Showing posts with label crime. Show all posts
Showing posts with label crime. Show all posts

Friday, 19 April 2019

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी


नगर । प्रतिनिधी -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन नगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल खटल्यात आरोपी राजप्रसाद मामाप्रसाद शर्मा (37, खंडोबा वस्ती, जामखेड) याला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
शर्मा हा तेरावर्षीय पीडित मुलीच्या घरी 20 जानेवारी 2018 रोजी आला व मुलीस फिरावयास घेऊन जातो, असे सांगून सौताडा (ता. पाटोदा, बीड) येथे घेऊन आला, तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर शर्मा 30 जानेवारीला मुलीच्या घरी गेला, पत्नी आजारी आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगून मुलीला घेऊन गेला व तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने अत्याचाराची माहिती वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. सहारे यांनी केला व शर्मा यास अटक करून  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 चे कलम 5 व भादंविक 376 अन्वये दोषी धरुन शर्माला 10 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद तसेच भादंविक 506 अन्वये 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Thursday, 18 April 2019

नगर दक्षिणमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोमात


नगर । प्रतिनिधी -
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून  19 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यांनी  निवडणुकीचा प्रचार जोमात सुरु केल्याने गल्लो गल्ली व वाड्या वस्त्यावर नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे. विविध पक्षांच्या  अनेक दिग्गजांच्या सभा थेट तालुकास्तरावर होत असल्याने या निवडणुकीची रंगत अधिकच वाढत चालली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
नगर लोकसभा मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आता निवडणूक विभागाची जबाबदारी वाढली आहे. एका मतदान यंत्रावर केवळ 15 उमेदवार आणि एक नोटा अशा 16 चिन्हांसाठी जागा असल्याने आता नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे ठेवावी लागणार आहेत.
सध्या प्रचार वैयक्तीक पातळीवर येवून ठेपला आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या विशेषतः बळीराजाच्या हाताला काम नसल्याने तेही प्रचाराच्या रणधुमाळीत सामिल झालेले दिसत आहेत. ग्रामीण भागात आयोजित केल्या जाणार्‍या जाहीर सभांना असणारी उपस्थिती हे त्याचे द्योतक आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता प्रचार जोमात सुरु आहे. भर उन्हात प्रचाराने वातावरण तापू लागले आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यासोबतच शेवटच्या टप्प्यातील राजकीय खेळी खेळण्यास सुरवात झाली आहे. नात्यागोत्याच्या राजकारणाने नगर दक्षिण व नगर उत्तर लोकसभा मतदारसंघात नेहमीच ठसा उमटविला आहे.  या निवडणुकीत दोन्हीही मतदार संघांत पक्षापेक्षा उमेदवाराचे नात्यागोत्याचे संबंध प्रभावी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकारणातील मुरब्बी नेतेही जातीपातीचे व नात्यागोत्याचे राजकारण करण्यावर लक्ष केेंद्रीत करु लागल्याने राजकीय अंदाज बांधणे कठीण झाले आहे. आता तर बड्या नेत्यांनी नात्यागोत्याच्या राजकारणात नवीन चेहरे आणून नवीन नवीन क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. आता कोण कोणाचा प्रचार करेल, हे सांगणे कठीण झाले आहे. मतदानासाठी आता अवघे 5 दिवस उरले असल्याने राजकीय खेळ्यांना ऊत आला असून कोण कोणाला तारणार आणि कोण कोलदांडा घालणार हे लवकरच समोर येणार आहे.

Wednesday, 10 April 2019

पत्नीच्या खून प्रकरणी पतीस आजन्म कारावास


नगर । प्रतिनिधी -
पत्नीस मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी दाखल खटल्यात आरोपी पती गोरक्षनाथ यादव गिते (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) यास जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी दोषी ठरवून आजन्म कारावास व रुपये पाच हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली.
खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील विष्णुदास भोर्डे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल बांदल यांनी सहाय्य केले.
खटल्याची थोडक्यात हकीगत अशी, रेणुका भाऊसाहेब कल्हापुरे यांचा विवाह सन 2011 मध्ये गोरक्षनाथ यादव गिते याच्याशी झाला होता. नंतरच्या काळात रेणुकाची धाकटी बहीण हिस गोरक्षनाथ गिते याचा भाऊ पांडुरंग याच्यासाठी मागणी झाली होती. ती रेणुका हिच्या आई-वडिलांना मान्य नव्हती. या कारणावरून गिते कुटुंबीय रेणुकाचा छळ करत होते.
यातून रेणुकाने विष प्राशन केले, असा बहाणा करून पती गोरक्षनाथ गिते याने तिला उपचारार्थ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वी ती मयत झाली. तिचा मृत्यू हा छातीतील बरगड्या फ्रॅक्चर व पोटात झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचा वैद्यकीय अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. खटल्यात मयत रेणुका हिचा भाऊ तसेच आई, डॉ. नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक नागवे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

