नगर । प्रतिनिधी - नगरमधील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करणार्या चार ते पाच एजंटांनी वडगावगुप्ता (ता.नगर) येथील नितीन सुरेश ढेपे या शेतकर्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना आज सकाळी 10.30 वाजता शेतकर्याच्या मळ्यात घडली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ढेपे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. शेतकर्याला फायनान्सच्या एजटांकडून झालेल्या मारहाणीचा गावामधून निषेध व्यक्त केला जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, संबंधित फायनान्स कंपनीचे झोपडी कॅन्टीन परिसरात कार्यालय आहे. वडगाव गुप्ता येथील शेतकरी सुरेश मुरलीधर ढेपे यांनी या फायनान्सकडून कर्ज घेऊन आयशर कंपनीचा ट्रॅक्टर सहा महिन्यांपूर्वी घेतलेला आहे. एक हप्ता थकलेला असल्याने ढेपे यांना संबंधित फायनन्सच्या मॅनेजरचाही फोन आला होता. दोन दिवसात शेतकरी हप्ताही भरणार होता. परंतु आज गुरूवारी सकाळी 10.30 वाजता ढेपे यांच्या घराजवळ फायनान्सचे चार ते पाच कर्मचारी आले. यावेळी ढेपे यांचा मुलगा नितीन हा ट्रॅक्टरवर बसलेला होता. त्याला ट्रॅक्टरवरून खाली ओढून शिवीगाळ करीत दांडक्याने मारहाण केली. त्याचा शर्टही फाडला. जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून हे एजंट फरार झाले. याप्रकरणी सुरेश ढेपे व त्यांचा मुलगा नितीन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही ढेपेंनी केला आहे. नितीनला मुका मार लागला असून तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

No comments:
Post a Comment