नगर । प्रतिनिधी - जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी भारतभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. एकट्या नगर जिल्ह्यात दरवर्षी 1 हजार 500 अपघात होतात. यापैकी 900 जण मृत्यूमुखी पडतात. हा आकडा पाहिला तर आजार, भूकंप, युद्ध यापेक्षा जास्त माणसे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.
तिसाव्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या रस्ता सुरक्षेविषयीच्या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी अध्यक्षपदावरून शर्मा बोलत होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, मनपा उपायुक्त प्रदीप पठारे, जिल्हा शल्य चिकित्सक मुरंबीकर, बांधकाम विभाग अधिकारी, जि.प.चे अर्जुन आंधळे, वीज मंडळाचे विजय गीते, मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप, आरटीओ अधिकारी सलीम मुन्शी, अनुश्री केंदळे, टी.के.धायगुडे, श्वेता कुलकर्णी, अर्चना फटांगरे आदि उपस्थित होते.
शर्मा म्हणाले, रस्त्याचे नियम पाळल्यास अपघात कमी होतील. घरातील प्रमुख व्यक्ती गेल्यास काय परिस्थिती होते, हे घरातील लोकांनाच माहिती असते. तेव्हा वाहन चालविता येत नसेल तर रस्त्यावर वाहन आणू नये. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढते. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी आरटीओ व पोलिसांबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1 हजार 700 विद्यार्थी सहभागी झाले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके वाटण्यात आली. यावेळी शिक्षक अशोक डोळसे, सुनील पंडित यांच्यासह विविध मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, आरटीओ कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरटीओ अधिकारी विनोद घनवट यांनी केले, तर आभार अविनाश मोरे यांनी मानले.

No comments:
Post a Comment