Saturday, 23 March 2019

दरोड्याच्या तयारीतील टोळी अटक


नगर । प्रतिनिधी - श्रीरामपूरवरुन नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी चार मोटारसायकलींवरुन येत असलेल्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी देहरे टोलनाक्यावर सापळा लावून जेरबंद केले.
अल्तमश नासीर पठाण (वय 21, रा. श्रीरामपूर), अविनाश श्रीधर साळवे (वय 20, रा. राहुरी), सिराज उर्फ सोल्जर अयूब शेख (वय 23, रा. श्रीरामपूर), सागर गोरख मांजरे (वय 20, रा. श्रीरामपूर, हल्ली पाईपलाईन रोड, कोहिनूर मंगल कार्यालयामागे, नगर), भाऊसाहेब मधूकर गोरे (वय 26, रा. श्रीरामपूर), शाहरुख निसार पिंजारी (वय 22, रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन मोटारसायकलींवर पाठीमागे अरीफ गफूर शेख, अमोल नारायण होडगर (दोघे रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी) हे बसलेले होते. पोलिसांना पाहताच ते अंधाराचा फायदा घेऊन दुचाकींवरुन उड्या मारुन पळून बाजूच्या शेतात पळून गेले. आरोपींकडून एक लोखंडी सुरा, कटावणी, सत्तूर, दोन लाकडी दांडके व नायलॉन दोरी, 5 मोबाईल आणि चार मोटारसायकली असा एकूण 1 लाख 65 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी यातील एक दुचाकी भिंगारमधून तर एक श्रीरामपूरमधून चोरुन आणल्याची कबुली दिली. तर एक विवो कंपनीचा मोबाईल सर्जेपुरा येथून चोरी केल्याची सिराज शेख याने कबुली दिली. अल्तमश पठाण याच्यावर तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांत प्रत्येकी एक, सागर मांजरे याच्या विरोधात तोफखाना पोलिसात चार, सिराज शेख याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात 5, अविनाश साळवे याच्यावर राहुरी पोलिसांत 4, भाऊसाहेब गोरे याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसमध्ये दोन, शाहरुख पिंजारीच्या विरोधात श्रीरामपूर शहर व राहुरी पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. ते कोठे दरोडा टाकणार होते, याबाबत त्यांनी काहीही माहिती दिली नाही. या सर्वांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Thursday, 21 March 2019

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून मानवसेवेचे कार्य ः सविताताई फिरोदिया


नगर । प्रतिनिधी -
आनंदऋषीजी हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर आहे. ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर भाविकाच्या सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण होतात, त्याप्रमाणे या ठिकाणी येणारा प्रत्येक रुग्ण हा बराच होतो, असे प्रतिपादन साामाजिक कार्यकर्त्या सविताताई रमेश फिरोदिया यांनी केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅकण्ड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त  रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट व सौ.सविताताई रमेशजी फिरोदिया आयोजित प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सौ.सविताताई व रमेश फिरोदिया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा, संचालक अशोक कानडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, किशोर संघवी (जळगांव), शिबिरातील तज्ज्ञ डॉ.नरेंद्र मरकड, डॉ.सौ.माया मरकड, संतोष बोथरा, सतीश लोढा, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ.मनोहर पाटील, प्रकाश छल्लानी, कुंदन कांकरिया आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सुभाष गुंंदेचा म्हणाले, पुणे, मुंबईसारखी रुग्णसेवा येथे मिळत आहे. तज्ज्ञ डॉक्टर अल्पदरात ही सेवा देत आहेत. खर्‍या अर्थाने आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे.
शिवाजी शिर्के म्हणाले, साामजिक बांधिलकीच्या माध्यमातून अत्याधुनिक मशिनरी व तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत कमी दरात रुग्णसेवा हे हॉस्पिटल देत आहे. याचे इतरांनीही अनुकरण करावे, जेणेकरुन जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णसेवा मिळेल.
अशोक कानडे म्हणाले, प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. त्यामुळे गरिबांना उपचार घेणे अवघड जात आहे. अशा मोफत शिबिराच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलने सातत्याने हे महान कार्य सुरु ठेवले आहे.
संतोष बोथरा म्हणाले, दि. 28 मार्चला हॉस्पिटलच्या चौथ्या व पाचव्या मजल्याचे उद्घाटन होत असून, या ठिकाणी 18 बेडचे हायटेक आयसीयू, स्पेशल रुम, जनरल वॉर्ड व डायलेसिससाठी विशेष विभाग केला आहे.
 डॉ. नरेंद्र मरकड म्हणाले, जन्मजात व्यंग, मधुमेहामुळे होणार्‍या जुन्या जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहर्‍यावरील व्रण आदींवर प्लॅस्टिक सर्जरी करता येते. यामुळे रुग्णातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. हॉस्पिटलच्या माध्यमातून कमी दरात हे उपचार होत असल्याने सर्वसामान्यांना परडत आहेत.
या शिबिरात डॉ.नरेंद्र मरकड, डॉ.सौ.माया मरकड आदींनी रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले. शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले.
दरम्यान, शुक्रवार दि.22 मार्च रोजी कान, नाक, घसा शिबिर होणार असून, यामध्ये डॉ. सुकेशिनी गाडेकर रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.

