Showing posts with label social. Show all posts
Showing posts with label social. Show all posts

Monday, 22 April 2019

होमिओपॅथी उपचार पध्दती आनंदी जीवनशैलीचा मंत्र


नगर । प्रतिनिधी -
होमिओपॅथी जगात लोकप्रिय असलेली सर्वमान्य उपचार पध्दती आहे. या उपचारांतून आजार तर बरा होतोच याशिवाय निरोगी जीवनशैलीचाही मंत्र मिळतो. नगरमध्ये डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिक अशीच निरोगी व आनंदी जीवनशैली सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मागील पंधरा वर्षांपासून करीत आहे. याचा असंख्य रूग्ण लाभ घेत आहेत. विविध आजार तपासणी व उपचार शिबिरांच्या माध्यमातून या क्लिनिकने हाती घेतलेले कार्य खर्या अर्थाने वैद्यकीय पेशाचाही सन्मान वाढविणारे आहे, असे प्रतिपादन सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष सीए डॉ.परेश गांधी यांनी केले.
नगरमध्ये गेल्या दीड दशकापासून होमिओपॅथी उपचार सर्वांना उपलब्ध करून अनेक रुग्णांना व्याधीमुक्त करणार्‍या सारसनगर येथील डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकच्यावतीने सारसनगरमध्ये विविध आजारांवर होमिओपॅथी उपचारांची विशेष शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांचा समारोप प्रोस्टेट, हर्निया, स्पॉण्डीलायटीसीस तपासणी व उपचार शिबिराने झाला. यावेळी शिबिरासाठी सहकार्य करणारे सुनील चोरबेले यांच्यासह पलक बोरा, मनीषा चोरबेले, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा, डॉ.सचिन बोरा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा यांनी सांगितले की, 1 ते 13 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या या शिबिरांचा जवळपास 352 रूग्णांनी लाभ घेतला. विना इंजेक्शन, विना शस्त्रक्रिया परिणामकारक व दुष्परिणाम विरहीत उपचार होमिओपॅथीचे वैशिष्ट्य आहे. या शिबिरांमध्ये मूळव्याध, त्वचारोग, श्वसन समस्या, महिलांचे आजार, किडनी समस्या, केसांच्या समस्या, पोटाच्या समस्या, हाडांचे आजार, मानसिक समस्या, प्रोस्टेट हर्निया, स्पॉण्डीलायटीस अशा अनेक आजारांसह विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच मतिमंद, गतीमंद मुलांच्या संबंधित समस्यांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. प्रत्येक शिबिराला रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
वेळोवेळी अशी शिबिरे घेवून या अतिशय उपयुक्त उपचार पध्दतीचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर रूग्णांवरही विना शस्त्रक्रिया व विना इंजेक्शन उपचारांची सुविधा आहे. कॅन्सर रूग्णांना वेदनामुक्त व आनंदी जीवन जगता यावे यासाठी होमिओपॅथी पध्दतीने त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचाही लाभ अनेक रूग्णांना होत आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉ.सचिन बोरा यांनी आभार मानले.

दि. 23 ते 25 दरम्यान मास्टर अँड मिस फोटोजेनिक स्पर्धेची ऑडिशन


नगर । प्रतिनिधी -
येथील  प्रतिबिंब  संस्थेच्या वतीने फोटो, मॉडेलिंग, फॅशन, व्यक्तिमत्व सौंदर्य यावर आधारित फोटोजेनिक 2019 स्पर्धा घेण्यात येणार असून तसेच विविध टायटल देण्यात येणार आहेत. त्यासाठीची ऑडिशन दि. 23 ते 25 एप्रिलला रोज दु. 3 ते संध्या. 7 पर्यंत स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर येथे होणार आहे.
नगरमध्ये मागील वर्षी साईबनमध्ये बेस्ट फेस ऑफ अहमदनगर सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी  मास्टर/ मिस्टर/मिस /ि मसेस फोटोजेनिक 2019 स्पर्धा  घेत आहोत अशी माहिती मुद्रा कांबळे यांनी दिली.
स्पर्धा पुढील  गटात घेतल्या जाणार असून जेन्टस -1) 5 ते 15व योगट मास्टर फोटोजेनिक  2) 15 वर्षपुढील मिस्टर  फोटोजेनिक  लेडीज - 1) 5 ते 15 वयोगट लिटिल  फोटोजेनिक 2)  15 ते 25 मिस फोटोजेनिक 3)25 वर्षांपुढील मिसेस  फोटोजेनिक असे गट आहेत.  स्पर्धेत विविध बक्षिसे व टायटल देण्यात येणार आहेत. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ऑडिशनमधून निवड झालेल्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी खास प्रोफेशनल ट्रेनर आहेत. तसेच त्यांचे फोटोसेशन करून पोर्टफोलिओ अल्बम बनविण्यात  येणार आहेत. नंतर त्यांची फायनल स्पर्धा होणार आहे.
निवड झालेल्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा सर्व उपक्रम मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर.मो. 9822118913 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात उन्हाचा पारा वाढला


