Showing posts with label politics. Show all posts
Showing posts with label politics. Show all posts

Saturday, 23 March 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कापड बाजारामधील प्रचारफेरीस व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी आ.अरुण जगताप यांनी नगरमधील कापड बाजार, दाळमंडई, आडते बाजार या प्रमुख बाजारपेठेतून प्रचारफेरी काढली. भिंगारवाला चौकातील जैन मंदिरात मंगलपाठ करुन या प्रचारफेरीस सुरुवात झाली. आ.अरुण जगताप यांनी कापड बाजारामधील सर्व दुकानदार व्यापार्यांच्या गाठी-भेटी घेऊन नगर दक्षिणेत परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन केले.
कोहिनूर या प्रसिद्ध वस्त्रदालनात संचालक प्रदीप गांधी यांनी आमदार अरुण जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कोहिनूर दालनामधील दोनशेहून अधिक कर्मचार्‍यांशी आ.अरुण जगताप यांनी संवाद साधला.  तसेच ठिकठिकाणी व्यापारी वर्गाच्यावतीने आ.जगताप यांचे उत्स्फूर्त स्वागत करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अ‍ॅड.अशोक कोठारी, प्रदीप गांधी, प्रकाश पोखरणा, सुभाष पोखरणा, किरण व्होरा, विनोद नारंग, बन्सी आसनानी, राजेंद्र बोथरा, अनिल पोखरणा, माजी नगरसेवक संजय चोपडा, श्रेणिक शिंगवी, अजित बोथरा, श्याम देडगांवकर, सुमतीलाल कोठारी, फारुक रंगरेज, रमेश सोनीमंडलेचा, अशोक पितळे, ठाकूर नवलानी, मनोज कटारिया, बाळू धाडिवाल, नरेंद्र बाफना, राजू ओसवाल, अजित बोथरा, संजय ताथेड, मुन्ना चमडेवाला, विपुल शेटीया, पप्पू मुंदडा, हरिष खुबचंदानी, माणिक विधाते, संजय बोरा, ज्ञानेश्वर रासकर, राजेंद्र चोपडा आदी प्रमुख व्यापार्‍यांसह कापड बाजारामधील व्यापारी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी





नगर । प्रतिनिधी - सावेडी गावात सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सवाचे हे 19वे वर्ष होते. यानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच मोठ्या उत्साहात परिसरात मिरवणूक ही काढण्यात आली होती. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. या मिरवणुकीत लेझीमपथक, टाळ, वीणा, मृदंगाचा गजर करण्यात आला. 
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, उद्योजक किशोर वाकळे, सामाजिक कार्यकर्ते विष्णु काळे, बाळासाहेब वाकळे, शंकर बारस्कर, अशोक वाकळे, पुष्कर कुलकर्णी, शिवा आढाव आदी उपस्थित होते. महापौरांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. महापौर व नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी फुगडी खेळली.सर्व भाविक मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन


नगर । प्रतिनिधी - मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढाया करतांना अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरुन त्यांनी तत्कालीन साम्राज्यशाहींशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. जनतेची काळजी घेणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. आज त्यांच्या आदर्शवरच आपणास काम करायचे असून, जनतेच्या प्रश्नांसाठी लढले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे डॉ.सुजय विखे यांनी केले.
माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपाचे डॉ.सुजय विखे व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवाजी कदम, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, जगन्नाथ आंबेकर, प्रफुल्ल सावंत, अप्पू बेद्रे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले, त्याकाळी  आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदार आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार, किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासकाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. असा राजा पुन्हा होणे नाही. आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले पाहिजे, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदीनी आपले मनोगत व्यक्त केले. यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तोफा, मावळे, पोवाडा,  झेंडे यामुळे वातावरण शिवमय झाले होते.

राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. जुन्या बसस्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, लकीशेठ खुबचंदानी, नीलेश बांगरे, संजय बुधवंत, लहू कराळे, प्रतीक शिंगवी, सुरेश शहाणे, चंदूशेठ औशीकर, शिवाजी कराळे, सोनू जगताप आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा.माणिक विधाते म्हणाले की, महापुरुषांची जयंती फक्त घोषणा देवून वाद्यांवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार आत्मसात करुन प्रेरणा घेण्यासाठी आहे. 
छत्रपतींच्या विचारांनी काम करणारे राजकीय व्यक्तिमत्व लोकसभेत निवडून आल्यास खर्या अर्थाने विकासात्मक बदल घडणार आहे. मावळ्यांनी आपल्या जीवाभावाच्या राजांसाठी स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याचप्रमाणे आपल्या जीवाभावाच्या माणसासाठी राष्ट्रवादीच्या मागे सर्वसामान्य जनता या निवडणुकीत उभी राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुवेंद्र गांधींची बंडखोरी? नगरला तिरंगी लढत


