Showing posts with label epapr. Show all posts
Showing posts with label epapr. Show all posts

Monday, 22 April 2019

होमिओपॅथी उपचार पध्दती आनंदी जीवनशैलीचा मंत्र


नगर । प्रतिनिधी -
होमिओपॅथी जगात लोकप्रिय असलेली सर्वमान्य उपचार पध्दती आहे. या उपचारांतून आजार तर बरा होतोच याशिवाय निरोगी जीवनशैलीचाही मंत्र मिळतो. नगरमध्ये डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिक अशीच निरोगी व आनंदी जीवनशैली सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मागील पंधरा वर्षांपासून करीत आहे. याचा असंख्य रूग्ण लाभ घेत आहेत. विविध आजार तपासणी व उपचार शिबिरांच्या माध्यमातून या क्लिनिकने हाती घेतलेले कार्य खर्या अर्थाने वैद्यकीय पेशाचाही सन्मान वाढविणारे आहे, असे प्रतिपादन सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष सीए डॉ.परेश गांधी यांनी केले.
नगरमध्ये गेल्या दीड दशकापासून होमिओपॅथी उपचार सर्वांना उपलब्ध करून अनेक रुग्णांना व्याधीमुक्त करणार्‍या सारसनगर येथील डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकच्यावतीने सारसनगरमध्ये विविध आजारांवर होमिओपॅथी उपचारांची विशेष शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांचा समारोप प्रोस्टेट, हर्निया, स्पॉण्डीलायटीसीस तपासणी व उपचार शिबिराने झाला. यावेळी शिबिरासाठी सहकार्य करणारे सुनील चोरबेले यांच्यासह पलक बोरा, मनीषा चोरबेले, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा, डॉ.सचिन बोरा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा यांनी सांगितले की, 1 ते 13 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या या शिबिरांचा जवळपास 352 रूग्णांनी लाभ घेतला. विना इंजेक्शन, विना शस्त्रक्रिया परिणामकारक व दुष्परिणाम विरहीत उपचार होमिओपॅथीचे वैशिष्ट्य आहे. या शिबिरांमध्ये मूळव्याध, त्वचारोग, श्वसन समस्या, महिलांचे आजार, किडनी समस्या, केसांच्या समस्या, पोटाच्या समस्या, हाडांचे आजार, मानसिक समस्या, प्रोस्टेट हर्निया, स्पॉण्डीलायटीस अशा अनेक आजारांसह विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच मतिमंद, गतीमंद मुलांच्या संबंधित समस्यांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. प्रत्येक शिबिराला रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
वेळोवेळी अशी शिबिरे घेवून या अतिशय उपयुक्त उपचार पध्दतीचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर रूग्णांवरही विना शस्त्रक्रिया व विना इंजेक्शन उपचारांची सुविधा आहे. कॅन्सर रूग्णांना वेदनामुक्त व आनंदी जीवन जगता यावे यासाठी होमिओपॅथी पध्दतीने त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचाही लाभ अनेक रूग्णांना होत आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉ.सचिन बोरा यांनी आभार मानले.

दि. 23 ते 25 दरम्यान मास्टर अँड मिस फोटोजेनिक स्पर्धेची ऑडिशन


नगर । प्रतिनिधी -
येथील  प्रतिबिंब  संस्थेच्या वतीने फोटो, मॉडेलिंग, फॅशन, व्यक्तिमत्व सौंदर्य यावर आधारित फोटोजेनिक 2019 स्पर्धा घेण्यात येणार असून तसेच विविध टायटल देण्यात येणार आहेत. त्यासाठीची ऑडिशन दि. 23 ते 25 एप्रिलला रोज दु. 3 ते संध्या. 7 पर्यंत स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर येथे होणार आहे.
नगरमध्ये मागील वर्षी साईबनमध्ये बेस्ट फेस ऑफ अहमदनगर सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी  मास्टर/ मिस्टर/मिस /ि मसेस फोटोजेनिक 2019 स्पर्धा  घेत आहोत अशी माहिती मुद्रा कांबळे यांनी दिली.
स्पर्धा पुढील  गटात घेतल्या जाणार असून जेन्टस -1) 5 ते 15व योगट मास्टर फोटोजेनिक  2) 15 वर्षपुढील मिस्टर  फोटोजेनिक  लेडीज - 1) 5 ते 15 वयोगट लिटिल  फोटोजेनिक 2)  15 ते 25 मिस फोटोजेनिक 3)25 वर्षांपुढील मिसेस  फोटोजेनिक असे गट आहेत.  स्पर्धेत विविध बक्षिसे व टायटल देण्यात येणार आहेत. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ऑडिशनमधून निवड झालेल्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी खास प्रोफेशनल ट्रेनर आहेत. तसेच त्यांचे फोटोसेशन करून पोर्टफोलिओ अल्बम बनविण्यात  येणार आहेत. नंतर त्यांची फायनल स्पर्धा होणार आहे.
निवड झालेल्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा सर्व उपक्रम मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर.मो. 9822118913 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात उन्हाचा पारा वाढला