भारतीय स्टेट बँकेतून आधुनिक व वेगवान सेवा ः महाप्रबंधक देवेंद्र कुमार


नगर । प्रतिनिधी -
संपूर्ण भारतात अग्रगण्य व मुख्य असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून आधुनिक व तत्पर सेवा सर्व ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीला वेग आला आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार, मोठे कारखानदार यांच्यासाठीही योजना राबवत आहे. भविष्यात स्टेट बँकेतून याहून अधिक वेगवान सेवा मिळतील, असे प्रतिपादन मुंबई परिमंडल-3 चे महाप्रबंधक देवेंद्र कुमार यांनी केले. 
महाप्रबंधक देवेंद्र कुमार यांनी नगरच्या भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखा, एमआयडीसी येथील क्षेत्रिय व्यवसाय कार्यालय व सावेडी शाखेस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. एमआयडीसीमधील क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शाखाधिकार्‍यांना महत्वाची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद विभागाचे उपमहाप्रबंधक एस.बी.पल्ले, क्षेत्रिय प्रबंधक सुबेध चव्हाण आदींसह जिल्ह्यातील सर्व शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते. 
शाखा व्यवस्थापकांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी मार्च एण्डमुळे कामास गती देण्याच्या सूचना करण्याबरोबरच प्रलंबित कामे पूर्ण करणे, थकित कर्ज वसुली करुन एनपीए कमी करणे, शाखांमधील ठेवी वाढविणे, कर्जखाती वाढविणे आदींबाबत महत्वाच्या सूचना केल्या.

Thursday, 28 February 2019

गुलमोहर रस्त्यावर कारची स्कूलबसला धडक


नगर । प्रतिनिधी - सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावर आज (गुरुवार) सकाळी एका खासगी शाळेच्या बसला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यात कारचालक जखमी झाला असून कारचे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील विद्यार्थी सुखरुप राहिले. खड्डेमय, अरुंद रस्त्यांमुळे सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी, पाईपलाईन, गुलमोहर रस्त्यावर अपघात होत आहेत.
गुलमोहर पोलिस चौकात आज सकाळी 8 वा. खाजगी शाळेची एक बस थांबली होती. या रस्त्याने जाणार्‍या कारने बसच्या मागील बाजूस धडक दिली. यात कारचालकाच्या डोक्याला मार लागला. बस चालकाने नागरिकांच्या मदतीने या कारचालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.
 या बसमध्ये विद्यार्थी होते. सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही. या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून या रस्त्यांची रुंदी करण्याची व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

नामवंत बँकेच्या गोल्ड लोन लिलावात बनावट सोने आढळल्याने लिलाव स्थगित


नगर । प्रतिनिधी - शहरातील एका नामांकित बँकेत गोल्ड लोन लिलावावेळी बनावट सोने आढळून आल्याने लिलाव स्थगित करण्यात आल्याचा प्रकार घडल्याची शहरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे ही बँक पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँकेच्या लक्षात आल्यावर लगेच त्यानी पंचनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 
नगर शहरातील एका नामवंत बँकेत बुधवारी (दि. 27) गोल्ड लोनसाठी ठेवण्यात आलेल्या सोन्याचा लिलाव निश्चित करण्यात आला होता. त्यासाठी 26 बॅग होत्या. त्या बॅगमध्ये किती सोेने होते याची मात्र माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. बँकेने लिलावासाठी सर्व 26 बॅग बाहेर काढल्या. त्यावेळी पहिल्या तीन बॅगमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यामुळे सर्वच अस्वस्थ झाले. या तिन्ही बॅगेचा कुठल्याही प्रकारे लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बँकेने लगेचच पंचनामा करुन घेतला. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. दरम्यान, संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या असल्या तरी त्यावर बँकेकडून केव्हा निर्णय घेण्यात येतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Wednesday, 27 February 2019