नगर । प्रतिनिधी -
शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, तापमान 40 अंशांच्या घरात जात असल्याने नगरकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
गेल्या दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर उन्हाचा पारा पुन्हा वाढला आहे. तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तीन दिवस उन्हाची तीव्रता जाणवली नाही. शहरात सध्या राजकीय वातावरण जसे जसे तापत गेले तसाच उन्हाचा जोरही वाढत गेला असल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिना सुरु झाला तशी तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-अधिक होत राहिले. गेल्या आठवड्यापासून शहरातील तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला आहे. दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नगरकर घराबाहेर पडणे टाळत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असूनही शहरातील रस्त्यावर  दुपारी सामसूम दिसत होती. दिवसभराचा उकाडा व त्यात भारनियमनाचा त्रासही सहन करावा लागत आहे.

संत निरंकारी चॅरिटेबलतर्फे बुधवारी रक्तदान शिबिर


नगर । प्रतिनिधी -
निरंकारी मिशनतर्फे बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या स्मृती दिवसानिमित्त 24 एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त बुधवार दि. 24 एप्रिल रोजी संत निरंकारी सत्संग भवन, मिस्कीन रोड येथे सकाळी 10 ते दु. 12.30 यावेळेत सत्संग प्रवचन तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या नगर शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मिस्कीन रोड, जॉगिंग पार्कसमोरील निरंकारी सत्संग भवन, नगर येथे सकाळी 9 ते दु. 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होईल.
शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल धूत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येईल. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती निरंकारी सेवा दल शिक्षक अनिल टकले यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या 24 वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित केली जात असून, निरंकारी भक्तगण व नागरिक मोठ्या श्रद्धेने येऊन रक्तदान करतात. सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे या कामी सहकार्य लाभते. तसेच जिल्ह्यातही निरंकारी मंडळाची शाखा असलेल्या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे दि. 24 एप्रिल या एकाच दिवशी देशभरात अनेक ठिक़ाणी रक्तदान शिबिरांचे आयेाजन केले जाणार असून त्याद्वारे एकाच दिवशी 20 हजारहून अधिक युनिटस् रक्त संकलित होणार आहे.

महावीर इंटरनॅशनल वीर-वीरा शिरुर केंद्राचे पदग्रहण


नगर । प्रतिनिधी -
समाजातील दुर्बल घटकांची विविध मार्गाने सेवाभावी कार्य करणार्‍या महावीर इंटरनॅशनल या संस्थेने 45 वर्षांत देश-विदेशात लौकिक प्राप्त केला व आज भगवान महावीर स्वामीजींच्या जन्मदिनी शिरुर (जि. पुणे) येथे सुनील बाफना व समीक्षा बाफना यांच्या प्रेरणेने वीर आणि वीरा केंद्राचे पदग्रहण होत आहे. त्यानिमित्त महावीरांना अपेक्षित असलेले सेवाभावी कार्य म्हणून या सदस्यांनी पुणे येथील नामांकित 15 डॉक्टर व हार्डीकर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने 400 रुग्णांची तपासणी करुन पुण्य कमावले, हे अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना यांनी केले.
बाफना यांच्या हस्ते वीर-वीरा सदस्यांचा शपथविधी पार पडला, यावेळी ते बोलत होते. झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा व वीरा माजी अध्यक्षा बरमेचा यांनी वीरांना शपथ दिली. नवकार मंत्र, महावीरांची प्रार्थनानंतर सर्व ज्ञात-अज्ञात मृतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.  सेक्रेटरी सुदर्शन दुगड यांनी उपस्थितांचे स्वागत करुन महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
नगरच्या वीरा केंद्र अध्यक्षा उज्ज्वला बोथरा यांनी महावीर चिन्हाने वीर-वीरांना सन्मानित करुन शुभेच्छा दिल्या. शिरुर केंद्राचे अध्यक्ष सुनील बाफना यांनी महाआरोग्य शिबिरास सहकार्य करणार्‍या डॉ. हर्डीकर व त्यांच्या सदस्यांचे आभार मानले व 400 हून अधिक रुग्ण आप्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. वीरा केंद्राच्या नूतन अध्यक्षा समीक्षा बाफना व सचिव सपना दुगड यांनी शिरुर शहरात महिला व युवतींसाठी भरीव सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला. उपाध्यक्ष अभय चोरडीया यांनी शिरुर केंद्राच्या नियोजित उपक्रमांचा आढावा सादर केला व शिरुरच्या समाजबांधवांचे सर्व उपक्रमांना सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.
सुप्रिका दुगड हिने या उपक्रमास उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल संघपति शांतीलालजी कोठारी यांनी तिचा सत्कार केला. लवकरच आपण शिरुर शहरात युवती केंद्र सुरु करु असे सुप्रिका हिने जाहीर केले व त्यास उपस्थित सर्व युवतींनी प्रतिसाद दिला. संघपति शांतीलाल कोठारी यांनी आपल्या भाषणात महावीर इंटरनॅशनलचे कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व या केंद्राद्वारे शिरुर येथे भरीव कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास नगर केंद्राचे माजी अध्यक्ष महेंद्र लोढा, उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा, संचालक मनोज शेटिया, माणकचंद कटारिया, राजेंद्र बोथरा, सुवालाल ललवाणी, श्रेणिक नहार व वीरा केंद्राच्या उपाध्यक्षा निर्मल बाफना, माजी अध्यक्षा सरला बरमेचा, अध्यक्षा उज्ज्वला बोथरा, वैशाली शेटिया, मंजुषा ललवाणी, सजनबाई कटारिया व सचिव सुरेखा संचेती, शोभा लोढा आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतीलाल बाफना, चोरडिया, दुगड आदी परिवार व शिरुरचे बंधू-भगिनी उपस्थित होते. वैभव गादिया यांनी आभार मानले.

मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ


नगर । प्रतिनिधी -
वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या वतीने नगरमध्ये साळी समाजातील सर्व महिला, मुली व मुलांसाठी  मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कॉम्प्युटर, शिवणकाम, ब्युटीपार्लर व फोटोग्राफीच्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे  उद्घाटन स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकेच्या जवळ, दिल्लीगेट, अहमदनगर येथे राज्य स्वकुळसाळी समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा  सौ. मृणाल कनोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  सुषमा साळी, मंगला मानकर, प्रशिक्षक सौ. अनुजा कांबळे, महेश कांबळे, सुनील साळी, सौ.सविता हावरे, महेश ढोरजे यांच्यासह फाउंडेशनचे संपर्क प्रमुख, प्रशिक्षणार्थी, समाजबांधव उपस्थित होते.
मृणाल कनोरे म्हणाल्या की, मोफत प्रशिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत मोफत प्रशिक्षण मिळत होते, आता सध्याचा जमान्यात मोफत देणे अवघड आहे तरी वर्ल्ड साळी फाउंडेशनने नोकरी न करता समाजातील युवक-युवतींनी स्वतःचा व्यवसाय करावा या हेतूने आयोजलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
या शिबिरात वय वर्षे 15 च्या वरील कोणीही समाजबांधव सहभागी होऊ शकतो. असे संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिर पूर्ण  करणार्‍यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय/निमशासकीय स्तरावरील कर्ज योजना यांच्या माहितीद्वारे मदत करण्यात येईल.
तसेच असहाय, गरीब, गरजू महिला, मुली व मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रचार समाप्तीनंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना जाहीर प्रचारास मनाई


नगर । प्रतिनिधी -
लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) मतदान होणार असून त्यासाठीचा जाहीर प्रचार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. मतदानापूर्वी 48 तास आधी कोणत्याही राजकीय पक्ष आणि उमेदवारांस जाहीर प्रचारास तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. चलचित्र, बल्क एसएमएस,  दूरचित्रवाणी किंवा अन्य तत्सम साधनांच्या साह्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करता येणार नाही.  याशिवाय, वृत्तपत्रात दिनांक 22 व 23 एप्रिल रोजी द्यावयाच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घ्याव्या लागणार आहेत. राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
दिनांक 10 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु करण्यात आली. अर्ज माघारीच्या दिवसानंतर अहमदनगर मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात राहिले. त्यानंतर खर्‍या अर्थाने उमेदवारांच्या जाहीर प्रचारास सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली. त्यांच्या मार्फत उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचाराकडे प्रशासन लक्ष ठेवून होते. दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी जाहीर प्रचार अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. मात्र, उमेदवार वैयक्तिकरित्या प्रचार करु शकतील. परंतु पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव असेल.
 मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून 200 मीटर दूर पोलींग बूथ लावावा लागणार आहे. याशिवाय, याठिकाणी त्यांना केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवता येणार आहेत.  निवडणूक आयोगाच्या या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणार आहे.

कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट प्रदान


नगर । प्रतिनिधी -
नुकत्याच परिक्षा संपून सुट्या सुरु झाल्या आहेत. परंतु अनेक मुले ही मोबाईल, व्हीडिओ गेम, कॉम्प्युटरमध्ये अडकून पडलेले दिसत आहेत. यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे, याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान सुट्टीत मुलांना मैदानी खेळाकडे वळविले पाहिजे. कराटे खेळामुळे आत्मसंरक्षणाचे धडे मिळून आरोग्यही चांगले राहू शकते. आज विविध बेल्टमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंनी कठोर मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांच्या आणखी विकास होईल, असे प्रतिपादन वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.
वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील विद्यार्थी बेल्ट प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक हारुण शेख, प्रशिक्षक रमजान शेख, तन्वीर खान, अब्दुल शेख, ईशिता झंवर, मयुर माने, सोनल मिश्रा, प्रबोध बन, यश तासतोडे, बिलाल शेख, ईशान होसिंग, राहुल वाघ आदि उपस्थित होते.
संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : यल्लो बेल्ट - आर्यन गव्हाळे, ओमकार कवडे, स्पर्श भंडारी, प्रांजल पारधी, सई हरबा, श्लोक रानमळकर, अहम नहार, त्रिजल मेघानी, अनन्या झरकर, अमेय झरकर. ऑरेंज बेल्ट - शिवक्रांती विश्वकर्मा, स्वरा मुनोत, विधी गुंदेचा, प्रगती बागल, माही कवळे. ग्रीन बेल्ट - कृष्णा कोरडे, तनवी वारुळे, विराज होनराव, हर्षद खराडे, अभिनव काकडे, यशश्री कोरडे, शांभवी होनराव, श्रीजन विश्वकर्मा, विराज कांबळे, मुग्धा जेठे, आराध्या रोहमी, आर्यन गोरे, वैभवी भांबरे.
ब्लू बेल्ट - वैष्णवी खराडे, चिराग शिंगवी, साची पवार, उदय त्र्यंबके, आदित्य केदारी, अभि बंग, अदित्य साठे, सलज मिश्रा, आदित्य दरेकर, ओमकार माने. पर्पल बेल्ट - अवधूत बुरगुले, सिद्धार्थ थोरे, वैष्णवी भांबरे. ब्राऊन बेल्ट - करिष्मा क्षत्रिय, प्रांजल खाडे, तुळसीदास सोंडगे, प्रज्वल खाडे, ओमराज कदम, मयंक दिवटे, विशाल थोरे, समर्थ बोरुडे, वैष्णवी आबोलू, प्रीती जेठे. गोल्डन ब्राऊन बेल्ट - पुष्कर कापकर, यश कुलथे. ब्लॅक बेल्ट - आश्विन चंगेडे, ओमकार शिंदे, प्रतिक व्यवहारे.वरील सर्व खेळाडूंना बेल्ट प्रदान करण्यात आले. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Saturday, 20 April 2019

उसाच्या एफआरपीप्रमाणे कांद्याबाबतही शाश्वत धोरणासाठी पाठपुरावा करणार


पारनेर । प्रतिनिधी -
साखर उद्योगाला संजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलेल्या एफआरपीच्या संरक्षणाप्रमाणेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बाबतीतही सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, जवळे, वाडेगव्हाण येथे महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांचा लाभ आज देशातील शेतकर्‍यांना होत आहे. यावर्षी 50 हजार मेट्रीक टन कांदा ‘नाफेड’ने खरेदी करुन शेतकर्‍यांना दिलासा दिला. पण कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या संदर्भात केंद्र सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेची ही निवडणूक आपल्या मतदारसंघात विचारांवर आधारित आहे. शेतकरी, पाणी, रोजगार या प्रश्नांवर मी माझी भूमिका प्रचारात सुरुवातीपासून मांडली. यासाठी विचारांचा वारसा लागतो, प्रश्नांवर बोलण्याची हिंमत लागते. समोरचे उमेदवार केवळ व्यक्तिद्वेषातून प्रचार करुन वेळ मारून नेत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही. या मतदारसंघासाठी ते काय करणार हेही ते सांगू शकत नाहीत. प्रश्नांसाठी त्यांना जनतेने संधी दिली होती, पण जनतेचे कोणतेही प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी ते बोलूही शकले नाहीत, असा टोला विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता लगावला.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आमदार विजयराव औटी, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, दिनेश बाबर, डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, काशिनाथ दाते, रामदास रोहकले, विश्वनाथ कोरडे, सुवर्णा वाळुंज आदी उपस्थित होते.

सिंधी समाजातर्फे नाशिक येथे वधूवर परिचय संमेलन


नगर । प्रतिनिधी -
नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने दि. 5 मे रोजी सकाळी 9 ते 5 यावेळेत इच्छामणी लॉन, उपनगर नाशिक येथे सिंधी समाजाचे वधू-वर परिचय संमेलन होणार आहे. होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि. 1 मे आहे, अशी माहिती हरीश कटारिया, दीपक तोलाणी, सुनील शर्मा, किशोर कंत्रोड यांनी दिली. अधिक माहीतीसाठी नाशिक सिंधी सोशल ग्रुप, गुगल प्ले स्टोअसवरून अ‍ॅप सिंधी बंधन डाऊनलोड करणे, तसेच दीपक तोलानी (मो. 9822266372), विवेक - 8793906933, अनिकेत - 9320791610, सनी - 9689236476, जय - 9822991261. किशोर कंत्रोड मधुरमिलन मॅरेज ब्युरो (सोशल सर्व्हिस, किशोर प्रोव्हिजन स्टोअर्स इंदिरा कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) मोबा. 8999812408, 9226783101, 0241-2428224 यांच्याशी संपर्क साधावा. मेळाव्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंडित सुनील शर्मा, हरीश कटारिया, दीपक तोलानी, किशोर कंत्रोड व सर्व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

