नगर । प्रतिनिधी - नगर शहर व सावेडी उपनगरात धूमस्टाईल चोरांचा पुन्हा सुळसुळाट वाढला असून काल (गुरुवार) गंजबाजार, भुतकरवाडी व गुलमोहर रस्त्यावर तासाभरात धूमस्टाईल चोरांनी तीन महिलांच्या गळ्यातील दोन लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने लांबविले आहेत. या घटनांनी शहरातील महिलांमध्ये घबराट पसरली असून धूमस्टाईल चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
भुतकरवाडी चौकातील क्वॉलिटी दुकानासमोर प्रमिला विजय गांधी (वय 58, रा. भुतकरवाडी) या पतीसोबत गुरुवारी (दि. 7) सकाळी पावनेदहा वा. पायी जात असताना अनोळखी दोन इसम काळ्या रंगाच्या करिझ्मा मोटारसायकलवर आले. यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने प्रमिला गांधी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून नेले.
दुसर्या घटनेत जयप्रकाश बद्रीनारायण वाजीया (वय 70, रा. गंजबाजार) या व त्यांच्या आई गुरुवारी (दि. 7) सकाळी 11 वा. घरासमोरील ओट्यावर बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या ओळखीच्या मधुरा खंडेलवाल या देवदर्शनासाठी आल्या होत्या.
यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर दोन हेल्मेट घातलेले इसम आले. त्यांनी वाजीया यांची आई व मधुरा यांना दरोडेखोर आले असून सोने काढून ठेवा, असे म्हणून वाजीया यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 55 हजार रुपये किंमतीचे गंठण हातामध्ये ठेवले असता या चोरट्यांनी ते चोरुन नेले. याप्रकरणी जयप्रकाश वाजीया यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर गुलमोहर रस्त्यावर कुमोदिनी चांगदेव दुधाटे (वय 59, रा. मार्कंडेय सोसायटी, गुलमोहररोड) या त्यांच्या घरासमोर काल (गुरुवार) सकाळी पावनेबारा वा. कचरा टाकत असताना अज्ञात दोन इसम मोटारसायकलवर आले. त्यांनी दुधाटे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पीआय गोकावे व तोफखान्याचे पीआय संपत शिंदे यांनी धूमस्टाईल चोरट्यांचा शहरात शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. भुतकरवाडी व गुलमोहर रस्त्यावरील घटनेप्रकरणी प्रमिला गांधी यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन घटनेत एक लाख 88 हजार रुपयांचे सोने चोरट्यांनी लांबविले.

No comments:
Post a Comment