मनपाच्या मार्केट विभागाची साडेबारा लाखांची फसवणूक


नगर । प्रतिनिधी - महापालिकेच्या रस्ता बाजू शुल्कचे वसूल केलेले व दंडाचे असे एकूण साडेबारा लाख रुपये न भरता स्वत:च्या फायद्याकरिता वापरुन अपहार करुन मार्केट विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार वैभव रवींद्र खापरे (रा. विनायकनगर) याच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार 7 जुलै 2018 ते 29 जानेवारी 2019 या कालावधीत घडला. दरम्यान, या प्रकरणात आयुक्त राहुल द्विवेदी यांनी मार्केट विभाग प्रमुख कैलास हरिभाऊ भोसले याला नुकतेच निलंबित केले होते. आता गुन्हा दाखल करत आयुक्त द्विवेदी यांनी ठेकेदारालाही चांगलाच दणका दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की, मनपाचे मार्केट विभाग शहरातील फेरीवाल्यांकडून रस्ता बाजू शुल्क वसूल करते. यासाठी मनपा खाजगी ठेकेदाराला नियुक्त करते. रस्ता बाजू शुल्कसाठी अक्षय संजय सुपेकर यांनी निविदा दाखल केली होती. मात्र सुपेकर यांनी वैभव खापरे यांना संमतीपत्राद्वारे हा ठेका दिलेला होता. त्यानुसार ठेकेदार वैभव खापरे यांनी रस्ता बाजू मांडणी फी व स्लॉटर फीची वसूल केलेली रक्कम मनपात दर आठवड्याला हप्ते भरणे आवश्यक होते. निविदेतील अटीप्रमाणे ठेकेदार खापरे याने 10 लाख 6 हजार 641 रुपये कर मनपात भरणे आवश्यक होते. मात्र ती न भरल्याने करारनाम्याप्रमाणे 24 टक्के दंड म्हणजे दोन लाख 41 हजार 594 रुपये अशी एकूण 12 लाख 48 हजार 235 रक्कम मनपाच्या मार्केट विभागात जमा न करता स्वतःच्या फायद्याकरिता वापरुन रकमेचा अपहार करुन फसवणूक केली मनपाच्या मार्केट विभागाची साडेबारा लाखांची फसवणूक
आहे. याबाबत मनपाच्या मार्केट विभागातील कर्मचारी गयाजी सुंदर झिने (वय 56, रा. केडगाव) यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस सबइन्स्पेक्टर नयन पाटील हे करत आहेत.

Tuesday, 26 February 2019

बिंगो जुगारावर छापा


नगर । प्रतिनिधी- तोफखाना हद्दीत सुरु असलेल्या बिंगोची व्याप्ती आता सारसनगरमध्येही पोहचली आहे. सारसनगर येथील बिंगो जुगारावा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पाथकाने छापा टाकून 14 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि बिंगो जुगाराचे साहित्य असा एकुण 2 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
योगेश सुरेश खैरनार (वय 32, रा. चौधरी नगर, सोलापुररोड), शहानवाज नन्नीखान पठाण (वय 32 रा. पिंजारगल्ली), अशोक कोंडीबा गिते (वय 49, र. चिपाडेमळा, सारसनगर), देवीदास एकनाथ शिंदे (वय वय 35, रा. चिपाडेमळा, सारसनगर), बाळाासाहेब दिगंबर टाक (वय , वाघ गल्ली, नालेगाव), रावसाहेब शिंदुपंत काटे (वय 47, रा. सौरभनगर, भिंगार), अंबादास ढाकणे (वय 34, रा. सारसनगर), शेख इरफान गफ्फार (वय 19, पिंजारगल्ली),जालिंदर नवनाथ चितळे (वच, 48, रा. चितळवाडी, पाथर्डी), आसिफ रसुल सय्यद ( वय 45, रा. मंगलगेट हवेली, नगर), शिवाजी बबन मांडे (वय 46, रा. भवानी नगर, मार्केटयार्ड), निलेश मारुती जायभाय (वय 23, रा.त्रिमुर्ती चौक, सारसनगर), अल्ताफ चॉदखाँन पठाण (वय 22, साई कॉर्नर, सारसनगर), यांना अटक करण्यात आले आहे. तर मालक विजय जगताप (रा.सारसनगर ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. 
मार्केटयार्डजवळ हा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक पुनम पाटील, हवलदार संजय घोरपडे, सचिन जाधव, बाबासाहेब फसले, सागर द्वारके, बाळासाहेब मासाळकर, राजेंद्र फसले, यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