जागरुक नागरिक मंचतर्फे नगरच्या प्रश्नांवर महाचर्चा


नगर । प्रतिनिधी -
नगर शहर व जिल्हा गेल्या 30-40 वर्षांपासून आहे, त्या स्थितीत आहे. रस्ते, वीज, पाणी, खड्डे, बाह्यवळण रस्ता, एमआयडीसी, बेरोजगारी व उड्डाणपूल, अतिक्रमण अशा समस्यांनी ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीत होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी जागरुक नागरिक मंचने मतदार जागृती अभियान व मतदारांची उदासीनता हटवून 100 टक्के मतदान घडून आणण्यासाठी महार्चेचे आयोजन शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर केले होते. या महाचर्चेत आपली निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका मांडण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व 19 उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. मात्र केवळ तीन उमेदवारांनीच या महाचर्चेस उपस्थितीत लावली. उमेदवारांबरोबरच विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागरुक नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून ‘ऐतिहासिक नगर-भौगोलिक निवडणूक व संभ्रमात नागरिक’ जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या महाचर्चेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार साईनाथ घोरपडे, अ‍ॅड.कमल सावंत व फारुक शेख या तीन उमेदवारांनी आपली भूमिका मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्यावतीने अरविंद शिंदे यांनी भूमिका मांडली. त्याचबरोबरच सुरेखा सांगळे यांनी एमआयडीसीचा प्रश्न, नलिनी गायकवाड यांनी बाह्यवळण व सीना नदीचा प्रश्न, शारदा होशिंग यांनी स्वच्छतेचा प्रश्न, निर्मला भंडारी यांनी आय.टी.पार्कचा प्रश्न, विलास पेद्राम यांनी पहाटे सुटणार्‍या पाण्याचा प्रश्न, राजू शेख यांनी वाडिया पार्कमधील गाळ्यांचा प्रश्न या महाचर्चेत उपस्थित करुन थोडक्यात मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव कैलास दळवी यांनी केले तर आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, जयकुमार मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, अमृत बोरा, अनमान शेख, पुरुषोत्तम गारडे, योगेश गणगले, बी.यू.कुलकर्णी, अमेय मुळे आदींनी परिश्रम घेतले.

डोंगरगणच्या निसर्गरम्य परिसरातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी सरसावला महावीर चषक परिवार


नगर । प्रतिनिधी -
मागील वर्षी वरूणराजाने केलेली अवकृपा व आताच्या उन्हाळ्यात सूर्यनारायणाचा होत असलेला प्रकोप यामुळे प्रत्येकाची लाहीलाही होत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत केव्हाच आटले असून नगरजवळील हॅपी व्हॅली अशी ओळख असलेला गर्भगिरीच्या डोंगररांगेतील डोंगरगणचा परिसरही पाण्याअभावी मलूल झाला आहे. येथील पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगररांगातून खळखळ वाहणारे पाणी गायब झाले आहे. समस्त प्राणीमात्रांप्रती करूणेचा संदेश देणार्‍या भगवान महावीर स्वामींच्या जयंतीदिनी मुक्या प्राण्यांवर दया करा, अहिंसा परमो धर्म:, जगा व जगू द्या या तत्वांना अनुसरून नगरमधील महावीर चषक परिवाराने थेट डोंगरगण गाठून या भागातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी तब्बल 25 हजार लिटर पाणी टँकरने सोडले. या उपक्रमातून सर्वांनी प्रत्यक्ष कृती करून महावीरांचा संदेश आचरणात आणत महावीर जयंती साजरी केली. कडक उन्हात अवतरलेल्या या जलधारांनी वन्यजीवांसह पक्षी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मुक्या जीवांचा किलबिलाट श्रवण करीत सर्वांनी डोंगरदर्‍यात भटकंती केली आणि गप्पाष्टके रंगवत भेळभत्त्याचा आस्वाद घेतला.
कडक उन्हाळा व दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी निसर्गात मुक्तपणे विहार करणारे वन्यजीव, पक्षी यांचीही चारापाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: नगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरगण परिसरालाही यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. ब्रिटीशकाळात उन्हाळ्यात ब्रिटीश अधिकारी आवर्जून या निसर्गरम्य परिसरात जात असत. आता कमी पर्जन्यमान तसेच अन्य कारणांनी या निसर्गरम्य परिसरालाही उतरती कळा लागल्याने या डोंगरदर्‍यातील वृक्षवेली कोमजल्या आहेत. नैसर्गिक पाणवठे केव्हाच आटले आहेत. त्यामुळे वन्यजीव, पक्षी यांचीही तगमग होत आहे. त्यामुळेच महावीर चषक परिवाराने नगरहून टँकरने पाणी नेवून ते या भागातील नैसर्गिक पाणवठ्यात सोडण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी महावीर चषक परिवाराचे संजय चोपडा, राजेंद्र ताथेड, प्रीतम पोखरणा, प्रफुल्ल मुथा, डॉ.सचिन बोरा, प्रवीण शिंगवी, सी.ए.आनंद गांधी आदी उपस्थित होते. निसर्ग मित्र मंडळाचे भैरवनाथ वाकळे, राजेंद्र गांधी व त्यांचे समविचारी सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून या भागात टँकरने पाणी सोडून वन्यजीवांना मायेचा ओलावा देत आहेत. त्यांनी तब्बल 10 टँकर पाणी या परिसरात सोडले आहे. ऋषीकेश लांडे, विद्यासागर पेटकर, संजय दळवी यांनीही या उपक्रमात सहभाग घेत पक्ष्यांची, वन्यजीवांची माहिती देत आपल्या कॅमेर्‍यात या सजीवांचे बागडणे कैद केले. चिमणी, निलीमा, किंगफिशर, होले, नर्तक यांच्यासह दुर्मिळ समजल्या जाणार्‍या शृंगी घुबडाचेही दर्शन यावेळी सर्वांना झाले. आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड व प्रितम पोखरणा यांनी यावेळी उन्हाळा संपेर्यंत या परिसरात महावीर चषक परिवार वेळोवेळी टँकरव्दारे पाणी सोडून वन्यजीव, पक्ष्यांची काळजी घेईल, असे सांगितले.
नगरकरांसाठी डोंगरगणचा परिसर पावसाळ्यातील निसर्ग पर्यटनाचे हक्काचे केंद्र आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी या परिसरातील हिरवळ गायब होत आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडणारे पक्षीही कोमजले आहेत. त्यांना त्यांच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम परिसरात नवचैतन्य आणणारा ठरला आहे. सर्वांनी अतिशय उत्साहात डोंगरगण परिसरात भटकंती करीत पक्ष्यांच्या किलबिलटाच्या मधुरसंगीताचा आनंद लुटला. भेळभत्त्याचा आस्वाद घेत मनमोकळ्या गप्पांचाही आनंद घेतला.