नगर । प्रतिनिधी -
शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, तापमान 40 अंशांच्या घरात जात असल्याने नगरकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
गेल्या दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर उन्हाचा पारा पुन्हा वाढला आहे. तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तीन दिवस उन्हाची तीव्रता जाणवली नाही. शहरात सध्या राजकीय वातावरण जसे जसे तापत गेले तसाच उन्हाचा जोरही वाढत गेला असल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिना सुरु झाला तशी तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-अधिक होत राहिले. गेल्या आठवड्यापासून शहरातील तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला आहे. दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नगरकर घराबाहेर पडणे टाळत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असूनही शहरातील रस्त्यावर  दुपारी सामसूम दिसत होती. दिवसभराचा उकाडा व त्यात भारनियमनाचा त्रासही सहन करावा लागत आहे.

संत निरंकारी चॅरिटेबलतर्फे बुधवारी रक्तदान शिबिर


नगर । प्रतिनिधी -
निरंकारी मिशनतर्फे बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या स्मृती दिवसानिमित्त 24 एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त बुधवार दि. 24 एप्रिल रोजी संत निरंकारी सत्संग भवन, मिस्कीन रोड येथे सकाळी 10 ते दु. 12.30 यावेळेत सत्संग प्रवचन तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या नगर शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मिस्कीन रोड, जॉगिंग पार्कसमोरील निरंकारी सत्संग भवन, नगर येथे सकाळी 9 ते दु. 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होईल.
शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल धूत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येईल. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती निरंकारी सेवा दल शिक्षक अनिल टकले यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या 24 वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित केली जात असून, निरंकारी भक्तगण व नागरिक मोठ्या श्रद्धेने येऊन रक्तदान करतात. सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे या कामी सहकार्य लाभते. तसेच जिल्ह्यातही निरंकारी मंडळाची शाखा असलेल्या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे दि. 24 एप्रिल या एकाच दिवशी देशभरात अनेक ठिक़ाणी रक्तदान शिबिरांचे आयेाजन केले जाणार असून त्याद्वारे एकाच दिवशी 20 हजारहून अधिक युनिटस् रक्त संकलित होणार आहे.

मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ


नगर । प्रतिनिधी -
वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या वतीने नगरमध्ये साळी समाजातील सर्व महिला, मुली व मुलांसाठी  मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कॉम्प्युटर, शिवणकाम, ब्युटीपार्लर व फोटोग्राफीच्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे  उद्घाटन स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकेच्या जवळ, दिल्लीगेट, अहमदनगर येथे राज्य स्वकुळसाळी समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा  सौ. मृणाल कनोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  सुषमा साळी, मंगला मानकर, प्रशिक्षक सौ. अनुजा कांबळे, महेश कांबळे, सुनील साळी, सौ.सविता हावरे, महेश ढोरजे यांच्यासह फाउंडेशनचे संपर्क प्रमुख, प्रशिक्षणार्थी, समाजबांधव उपस्थित होते.
मृणाल कनोरे म्हणाल्या की, मोफत प्रशिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत मोफत प्रशिक्षण मिळत होते, आता सध्याचा जमान्यात मोफत देणे अवघड आहे तरी वर्ल्ड साळी फाउंडेशनने नोकरी न करता समाजातील युवक-युवतींनी स्वतःचा व्यवसाय करावा या हेतूने आयोजलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
या शिबिरात वय वर्षे 15 च्या वरील कोणीही समाजबांधव सहभागी होऊ शकतो. असे संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिर पूर्ण  करणार्‍यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय/निमशासकीय स्तरावरील कर्ज योजना यांच्या माहितीद्वारे मदत करण्यात येईल.
तसेच असहाय, गरीब, गरजू महिला, मुली व मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रचार समाप्तीनंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना जाहीर प्रचारास मनाई