Monday, 25 February 2019

विनाक्रमांकाच्या पावती पुस्तकांमुळे सावेडी तलाठी कार्यालयात अनागोंदी


नगर । प्रतिनिधी - विनाक्रमांकाच्या पावती पुस्तकाद्वारे कामकाज चालत असल्याने सावेडी तलाठी कार्यालयातील अनागोंदी समोर येत असून, त्यातून प्रशासकीय कारभाराचा बट्ट्याबोळ झाला आहे. कार्यालयातील ‘झिरो तलाठी’ ही बनावट पावती पुस्तके छापून त्याद्वारे कर आकारणीच्या पावत्या देतात. या पावत्यांचे कुठलेही ऑडिट होत नसल्याचा गैरफायदा घेत या माध्यमातूनही शासनाची फसवणूक केली जात आहे.
सावेडी तलाठी कार्यालयाच्या कारभाराचा ‘अहमदनगर घडामोडी’ने गेल्या चार दिवसांपासून पर्दाफाश केल्याने महसूल विभागात एकच चर्चेचा विषय झाला आहे. 
सावेडी तलाठी कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून झिरो तलाठ्यांमुळे अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील झिरो तलाठी असलेल्या सुनीलच्या माध्यमातून बनावट पावती पुस्तके आणली जातात. त्या पावत्यांद्वारेच नागरिकांना कर आकारणीसंदर्भात पावत्या दिल्या जात आहेत.
 मात्र, या पावत्या कोठून आणल्या जातात याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या पावत्यांवर कुठलाही सिरीअल नंबर नसल्याने नागरिकांकडूनही त्याचा आग्रह धरला जात नाही. 
याचाच गैरफायदा घेतला जात आहे.

हरिषराव, तुम्हाला तर खुले आव्हान
वर्षानुवर्षांची थकीबाकीदारांची यादी जाहीर करुन त्यांनी अशा बड्या थकबाकीदारांकडून कर वसुली करावी. वर्षानुवर्षे थकबाकीदारांची यादी प्रसिध्द न करता त्यांच्याकडून केवळ मागील वर्षाची थकीत कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे हरिषराव तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीदारांची यादी जाहीर करुन त्यांच्याकडून लगेच कर वसुली करुन दाखवावी.

एकच फंडा, पेन्सिल आणि खोडरबर
कर वसुली करताना झिरो तलाठ्यांकडून पेन्सिल आणि खोडरबरचा सर्रास वापर केला जातो. बड्या थकबाकीदारांना वसुली करताना पेन्सिलवर आकडेवारी मांडून नंतर त्यांचा सोयीस्कर भरणा केला जातो. ही सर्व प्रक्रिया झिरो तलाठ्यांच्या माध्यमातून होत असताना सुनीलचे लक्ष मात्र मलिदा गोळा करण्यावरच असते.

त्या झिरोंची पाठराखण कशासाठी?
झिरो तलाठ्यांच्या माध्यमातून अनागोंदी कारभार चालत असून त्यांची येथून हकालपट्टी करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असताना प्रांत मॅडम यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी समिती नेमून कारवाईचा बडगा उगारला पाहिजे.

Thursday, 21 February 2019

सावेडी तलाठी कार्यालयाकडून वाढीव कर आकारणी


नगर । प्रतिनिधी- जिल्हाधिकार्‍यांचा आदेश धाब्यावर बसवून सावेडी तलाठी कार्यालयाकडून जनतेची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे आर्थिक हितसंबंध असलेल्या व्यक्तींना तलाठ्याकडून ‘सेटलमेंट’ करून सोयीस्कर कर आकारणी केली जात असून, त्यामुळे आधीच वादात असलेल्या महसूल विभागाचा अंदाधुंद कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने कर आकारणीसंदर्भात दर निश्चित केलेले असून, त्याची प्रतही तलाठी कार्यालयाकडे प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये रहिवाशांसाठी 72 पैसे चौ.मी., उद्योजकांसाठी 1.84 चौ.मी., वाणिज्यसाठी 2.16 चौ.मी. दर देण्यात आले आहे. मात्र, नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करुन रहिवाशांसाठी 2.81 चौ.मी., उद्योजकांसाठी 4.33, व वाणिज्यसाठी 4.33 याप्रमाणे दर आकरला जात आहे. 
मनमानी कारभार करून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात असून, गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयात सर्रासपणे हा प्रकार सुरू आहे. 
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीनुसार माहिती घेतली असता ‘अहमदनगर घडमोडी’ला यासंदर्भातील आदेशाची प्रत मिळाली. त्यानुसार कर आकारणीचा हा आदेश सन 2011मधील असून, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून गेल्या आठ वर्षांपासून सावेडी कार्यालयात वाढीव दर लावून नागरिकांची लूट होत असल्याचे पुढे आले आहे.

