य उपस्थित होते. कॉन्फे्रंसच्या 1 ते 5 झोन असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ नूतन अध्यक्ष मोदी यांच्याहस्ते झाला. यावेळी माजी अध्यक्ष केसरीमल बुरड जैन, जी. डी. जैन, अविनाश चोरडिया व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नावट शशिकांत यांनी आभार मानले.