नगर । प्रतिनिधी -
लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) मतदान होणार असून त्यासाठीचा जाहीर प्रचार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. मतदानापूर्वी 48 तास आधी कोणत्याही राजकीय पक्ष आणि उमेदवारांस जाहीर प्रचारास तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. चलचित्र, बल्क एसएमएस,  दूरचित्रवाणी किंवा अन्य तत्सम साधनांच्या साह्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करता येणार नाही.  याशिवाय, वृत्तपत्रात दिनांक 22 व 23 एप्रिल रोजी द्यावयाच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घ्याव्या लागणार आहेत. राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
दिनांक 10 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु करण्यात आली. अर्ज माघारीच्या दिवसानंतर अहमदनगर मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात राहिले. त्यानंतर खर्‍या अर्थाने उमेदवारांच्या जाहीर प्रचारास सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली. त्यांच्या मार्फत उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचाराकडे प्रशासन लक्ष ठेवून होते. दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी जाहीर प्रचार अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. मात्र, उमेदवार वैयक्तिकरित्या प्रचार करु शकतील. परंतु पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव असेल.
 मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून 200 मीटर दूर पोलींग बूथ लावावा लागणार आहे. याशिवाय, याठिकाणी त्यांना केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवता येणार आहेत.  निवडणूक आयोगाच्या या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणार आहे.

कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट प्रदान


नगर । प्रतिनिधी -
नुकत्याच परिक्षा संपून सुट्या सुरु झाल्या आहेत. परंतु अनेक मुले ही मोबाईल, व्हीडिओ गेम, कॉम्प्युटरमध्ये अडकून पडलेले दिसत आहेत. यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे, याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान सुट्टीत मुलांना मैदानी खेळाकडे वळविले पाहिजे. कराटे खेळामुळे आत्मसंरक्षणाचे धडे मिळून आरोग्यही चांगले राहू शकते. आज विविध बेल्टमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंनी कठोर मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांच्या आणखी विकास होईल, असे प्रतिपादन वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.
वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील विद्यार्थी बेल्ट प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक हारुण शेख, प्रशिक्षक रमजान शेख, तन्वीर खान, अब्दुल शेख, ईशिता झंवर, मयुर माने, सोनल मिश्रा, प्रबोध बन, यश तासतोडे, बिलाल शेख, ईशान होसिंग, राहुल वाघ आदि उपस्थित होते.
संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : यल्लो बेल्ट - आर्यन गव्हाळे, ओमकार कवडे, स्पर्श भंडारी, प्रांजल पारधी, सई हरबा, श्लोक रानमळकर, अहम नहार, त्रिजल मेघानी, अनन्या झरकर, अमेय झरकर. ऑरेंज बेल्ट - शिवक्रांती विश्वकर्मा, स्वरा मुनोत, विधी गुंदेचा, प्रगती बागल, माही कवळे. ग्रीन बेल्ट - कृष्णा कोरडे, तनवी वारुळे, विराज होनराव, हर्षद खराडे, अभिनव काकडे, यशश्री कोरडे, शांभवी होनराव, श्रीजन विश्वकर्मा, विराज कांबळे, मुग्धा जेठे, आराध्या रोहमी, आर्यन गोरे, वैभवी भांबरे.
ब्लू बेल्ट - वैष्णवी खराडे, चिराग शिंगवी, साची पवार, उदय त्र्यंबके, आदित्य केदारी, अभि बंग, अदित्य साठे, सलज मिश्रा, आदित्य दरेकर, ओमकार माने. पर्पल बेल्ट - अवधूत बुरगुले, सिद्धार्थ थोरे, वैष्णवी भांबरे. ब्राऊन बेल्ट - करिष्मा क्षत्रिय, प्रांजल खाडे, तुळसीदास सोंडगे, प्रज्वल खाडे, ओमराज कदम, मयंक दिवटे, विशाल थोरे, समर्थ बोरुडे, वैष्णवी आबोलू, प्रीती जेठे. गोल्डन ब्राऊन बेल्ट - पुष्कर कापकर, यश कुलथे. ब्लॅक बेल्ट - आश्विन चंगेडे, ओमकार शिंदे, प्रतिक व्यवहारे.वरील सर्व खेळाडूंना बेल्ट प्रदान करण्यात आले. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री परशुराम प्रतिष्ठानच्यावतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन


नगर । प्रतिनिधी -
येथील श्री परशुराम प्रतिष्ठान च्या वतीने 3 मे ते 7 मे या कालावधीत भगवान श्री परशुराम जन्मोत्सव व अक्षय्य तृतीयेनिमित्ताने भव्य श्री परशुराम याग सावेडीतील श्री रेणुकामाता मंदिर सुयोग गृहनिर्माण सोसायटी, प्रोफेसर कॉलोनी चौक, सावेडी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे माळीवाडा येथील नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात, पुजारी महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, स्वप्नील देशमुख, सौ. मंजिरी देशपांडे, सौ.पद्मश्री देशपांडे,गजानन कुलकर्णी, सागर भोपे, गणेश भोपे, भार्गव देशपांडे, ढाकणे आदी उपस्थित होते.
शुक्रवार दि.3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता श्री क्षेत्र माहूर येथील मातृज्योत व श्रीक्षेत्र जानापाव कुटी, मध्यप्रदेश येथील भगवान श्री परशुरामाच्या पादुका तसेच उत्सव मूर्तीचे आगमन व महाआरती होणार आहे.
शनिवार दि.4 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भक्तीसंध्या कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 5 मे ते मंगळवार दिनांक 7 मे या कालावधीत दररोज सकाळी 6 वाजता भगवान श्री परशुराम याग होणार आहे. रविवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर व सायंकाळी 5 वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहेत. सोमवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धा, सायंकाळी 5 वाजता कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.
मंगळवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 1 वाजता  महाप्रसाद व सायंकाळी 5 वाजता रेणुका माता मंदिर ते भिस्तबाग चौक पाईपलाईन रोड येथे भगवान श्री परशुराम यांच्या पादुकांची भव्य शोभायात्रा होणार आहे. सायंकाळी 7 वाजता  भागवताचार्य ह.भ.प. वा. ना. उत्पात (श्रीक्षेत्र पंढरपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री 8 वाजता बक्षीस वितरण व 8.30 वाजता भगवान श्री परशुरामाची महाआरती होणार आहे.
खुल्या रांगोळी स्पर्धेसाठी साचेमुक्त रांगोळी, मुक्तहस्त, चित्र स्वरूप व ठिबक्यांची रांगोळी हा विषय ठेवण्यात आला आहे. पहिले ते चौथी या गटातील कथाकथन स्पर्धेसाठी भगवान श्री परशुराम हा विषय ठेवण्यात आला आहे. 5वी ते 7वी या गटातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी अक्षय्यतृतीया, भारत माझा देश आहे. 8वी ते 10वी या गटासाठी पाणीटंचाई व उपाय योजना, व्यसन एक समस्या, माझ्या स्वप्नातील भारत.11 ते टी. वाय. या गटासाठी आधुनिक भारतातील युवकांपुढील आव्हाने, एकविसाव्या शतकातील भारतीय युवकांच्या जबाबदार्‍या हे विषय ठेवण्यात आले आहे. 5 ते 7 या गटातील चित्रकला स्पर्धेसाठी संकल्पचित्र, तर 8 वी ते 10 वी या गटासाठी स्मरणचित्र हे विषय ठेवण्यात आले आहेत.
सर्व स्पर्धा रेणुका माता मंदिर सुयोग गृहनिर्माण सोसायटी, प्रोफेसर चौक, सावेडी या ठिकाणी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी संयोजन समिती सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन श्री परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे व सदस्यांनी केले आहे.

Saturday, 20 April 2019

उसाच्या एफआरपीप्रमाणे कांद्याबाबतही शाश्वत धोरणासाठी पाठपुरावा करणार


पारनेर । प्रतिनिधी -
साखर उद्योगाला संजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलेल्या एफआरपीच्या संरक्षणाप्रमाणेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बाबतीतही सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, जवळे, वाडेगव्हाण येथे महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांचा लाभ आज देशातील शेतकर्‍यांना होत आहे. यावर्षी 50 हजार मेट्रीक टन कांदा ‘नाफेड’ने खरेदी करुन शेतकर्‍यांना दिलासा दिला. पण कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या संदर्भात केंद्र सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेची ही निवडणूक आपल्या मतदारसंघात विचारांवर आधारित आहे. शेतकरी, पाणी, रोजगार या प्रश्नांवर मी माझी भूमिका प्रचारात सुरुवातीपासून मांडली. यासाठी विचारांचा वारसा लागतो, प्रश्नांवर बोलण्याची हिंमत लागते. समोरचे उमेदवार केवळ व्यक्तिद्वेषातून प्रचार करुन वेळ मारून नेत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही. या मतदारसंघासाठी ते काय करणार हेही ते सांगू शकत नाहीत. प्रश्नांसाठी त्यांना जनतेने संधी दिली होती, पण जनतेचे कोणतेही प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी ते बोलूही शकले नाहीत, असा टोला विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता लगावला.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आमदार विजयराव औटी, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, दिनेश बाबर, डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, काशिनाथ दाते, रामदास रोहकले, विश्वनाथ कोरडे, सुवर्णा वाळुंज आदी उपस्थित होते.