Tuesday, 19 February 2019

वाहनचालकांनी आपल्याबरोबरच दुसर्‍यांचीही काळजी घ्यावी


नगर । प्रतिनिधी - वाहनचालकांनी आपले वाहन रस्त्यावर आणताना त्यांना नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याबरोबरच दुसर्‍या वाहनचालकांनाही त्रास न होता काळजी घ्यावी. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांचे इन्शुरन्स नियमित भरण्याची काळजी घ्यावी. पालकांनीही आपल्या मुलांना हातात वाहन देताना वाहनाचा वेग न वाढविता व दिशादर्शक फलकांकडे लक्ष देऊन वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी भारतभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. यावर्षीच्या 30व्या सुरक्षा अभियानाचा समारोप पोलिस मुख्यालयातील बँक्वेट हॉल येथे झाला. याप्रसंगी खासदार गांधी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, वीज मंडळाचे विजय गिते, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप, आरटीओ अधिकारी सलीम मुन्शी, अनुश्री केंदळे, टी. के. धायगुडे, श्वेता कुलकर्णी, अर्चना फटांगरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात दीपक पाटील म्हणाले, हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. रस्ते अपघातात देशामध्ये दरवर्षी एक ते दीड लाखजण मृत्युमुखी पडतात. नागरिकांचे प्रबोधन होण्यासाठी, जनजागृतीसाठी हा कार्यक्रम घेतला जातो. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावणे, टेपरेकॉर्डर काढणे हा कार्यक्रम राबविण्यात आला. शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधनावर भर देण्यात आला. या सप्ताहामध्ये ओव्हरलोड, फिटनेस, हेल्मेट आदि बाबींची पूर्तता न करणार्यांवर केसेस करून मोठ्या प्रमाणावर दंडवसुली करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. श्री. शर्मा म्हणाले, रस्त्याचे नियम पाळल्यास अपघात कमी होतील. घरातील प्रमुख व्यक्ती गेल्यास काय परिस्थिती होते, हे घरातील लोकांनाच माहिती असते. तेव्हा वाहन चालविता येत नसेल तर रस्त्यावर वाहन आणू नये. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरटीओ अधिकारी विनोद घनवट यांनी केले, तर आभार शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ड्राईंग स्कूलचे संचालक, विविध खात्यांतील अधिकारी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 16 February 2019

जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर फेसबुकवर अपलोड


नगर । प्रतिनिधी- जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी काटवन खंडोबा येथील नीलेश अशोक काळे (वय 23) या तरुणाविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात असताना काटवन खंडोबा येथील नीलेश काळे याने फेसबुकवर जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर टाकल्याचे कोतवाली पोलीस ठाण्यातील सचिन गोरे या कर्मचार्‍यच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी शोध धेतल्यावर निलेश काळे हा काटवन खंडोबा येथील असलचे लक्षात आले. त्यानुसार पोलीसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली.
याप्रकरणी गोरे यांच्या फिर्यादीवरुन काळे याच्या विरुध्द समाजाच्या भावना दुखवणे, देशातील धार्मिक एकोपा टिकण्यास बाधक तसेच राष्ट्रीय एकात्मतेस बाधक असेआरोप करणारा आक्षेपार्ह मजकुर सोशल मिडीयावर प्रसारित केल्याप्रकरणी कोतवालीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Friday, 15 February 2019