सप्तसूरच्या गीतरामायणात श्रोते मंत्रमुग्ध


नगर । प्रतिनिधी -
सप्तसूर फाऊंडेशनच्या वतीने गदिमा व बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माऊली सभागृहात गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सप्तसुरांनी सजलेल्या गीतरामायणातील निवडक गीते फाऊंडेशनच्या गुणी कलावंतांनी सादर केली. उपस्थित रसिकश्रोते या गीतांच्या भक्तीरसात न्हाऊन निघाले. सर्वांसाठी मोफत असलेल्या या कार्यक्रमास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सप्तसूर फाऊंडेशनचे कलाकार डॉ.विलास जोशी, डॉ.योगिनी वाळिंबे, रेखा जोशी, डॉ.स्मिता केतकर, डॉ.शिरीष कुलकर्णी, डॉ.रोहिणी काळे, डॉ.अविनाश वारे, डॉ.बाळासाहेब देवकर आणि डॉ.सचिन पानपाटील यांनी गीतरामायणातील निवडक 20 अजरामर गीते सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
डॉ.राजीव सूर्यवंशी यांनी आपल्या शैलीत रामकथा मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पाहुण्यांचे स्वागत फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विलास जोशी यांनी केले. डॉ.संगीता कुलकर्णी यांनी सप्तसूरची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अभिजीत पाठक, डॉ.अजित काळे, डॉ.प्राची पाटील, ज्योती दीपक, मनीषा सूर्यवंशी, डॉ.पोळ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास डॉ.फाटके, मॅक्स केअर हॉस्पिटल, डॉ.विजय पाटील, डॉ.सुंदर गोरे, डॉ.धनंजय वारे, मिलन गंधे, शिंगवी ज्वेलर्स, जोपासू प्रोडक्टस यांचे सहकार्य लाभले.

Friday, 19 April 2019

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी


नगर । प्रतिनिधी -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन नगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल खटल्यात आरोपी राजप्रसाद मामाप्रसाद शर्मा (37, खंडोबा वस्ती, जामखेड) याला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
शर्मा हा तेरावर्षीय पीडित मुलीच्या घरी 20 जानेवारी 2018 रोजी आला व मुलीस फिरावयास घेऊन जातो, असे सांगून सौताडा (ता. पाटोदा, बीड) येथे घेऊन आला, तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर शर्मा 30 जानेवारीला मुलीच्या घरी गेला, पत्नी आजारी आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगून मुलीला घेऊन गेला व तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने अत्याचाराची माहिती वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. सहारे यांनी केला व शर्मा यास अटक करून  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 चे कलम 5 व भादंविक 376 अन्वये दोषी धरुन शर्माला 10 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद तसेच भादंविक 506 अन्वये 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्राचार्य अर्जुनराव सदाफुले यांचे निधन


नगर । प्रतिनिधी -
नगर येथील बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त व सम्बोधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, समाज संघटक अर्जुनराव सदाफुले सर यांचे शुक्रवारी (दि. 19) रोजी निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाम येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सदाफुले सर हे आंबेडकरी चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते होते. विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग होता. गोरगरिब विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाच्या कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधी आ. जगतापांच्या पाठीशी