काटवन खंडोबा परिसरात टँकरच्या पाण्यासाठी झुंबड


नगर । प्रतिनिधी -
शहरालगत असलेल्या सीना नदी पलीकडील काटवन खंडोबा, गाझीनगर भागात 3 महिन्यांपासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्याचा टँकर आधार ठरत आहे. नळाला पाणी येत नसल्याने टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड उडत आहे. चार ते पाच दिवसांआड पाण्याचे टँकर येत असून, नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
गाझीनगर येथे दोन्ही बाजूंनी पाईपलाईन टाकण्यात आलेली असून, काही मोजके नळ सोडले तर मुख्य रस्त्याच्या आतील भागात असलेल्या नागरिकांच्या नळाला पूर्ण दाबाने पाणीच येत नाही.
हा त्रास 3 महिन्यांपासून नागरिक सहन करीत असून, ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. यामुळे पाणीप्रश्नावरुन नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे.

बैसाखीनिमित्त आयोजित पाककला, हेअर स्टाईल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी -
शीख-पंजाबी समाजाच्या वतीने शहरात बैसाखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवांतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, नुकतीच महिलांसाठी पाककला व हेअर स्टाईल स्पर्धा पार पडली. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात ही पाककला व हेअर स्टाईल स्पर्धा पार पडली. स्पर्धक महिलांनी विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवाणी उपलब्ध करुन दिली होती. तर आकर्षक केशरचनेचे सादरीकरण केले. बैसाखी उत्सवानिमित्त शनिवार दि.20 एप्रिल रोजी शीख-पंजाबी समाजाच्या वतीने हॉटेल संजोग येथे वीरसा पंजाबीया दा (बैसाखी मेला) हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पंजाबी गीतांवर आर्केस्ट्रा, पंजाबी ढोल, धाडसी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आदी विविध कार्यक्रमांसह पंजाबी, शीख समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रकला, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पंजाबी स्टोरी, मॉडेल मेकिंग, रॅम्प वॉक आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी भाई दयासिंगजी गोविंदपुरा, भाई कुंदनलालजी गुरुद्वारा, श्रीहर श्रीनाथ दर्गा, पंजाबी सेवा समिती, जी.एन.डी ग्रुप, गुरु गोबिंदसिंग पतसंस्था यांचे सहकार्य लाभत आहे. या कार्यक्रमात शीख, पंजाबी समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधी समाजातर्फे नाशिक येथे वधूवर परिचय संमेलन


नगर । प्रतिनिधी -
नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने दि. 5 मे रोजी सकाळी 9 ते 5 यावेळेत इच्छामणी लॉन, उपनगर नाशिक येथे सिंधी समाजाचे वधू-वर परिचय संमेलन होणार आहे. होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि. 1 मे आहे, अशी माहिती हरीश कटारिया, दीपक तोलाणी, सुनील शर्मा, किशोर कंत्रोड यांनी दिली. अधिक माहीतीसाठी नाशिक सिंधी सोशल ग्रुप, गुगल प्ले स्टोअसवरून अ‍ॅप सिंधी बंधन डाऊनलोड करणे, तसेच दीपक तोलानी (मो. 9822266372), विवेक - 8793906933, अनिकेत - 9320791610, सनी - 9689236476, जय - 9822991261. किशोर कंत्रोड मधुरमिलन मॅरेज ब्युरो (सोशल सर्व्हिस, किशोर प्रोव्हिजन स्टोअर्स इंदिरा कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) मोबा. 8999812408, 9226783101, 0241-2428224 यांच्याशी संपर्क साधावा. मेळाव्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंडित सुनील शर्मा, हरीश कटारिया, दीपक तोलानी, किशोर कंत्रोड व सर्व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

दैवशाला गर्जे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड


नगर । प्रतिनिधी -
2016 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या परीक्षेतून नागलवाडी, ता. शेवगांव येथील सौ.दैवशाला गर्जे-आंधळे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी  निवड झाली. गर्जे यांनी लग्नानंतर संसार सांभाळून शिक्षण करत इच्छाशक्ती मनाशी बाळगून हे यश मिळविले.  पती हर्षद रावसाहेब आंधळे यांच्या खांद्याला खांदा लावून संसार करतानाच परिस्थितीचा सामना करत प्रयत्नवादी विचारातून पुढे वाटचाल केली. दैवशाला यांनी नागलवाडी गावच्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान मिळवले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण हे वनवेवाडी येथे केले. पुढील शिक्षण हे शेवगाव, पाथर्डी येथे केले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