कोठल्यात जुगार क्लबवर छापा


नगर । प्रतिनिधी - पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शहरातील कोठला झोपडपट्टीतील जी. एस. अ‍ॅटोमोबाईल समोरील बाजुच्या बोळीत मागच्या बाजूला सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार क्लबवर छाटा टाकला. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एकूण एक लाख 20 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यावेळी कादीर बाबुलाल शेख (वय 50, रा. मुकुंदनगर), अन्वर गफुर रज्जाक शेख (वय 52, बागडपट्टी), आरीफ बरकत भुतीया (वय 38, रा. मुकुंदनगर), इरफान इब्राहीम खान (वय 40, रा. शिंदे गल्ली, माळीवाडा), अब्दुल गफार अब्दुल रज्जाक (वय 52, रा. बागडपट्टी), जमीर कादर शेख (वय 32, रा. घासगल्ली, कोठला) या जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जुगार चालक गणेश कानडे (रा. कोठला झोपडपट्टी) हा फरार झाला आहे. उपअधीक्षक मिटके यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेडकॉन्स्टेबल सुयोग सुपेकर, पोलिस नाईक बाबासाहेब फसले, विकास साळवे, सचिन जाधव यांनी ही कारवाई केली.

पुलवामा हल्ल्याचे नगरमध्ये तीव्र पडसाद




नगर । प्रतिनिधी - जम्मू-काश्मिर येथील पुलवामा जिल्ह्यात काल (गुरुवार) दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसवर केलेल्या हल्ल्याचे आज (शुक्रवार) नगर शहरासह जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. सर्वपक्षीयांसह विविध संघटनांनी दहशतवाद्यांचा प्रतीकात्मक पुतळा, पाकिस्तानचा झेेंडा जाळून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादीने काल (गुरुवार) रात्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह गुणे चौक ते वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून या घटनेचा निषेध केला. यावेळी आ. अरुण जगताप, प्रा. माणिकराव विधाते यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध नोंदविला. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्यावतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज खान, शामराव वागस्कर, अनिस शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, 14 February 2019

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रिव्हॉल्वर धारकांना पोलीस ठाण्यात नोंदणी बंधनकारक


नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत रिव्हॉल्वर असणार्‍यांची नोंद पोलीस ठाण्यात केली जाणार आहे. त्यामध्ये राजकीय, बँक, पेट्रोलपंप, व्यापारी यांच्यासह आदींचा समावेश राहणार आहे. मात्र, ज्या व्यक्तींकडे रिव्हॉल्वर आहेत, त्यांचे जमा करण्यासंदर्भात संबंधितत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निर्णय घेणार आहेत. तसेच ज्या व्यक्तींकडे रिव्हॉल्वर नाही, परंतु परवाना आहे त्याचीही नोंदणी करणे बंधनकारक ठरणार आहे.
येत्या एप्रिल-मे मध्ये लोकसभेची निवडणूक दोन टप्प्यांत होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पूर्णतः खबरदारी घेतली जात आहे. नगरसह जिल्ह्यात विविध राजकीय व्यक्तींसह व्यापारी, पेट्रोलपंपचालक, बँकांना सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकार्‍यांकडून रिव्हॉल्वरला मंजुरी देण्यात येते. 
परंतु निवडणुूक काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी गुन्हेगारांना तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. परंतु रिव्हॉल्वहचा परवाना असलेल्या व्यक्तींकडून कुठलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून राजकीय व्यक्तीचे रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा करुन घेतले जातात, तर काहींना त्यांच्या नोंदी ठेवून पुन्हा परत केली जातात. त्यामध्ये व्यापार्‍यांना त्यामधून वगळण्यात येते. दरम्यान, नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या अधिकृत रिव्हॉल्वर धारकांच्या आता पोलीस ठाण्यात नोंदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी रिव्हॉल्वर धारकांनी आपल्याकडे कोणत्या कंपनीचे रिव्हॉल्वर आहे अथवा परवाना मिळाला परंतु रिव्हॉल्वह घेतले नाही, अशा व्यक्तींचीही नोंद ठेवली जाणार आहे.

Monday, 11 February 2019

नगर शहरात दुचाकी चोर्‍या वाढल्या


नगर । प्रतिनिधी - नगर शहरात घरासमोर, गेटच्या आत लावलेल्या दुचाक्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच चारचाकी वाहनेही लांबविण्याचे प्रकार वाढत चालले असून याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचे पहायला मिळत आहे.
नगर शहरातील विविध भागात दररोज अनेक दुचाक्या लांबविल्या जात आहेत. घरासमोरुन दुचाक्या चोरी होत असल्याने आता दुचाक्या लावायच्या कुठे असा सवालही उपस्थित केला जात नाही. नगर शहरात दुचाक्याही सुरक्षित राहत नसतील तर पोलिसांचा चोरट्यांना धाक-दरारा राहिलाच नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
दुचाकी चोरीची किरकोळ घटना असल्याने पोलिस याकडे कायमच दुर्लक्ष करतात. यामुळे दुचाकी चोरांचे फावत असून त्यांचा सुळसुळाट वाढतच आहे. नगर शहरात दुचाक्यांसह आता चारचाकी वाहनेही चोरुन नेली जात आहेत. पोलिस केवळ गुन्हा दाखल करुन घेतात. त्यानंतर पुढे काहीही होत नाही. आता पोलिसांनी या दुचाकी चोरांकडे मोर्चा वळविण्याची गरज आहे.