नगर । प्रतिनिधी -
राष्ट्रशक्ती संघटना पुणे आणि राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटी आयोजित पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींचा महामेळावा नुकताच नगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेण्यात आला. मेळाव्यात गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम काकडे, राष्ट्रशक्ती इन्वेस्टर को-ऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर, सचिव शहाजी अडसूळ, वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे, सचिव मुकुंदराव मोरे, आयोजक देवराम कार्ले व पॅन कार्ड क्लबचे गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीताराम काकडे म्हणाले, या सरकारने रोजगार निर्माण तर केला नाही उलट चांगल्या सुरू असणार्‍या संस्था बंद करून बेरोजगारी वाढवली आहे. शेतकरी देशोधडीला लावला आहे. युवक दिशाहीन केला आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून अराजकता माजवली आहे. लोकशाहीला या सरकारचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पॅन कार्ड  गुंतवणूकदारांमध्ये एकूण 55 लाख लोकांची फसवणूक झाली आहे. त्या 55 लाख लोकांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी ठामपणे उभी राहणार असून त्यांना न्याय देण्याचा काम पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न असल्यामुळे यात अनेक तरुणवर्ग गुंतला आहे. समाजानेही त्यांच्याकडे एक समंजस भावनेने पहावे.
माणिकराव विधाते यांनी पॅन कार्ड धारकांचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न केले जातील. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार  मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन आपला खासदार संसदेत पाठवण्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवली पाहिजे. या सरकारने बेरोजगारांची मोठी फसवणूक केली आहे. त्याचे उत्तर देण्याची हीच वेळ असल्याचे सांगत पाठिंब्याबद्दल पॅन कार्ड क्लब बाधितांचे आभार मानले. 
कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित होते.

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लायन्स क्लब प्रयत्नशील ः राजश्री मांढरे


नगर । प्रतिनिधी -
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लायन्स क्लब प्रयत्नशील आहे. लायन्स मिडटाऊनने सतत वंचित घटकातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आपले सामाजिक कार्य चालू ठेवले असून, मदतीच्या हातासह विद्यार्थ्यांना प्रेमाने प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून, भविष्यातील सक्षम भारत त्यांच्या माध्यमातून घडणार असल्याची भावना लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा राजश्री मांढरे यांनी व्ंयक्त केली.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील बाबा आमटे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नित्योपयोगी वस्तू, शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मांढरे बोलत होत्या. यावेळी अ‍ॅड.सुनंदा तांबे, प्रकल्प प्रमुख लतिका पवार, प्रा.शोभा भालसिंग, सविता जोशी, अमल ससे आदिंसह लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
 लायन्स मिडटाऊनच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. वंचितांच्या आनंदात मोठे समाधान मिळत असून, या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख लतिका पवार यांनी दिली. लायन्सच्या पदाधिकार्‍यांनी नित्योपयोगी वस्तू, शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असता वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव व हास्य फुलले होते.

600 जणांना रोजगाराचे प्रशिक्षण देणार ः सिन्हा


नगर । प्रतिनिधी -
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी केलेल्या पाहणीवरून असे निदर्शनास आले आहे की ग्रामीण भागातील तरुण वर्ग नोकरी, व्यवसायानिमित्ताने शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग ओस पडत आहे. शहरी भागातही नोकरी व्यवसाय न मिळाल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दृष्टीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 2019-20 या काळामध्ये नगर जिल्ह्यात 24 प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असून, त्या अंतर्गत 600 प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्धतेसाठीचे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रदीपकुमार सिन्हा यांनी दिली.
ग्रामीण बेरोजगार तरुण वर्गाला दारिद्र्यरेषेचे कार्डधारकांना त्यांच्या अवगत असलेल्या कलागुणांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित करून ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि बँकेच्या माध्यमातून कर्जरूपी अर्थसाह्य व अनुदान मिळून देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण (आरएसईटीआय)ला जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने स्थापन केलेले आहेत.
त्यानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र नाबार्ड यांनी संचलित अहमदनगर येथे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापना 2011 मध्ये करण्यात आली आहे. तेव्हापासून विविध व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी 80% प्रशिक्षणार्थी यांना शासकीय योजनेचे अनुदान व बँकेकडून कर्जरूपी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तरुण वर्गामध्ये स्वयंरोजगारासंबंधी जागृती निर्माण करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेमार्फत अहमदनगर अथवा तालुका या ठिकाणी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थींना दुपारचे जेवण व प्रशिक्षणाचा खर्च संस्थेमार्फत दिला जाईल. सदर प्रशिक्षण 6 ते 30 दिवसाचे असणार असून, यामध्ये शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढीपालन, ड्रेस डिझायनिंग महिला-पुरुष, मसाला पदार्थ निर्मिती, मेणबत्ती, अगरबत्ती निर्मिती, बेकरी आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Thursday, 18 April 2019

जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर


नगर । प्रतिनिधी -
जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी  37-अहमदनगर व दिनांक 29 एप्रिल रोजी 38-शिर्डी (अ.जा)  लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या दिवशी असणारे आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच जत्रा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मार्केट अ‍ॅन्ड  पेअर अ‍ॅक्ट 1862 चे कलम 7 (अ) अन्वये प्राप्त  झालेल्या अधिकाराचा वापर करुन हा आदेश दिला आहे. जिल्ह्यातील सीमेच्या हद्दीत दिनांक 23 एप्रिल अहमदनगर व दिनांक 29 एप्रिल शिर्डी ( अ.जा) लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी असणारे आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दिनांक 23 व 29 एप्रिल रोजी मतदानाच्या  दिवशी असणार्‍या जत्रा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 प्रक्रिया सुरु झाली असून  मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील तालुक्यांत व गावात भरणारे आठवडे बाजार, तसेच जत्रा यामुळे मतदान कामामध्ये कोणताही व्यत्यय येवू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मतदानाचे दिवशी  आठवडे बाजार बंद ठेवणे अथवा पुढे ढकलणे आवश्यक असल्याने मार्केट अ‍ॅन्ड फेअर अ‍ॅक्ट 1862  चेक कलम 5 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार दिनांक 23 एप्रिल रोजी 37- अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नगर तालुक्यातील आठवडे बाजार नगर शहर, पोखर्डी, खोसपुरी, खंडाळा व जत्रा आठवड, शिराढोण व नेवासा तालुक्यातील आठवडे बाजार माळीचिंचोरा, भेंडा बु., माका, सलाबतपूर, उपविभागीय दंडाधिकारी श्रीगोंदा- पारनेर भाग- श्रीगोंदा तालुक्यातील आठवडे बाजार मांडवगण, चिंभळे, देव दैठण, अजनूज व जत्रा पारगाव सुद्रीक व  पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार टाकळी ढोकश्वर, निघोज, देठणे गुंजाळ, उपविभागीय दंडाधिकारी कर्जत भाग - कर्जत तालुक्यातील आठवडे बाजार- राखीन व जामखेड तालुक्यातील आठवडे बाजार पिंपरखेड, जातेगाव व जत्रा फक्राबाद, धानोरा, बंजारवाडी.
उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी भाग - पाथर्डी  तालुक्यातील आठवडे बाजार करंजी व शेवगाव तालुक्यातील आठवडे बाजार खानापूर, आव्हाणे बु. व जत्रा प्रभुवडगाव. उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर भाग -  राहुरी तालुक्यातील आठवडे बाजार  म्हैसगाव, ब्राम्हणी , गुहा, सात्रळ व जत्रा राहुरी बु.
तसेच दिनांक 29 एप्रिल रोजी 38- शिर्डी (अ.जा) लोकसभा मतदार संघ-उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर भाग - श्रीरामपूर तालुक्यातील आठवडे बाजार मालुंजा, टाकळीभान, भोकर व जत्रा फत्त्याबाद,  उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग - संगमनेर तालुक्यात आठवडे बाजार आश्वी बु. व जत्रा शेडगाव, पिंपरणे व अकोले तालुक्यात आठवडे बाजार राजूर, वीरगाव, केळी रुम्हणवाडी.
उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी भाग राहाता तालुक्यातील आठवडे बाजार पिंप्रीनिर्मळ, पुणतांबा व कोपरगाव तालुक्यातील आठवडे बाजार - कोपरगाव नगरपरिषद हद्द (शहर) वरील दोन्ही लोकसभा मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद राहणार आहेत व जत्रा पुढे ढकलण्यात आले आहेत असेही   प्रशासनाकडून प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

शहरातील तिन्ही बसस्थानकांवर मतदार सहाय्यता कक्ष


नगर । प्रतिनिधी -
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघात  निवडणूक विषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या निमित्ताने नगर शहरातील बसस्थानक क्रमांक एक, दोन व तीनवर मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
मतदार माहिती फलक, मतदार सेल्फी पॉइंट, त्याबरोबरच मतदान यादीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी व मतदान केंद्राच्या अन्य माहितीसाठी 1950, एनव्हीएसपीडॉट इन, वॉटर हेल्पलाइन सुविधा, पीडब्ल्यूडी, मतदान केंद्रांची रचना इत्यादी निवडणूक व मतदान विषयक माहिती दर्शविणारे फलक मतदार सहायता कक्षात लावण्यात आले आहेत. तीन दिवसांमध्ये सुमारे दहा हजारपेक्षा जास्त नागरिकांनी या मतदार सहायता कक्षाला भेट देऊन आपल्या मतदान केंद्राची माहिती जाणून घेण्याबरोबरच मतदार जनजागृती प्रबोधनाची देखील माहिती घेतली.
लोकांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून मतदार जनजागृती स्पर्धेमध्ये सहभाग देखील घेतला. त्याचबरोबर मतदारांकडून संकल्पपत्र देखील भरून घेण्यात आली. भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक शाखा अहमदनगर यांच्या माध्यमातून स्वीप मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार सहायता कक्षाच्या उपक्रमासाठी  बसस्थानक आगार प्रमुख रामदास व्यवहारे,  शिवाजी कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. उपक्रमासाठी कॅम्पस अँम्बेसिडर राहुल पाटोळे, संदीप कुसळकर, डॉ.सौ.चोपडे यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निवडणूक हेमा बडे, स्वीप नोडल ऑफिसर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्ष्मण पोले, मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी मार्गदर्शन केले आहे.