जागरुक नागरिक मंचतर्फे नगरच्या प्रश्नांवर महाचर्चा


नगर । प्रतिनिधी -
नगर शहर व जिल्हा गेल्या 30-40 वर्षांपासून आहे, त्या स्थितीत आहे. रस्ते, वीज, पाणी, खड्डे, बाह्यवळण रस्ता, एमआयडीसी, बेरोजगारी व उड्डाणपूल, अतिक्रमण अशा समस्यांनी ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीत होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी जागरुक नागरिक मंचने मतदार जागृती अभियान व मतदारांची उदासीनता हटवून 100 टक्के मतदान घडून आणण्यासाठी महार्चेचे आयोजन शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर केले होते. या महाचर्चेत आपली निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका मांडण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व 19 उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. मात्र केवळ तीन उमेदवारांनीच या महाचर्चेस उपस्थितीत लावली. उमेदवारांबरोबरच विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागरुक नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून ‘ऐतिहासिक नगर-भौगोलिक निवडणूक व संभ्रमात नागरिक’ जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या महाचर्चेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार साईनाथ घोरपडे, अ‍ॅड.कमल सावंत व फारुक शेख या तीन उमेदवारांनी आपली भूमिका मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्यावतीने अरविंद शिंदे यांनी भूमिका मांडली. त्याचबरोबरच सुरेखा सांगळे यांनी एमआयडीसीचा प्रश्न, नलिनी गायकवाड यांनी बाह्यवळण व सीना नदीचा प्रश्न, शारदा होशिंग यांनी स्वच्छतेचा प्रश्न, निर्मला भंडारी यांनी आय.टी.पार्कचा प्रश्न, विलास पेद्राम यांनी पहाटे सुटणार्‍या पाण्याचा प्रश्न, राजू शेख यांनी वाडिया पार्कमधील गाळ्यांचा प्रश्न या महाचर्चेत उपस्थित करुन थोडक्यात मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव कैलास दळवी यांनी केले तर आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, जयकुमार मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, अमृत बोरा, अनमान शेख, पुरुषोत्तम गारडे, योगेश गणगले, बी.यू.कुलकर्णी, अमेय मुळे आदींनी परिश्रम घेतले.

डोंगरगणच्या निसर्गरम्य परिसरातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी सरसावला महावीर चषक परिवार


नगर । प्रतिनिधी -
मागील वर्षी वरूणराजाने केलेली अवकृपा व आताच्या उन्हाळ्यात सूर्यनारायणाचा होत असलेला प्रकोप यामुळे प्रत्येकाची लाहीलाही होत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत केव्हाच आटले असून नगरजवळील हॅपी व्हॅली अशी ओळख असलेला गर्भगिरीच्या डोंगररांगेतील डोंगरगणचा परिसरही पाण्याअभावी मलूल झाला आहे. येथील पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगररांगातून खळखळ वाहणारे पाणी गायब झाले आहे. समस्त प्राणीमात्रांप्रती करूणेचा संदेश देणार्‍या भगवान महावीर स्वामींच्या जयंतीदिनी मुक्या प्राण्यांवर दया करा, अहिंसा परमो धर्म:, जगा व जगू द्या या तत्वांना अनुसरून नगरमधील महावीर चषक परिवाराने थेट डोंगरगण गाठून या भागातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी तब्बल 25 हजार लिटर पाणी टँकरने सोडले. या उपक्रमातून सर्वांनी प्रत्यक्ष कृती करून महावीरांचा संदेश आचरणात आणत महावीर जयंती साजरी केली. कडक उन्हात अवतरलेल्या या जलधारांनी वन्यजीवांसह पक्षी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मुक्या जीवांचा किलबिलाट श्रवण करीत सर्वांनी डोंगरदर्‍यात भटकंती केली आणि गप्पाष्टके रंगवत भेळभत्त्याचा आस्वाद घेतला.
कडक उन्हाळा व दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी निसर्गात मुक्तपणे विहार करणारे वन्यजीव, पक्षी यांचीही चारापाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: नगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरगण परिसरालाही यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. ब्रिटीशकाळात उन्हाळ्यात ब्रिटीश अधिकारी आवर्जून या निसर्गरम्य परिसरात जात असत. आता कमी पर्जन्यमान तसेच अन्य कारणांनी या निसर्गरम्य परिसरालाही उतरती कळा लागल्याने या डोंगरदर्‍यातील वृक्षवेली कोमजल्या आहेत. नैसर्गिक पाणवठे केव्हाच आटले आहेत. त्यामुळे वन्यजीव, पक्षी यांचीही तगमग होत आहे. त्यामुळेच महावीर चषक परिवाराने नगरहून टँकरने पाणी नेवून ते या भागातील नैसर्गिक पाणवठ्यात सोडण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी महावीर चषक परिवाराचे संजय चोपडा, राजेंद्र ताथेड, प्रीतम पोखरणा, प्रफुल्ल मुथा, डॉ.सचिन बोरा, प्रवीण शिंगवी, सी.ए.आनंद गांधी आदी उपस्थित होते. निसर्ग मित्र मंडळाचे भैरवनाथ वाकळे, राजेंद्र गांधी व त्यांचे समविचारी सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून या भागात टँकरने पाणी सोडून वन्यजीवांना मायेचा ओलावा देत आहेत. त्यांनी तब्बल 10 टँकर पाणी या परिसरात सोडले आहे. ऋषीकेश लांडे, विद्यासागर पेटकर, संजय दळवी यांनीही या उपक्रमात सहभाग घेत पक्ष्यांची, वन्यजीवांची माहिती देत आपल्या कॅमेर्‍यात या सजीवांचे बागडणे कैद केले. चिमणी, निलीमा, किंगफिशर, होले, नर्तक यांच्यासह दुर्मिळ समजल्या जाणार्‍या शृंगी घुबडाचेही दर्शन यावेळी सर्वांना झाले. आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड व प्रितम पोखरणा यांनी यावेळी उन्हाळा संपेर्यंत या परिसरात महावीर चषक परिवार वेळोवेळी टँकरव्दारे पाणी सोडून वन्यजीव, पक्ष्यांची काळजी घेईल, असे सांगितले.
नगरकरांसाठी डोंगरगणचा परिसर पावसाळ्यातील निसर्ग पर्यटनाचे हक्काचे केंद्र आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी या परिसरातील हिरवळ गायब होत आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडणारे पक्षीही कोमजले आहेत. त्यांना त्यांच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम परिसरात नवचैतन्य आणणारा ठरला आहे. सर्वांनी अतिशय उत्साहात डोंगरगण परिसरात भटकंती करीत पक्ष्यांच्या किलबिलटाच्या मधुरसंगीताचा आनंद लुटला. भेळभत्त्याचा आस्वाद घेत मनमोकळ्या गप्पांचाही आनंद घेतला.