Friday, 8 February 2019

शेतकर्‍याला मारहाण करणार्‍या अज्ञातावर गुन्हा


नगर । प्रतिनिधी - नगर शहराजवळील वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील शेतकरी नितीन सुरेश ढेपे (वय 19) यांना ट्रॅक्टरचे हप्ते थकले म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कालच्या (गुरुवार) दैनिक अहमदनगर घडामोडीच्या अंकात फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून शेतकर्‍याला मारहाण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची एमआयडीसी पोलिसांकडून तात्काळ दखल घेण्यात येऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत नितीन ढेपे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, वडिलांनी सुमारे 8 महिन्यापूर्वी एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलेला आहे. गुरुवारी (दि. 7) सकाळी साडेदहा वा. ट्रॅक्टर (क्र. एमएच 16 बीझेड 3689) घरी जात असताना फोर्जिंग कॉलनीजवळ एका इसमाने ट्रॅक्टर थांबवला. तुमच्या ट्रॅक्टरचे हप्ते थकले आहेत. मी तुमचा ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे, असे तो इसम म्हणाला. त्यावर माझ्या वडिलांना येऊ द्या, असे नितीन ढेपे म्हणाले. त्याचा राग आल्याने ढेपे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना ढकलून दिले. या मारहाणीत ढेपे यांच्या पाठीला व छातीला मार लागला आहे, असे या जबाबात म्हटले आहे. ढेपे हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या जबाबावरुन एमआयडीसी पोलिसांत भादंविक 323 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगर शहरासह उपनगरात धूमस्टाईल चोरांचा धुमाकूळ


नगर । प्रतिनिधी - नगर शहर व सावेडी उपनगरात धूमस्टाईल चोरांचा पुन्हा सुळसुळाट वाढला असून काल (गुरुवार) गंजबाजार, भुतकरवाडी व गुलमोहर रस्त्यावर तासाभरात धूमस्टाईल चोरांनी तीन महिलांच्या गळ्यातील दोन लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने लांबविले आहेत. या घटनांनी शहरातील महिलांमध्ये घबराट पसरली असून धूमस्टाईल चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
भुतकरवाडी चौकातील क्वॉलिटी दुकानासमोर प्रमिला विजय गांधी (वय 58, रा. भुतकरवाडी) या पतीसोबत गुरुवारी (दि. 7) सकाळी पावनेदहा वा. पायी जात असताना अनोळखी दोन इसम काळ्या रंगाच्या करिझ्मा मोटारसायकलवर आले. यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने प्रमिला गांधी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून नेले. 
दुसर्‍या घटनेत जयप्रकाश बद्रीनारायण वाजीया (वय 70, रा. गंजबाजार) या व त्यांच्या आई गुरुवारी (दि. 7) सकाळी 11 वा. घरासमोरील ओट्यावर बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या ओळखीच्या मधुरा खंडेलवाल या देवदर्शनासाठी आल्या होत्या.
यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर दोन हेल्मेट घातलेले इसम आले. त्यांनी वाजीया यांची आई व मधुरा यांना दरोडेखोर आले असून सोने काढून ठेवा, असे म्हणून वाजीया यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 55 हजार रुपये किंमतीचे गंठण हातामध्ये ठेवले असता या चोरट्यांनी ते चोरुन नेले. याप्रकरणी जयप्रकाश वाजीया यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर गुलमोहर रस्त्यावर कुमोदिनी चांगदेव दुधाटे (वय 59, रा. मार्कंडेय सोसायटी, गुलमोहररोड) या त्यांच्या घरासमोर काल (गुरुवार) सकाळी पावनेबारा वा. कचरा टाकत असताना अज्ञात दोन इसम मोटारसायकलवर आले. त्यांनी दुधाटे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पीआय गोकावे व तोफखान्याचे पीआय संपत शिंदे यांनी धूमस्टाईल चोरट्यांचा शहरात शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. भुतकरवाडी व गुलमोहर रस्त्यावरील घटनेप्रकरणी प्रमिला गांधी यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन घटनेत एक लाख 88 हजार रुपयांचे सोने चोरट्यांनी लांबविले.