जिद्द व चिकाटी असेल तर यश नक्की मिळते ः पारगांवकर


नगर । प्रतिनिधी -
जिद्द, चिकाटी, सराव व प्रयत्नात सातत्य असेल तर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेत यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन लार्सन अँड टुर्बो कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर यांनी केले.
मंथन वेलफेअर फौंडेशन व साप्ताहिक ज्ञानवंतच्या वतीने माऊली संकुल सभागृहात आयोजित मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यूपीएससी रँकर आयपीएस जैब शेख, उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय साळवे, कार्डिओलॉजिस्ट  डॉ. संदीप गाडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर, ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेते मोहिनीराज गटणे, सुप्रसिद्ध कवी प्रा. प्रशांत मोरे आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पारगावकर म्हणाले, मंथन वेलफेअर फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व भविष्यातील विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन करीत आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
जैब शेख म्हणाले की, पालकांनी आता विद्यार्थ्यांना ससा आणि कासवाची जुनी गोष्ट सांगणे बंद केले पाहिजे. कारण सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सतत सतर्क व कार्यरत राहणे गरजेचे आहे.
डॉ. संदीप गाडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकावा. व मोठ्या हिंमतीने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. अभिनेत्री तेजा देवकर म्हणाल्या की, प्रत्येक मुलांमध्ये काही सुप्त गुण असतात. पालकांनी ते हेरले पाहिजेत व त्या गुणांना वाव दिला पाहिजे. प्रत्येक मुलाला परीक्षेत चांगलेच गुण मिळतील व प्रत्येक जण डॉक्टर, इंजिनिअर होणार नाहीत. मात्र मुलांना ज्या क्षेत्रात गती आहे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पालकांनी मुलांचे बालपण जपावे, त्यांना खेळू द्यावे, बागडू द्यावे, मित्र-मैत्रिणीमध्ये मिसळू द्यावे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून अभ्यासही करून घ्यावा.
यावेळी प्रशांत मोरे यांनी ‘हंबरुनी वासराला’, ’मला शाळेला पाठवायची माझी माय’, ’ऐका ऐका दोस्तांनो मायबापाची कहाणी’ अशा लोकप्रिय कविता सादर केल्या. अभिनेते मोहिनीराज गटणे म्हणाले की, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची रंगीत तालीम आहे. मंथन वेलफेअर फौंडेशनने या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कानाकोपर्‍यातील विद्वत्तेला वाव दिला. तुम्हाला मिळणारी पारितोषिके म्हणजे तुमच्या मेहनतीचे फळ आहे.
यावेळी मंथन वेलफेअर फौंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सचिन नरसाळे यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले. किशोर गोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील 250 हून अधिक विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

सप्तसूरच्या गीतरामायणात श्रोते मंत्रमुग्ध


नगर । प्रतिनिधी -
सप्तसूर फाऊंडेशनच्या वतीने गदिमा व बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माऊली सभागृहात गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सप्तसुरांनी सजलेल्या गीतरामायणातील निवडक गीते फाऊंडेशनच्या गुणी कलावंतांनी सादर केली. उपस्थित रसिकश्रोते या गीतांच्या भक्तीरसात न्हाऊन निघाले. सर्वांसाठी मोफत असलेल्या या कार्यक्रमास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सप्तसूर फाऊंडेशनचे कलाकार डॉ.विलास जोशी, डॉ.योगिनी वाळिंबे, रेखा जोशी, डॉ.स्मिता केतकर, डॉ.शिरीष कुलकर्णी, डॉ.रोहिणी काळे, डॉ.अविनाश वारे, डॉ.बाळासाहेब देवकर आणि डॉ.सचिन पानपाटील यांनी गीतरामायणातील निवडक 20 अजरामर गीते सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
डॉ.राजीव सूर्यवंशी यांनी आपल्या शैलीत रामकथा मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पाहुण्यांचे स्वागत फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विलास जोशी यांनी केले. डॉ.संगीता कुलकर्णी यांनी सप्तसूरची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अभिजीत पाठक, डॉ.अजित काळे, डॉ.प्राची पाटील, ज्योती दीपक, मनीषा सूर्यवंशी, डॉ.पोळ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास डॉ.फाटके, मॅक्स केअर हॉस्पिटल, डॉ.विजय पाटील, डॉ.सुंदर गोरे, डॉ.धनंजय वारे, मिलन गंधे, शिंगवी ज्वेलर्स, जोपासू प्रोडक्टस यांचे सहकार्य लाभले.

Friday, 19 April 2019

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी


नगर । प्रतिनिधी -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन नगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल खटल्यात आरोपी राजप्रसाद मामाप्रसाद शर्मा (37, खंडोबा वस्ती, जामखेड) याला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
शर्मा हा तेरावर्षीय पीडित मुलीच्या घरी 20 जानेवारी 2018 रोजी आला व मुलीस फिरावयास घेऊन जातो, असे सांगून सौताडा (ता. पाटोदा, बीड) येथे घेऊन आला, तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर शर्मा 30 जानेवारीला मुलीच्या घरी गेला, पत्नी आजारी आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगून मुलीला घेऊन गेला व तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने अत्याचाराची माहिती वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. सहारे यांनी केला व शर्मा यास अटक करून  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 चे कलम 5 व भादंविक 376 अन्वये दोषी धरुन शर्माला 10 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद तसेच भादंविक 506 अन्वये 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्राचार्य अर्जुनराव सदाफुले यांचे निधन


नगर । प्रतिनिधी -
नगर येथील बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त व सम्बोधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, समाज संघटक अर्जुनराव सदाफुले सर यांचे शुक्रवारी (दि. 19) रोजी निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाम येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सदाफुले सर हे आंबेडकरी चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते होते. विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग होता. गोरगरिब विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाच्या कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधी आ. जगतापांच्या पाठीशी


नगर । प्रतिनिधी -
राष्ट्रशक्ती संघटना पुणे आणि राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटी आयोजित पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींचा महामेळावा नुकताच नगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेण्यात आला. मेळाव्यात गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम काकडे, राष्ट्रशक्ती इन्वेस्टर को-ऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर, सचिव शहाजी अडसूळ, वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे, सचिव मुकुंदराव मोरे, आयोजक देवराम कार्ले व पॅन कार्ड क्लबचे गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीताराम काकडे म्हणाले, या सरकारने रोजगार निर्माण तर केला नाही उलट चांगल्या सुरू असणार्‍या संस्था बंद करून बेरोजगारी वाढवली आहे. शेतकरी देशोधडीला लावला आहे. युवक दिशाहीन केला आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून अराजकता माजवली आहे. लोकशाहीला या सरकारचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पॅन कार्ड  गुंतवणूकदारांमध्ये एकूण 55 लाख लोकांची फसवणूक झाली आहे. त्या 55 लाख लोकांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी ठामपणे उभी राहणार असून त्यांना न्याय देण्याचा काम पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न असल्यामुळे यात अनेक तरुणवर्ग गुंतला आहे. समाजानेही त्यांच्याकडे एक समंजस भावनेने पहावे.
माणिकराव विधाते यांनी पॅन कार्ड धारकांचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न केले जातील. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार  मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन आपला खासदार संसदेत पाठवण्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवली पाहिजे. या सरकारने बेरोजगारांची मोठी फसवणूक केली आहे. त्याचे उत्तर देण्याची हीच वेळ असल्याचे सांगत पाठिंब्याबद्दल पॅन कार्ड क्लब बाधितांचे आभार मानले. 
कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित होते.