नगर । प्रतिनिधी- नगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीचा पत्ता कट होऊन भाजपमध्ये नव्याने दाखल झालेले डॉ. सुजय विखे पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी समर्थकांच्या रविवारी (दि.24) रोजी नगर शहरात होणार्‍या मेळाव्यात खासदार दिलीप गांधी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ.सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर गांधी समर्थकांनी खा. गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी खासदार गांधी यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. खा. गांधी यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले असले तरी गांधी व कार्यकर्ते कितपत शांत राहणार हा संशोधनाचा विषय आहे.
दिलीप गांधी हे मोठ्या
विखेंची री ओढणार?
डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे वडील काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय यांचा भाजप प्रवेश हा त्यांचा निर्णय आहे.आपण काँग्रेसचे पाईक आहोत व काँग्रेसचेच काम करणार असल्याचे सांगितले. सध्या ते फक्त नगर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना नेमके काय सांगतात हे गुलदस्त्यात आहे, असो.
रविवारच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार दिलीप गांधी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता गांधी गटाच्या निर्णयाकडे विशेषत: विखे गटाचे लक्ष लागले आहे.
रविवारच्या मेळाव्यामध्ये सुवेंद्र गांधी यांचे नाव पुढे येण्याची चिन्हे आहेत. सुवेंद्र गांधी बंडखोर उमेदवार झाले तर खासदार दिलीप गांधी हे सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याप्रमाणे सुवेंद्रच्या बंडखोरीचा निर्णय सुवेंद्रचा आहे. आपण स्वत: पक्षाचे पाईक आहोत हा बहाणा ठेवतील असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Friday, 22 March 2019

अखेर विखेंच्या नावावर भाजपकडून ‘शिक्कामोर्तब’


नगर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीकडून नगर  दक्षिणच्या जागेवर लोकसभा  मतदारसंघासाठी एकदम  नवा  चेहरा देण्याचा विचार सुरू  होता आणि त्यातच सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करुन जवळपास आपली उमदेवारी निश्चित केली होती. काल गुरुवारी सायंकाळी सुजय विखे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून नगर दक्षिणच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे संग्राम जगातप यांच्या विरुध्द भाजपाचे सुजय विखे अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने विखे यांच्या नावाची अधिकृत  घोषणा  केल्यानंतर विखे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.  जिल्हाभरात विविध ठिकाणी फटाके फोडून त्यांच्या उमेदवारीचे  स्वागत करण्यात आले.
नगर जिल्ह्याला  धक्काशैलीचे राजकारण नवीन नसल्याने शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजेच उमेदवारी जाहीर होईपर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना होती. त्यातच विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी देऊ नये यासाठी  भाजपातील  एक गट सक्रिय झाला होता. सक्रिय झालेला हा गट आता विखे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने एक प्रकारे जिंकला आहे. मात्र, आता त्यांच्यापुढे निवडणुकीचे आव्हान उभे ठाकले असून भविष्यात गांधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिलीप गांधी यांनी जर पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधी पक्षातील उमेदवाराला मदत केली तर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील असाही प्रश्न आता जिल्ह्यात चर्चिला जात आहे.
उमेदवारीसाठी गांधी यांनी पहिल्या टप्प्यात पक्षश्रेष्ठींची भेट घेवून दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही असे आता म्हणता येईल. नगर दक्षिणसाठी प्रदेशपातळीवरूनच गेल्या वर्षभरापासून चाचपणी सुरू होती. त्यात गांधींना पक्षामधूनच विरोध होता, तो काही ठिकाणी छुपा तर काही ठिकाणी उघड अशी अवस्था होती. ती पक्षश्रेष्ठीनी समोर ठेवूनच नवीन चेहर्‍यासाठी तयारी केली होती. सुजय विखे यांच्या रुपाने त्यांना नवीन चेहरा मिळाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या या मतदारसंघावर भाजपाने आतापर्यंत दोन ते तीन वेळेस बाजी मारली आहे. सन 2014 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भाजपाकडे आला होता. आता तो कायम रहावा यासाठी पूर्ण  ताकदीने सुजय विखे प्रयत्न करतील.
नगर दक्षिणच्या या मतदारसंघात भाजपाची ताकद मोठी आहे. भाजपाचे तीन आमदार नगर दक्षिणमध्ये असल्याने भाजपला कितपत यश मिळणार हे देखील समोर येणार आहे. उमेदवार देऊन मतदारसंघ कायम ठेवायचा या विचारातूनच पक्षाबाहेरच्या पण प्रभावी असणार्‍या उमेदवाराबाबत विचार करण्यात आला असल्याने आता विखे यांना भाजपाचे किती नेते आणि किती कार्यकर्ते स्वीकारणार हा देखील प्रश्न आहे.  विखे यांच्या बरोबर जुने जाणते भाजपाचे ज्येष्ठ  पालकमंत्री राम शिंदे, प्रा.भानुदास बेरड, अ‍ॅड.अभय आगरकर,अ‍ॅड.अच्युतराव पिंगळे हे असल्याने त्यांना येणार्‍या अडचणीवर सहज मात करता येईल, अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

खा. दिलीप गांधींचा रविवारी शहरात कार्यकर्ता मेळावा


नगर । प्रतिनिधी - तीन वेळा खासदार होऊनही भाजपने उमेदवारी डावलल्याने खा. दिलीप गांधी यांनी निवडणुकीतील पुढील भूमिका ठरविण्यासाठी रविवारी (दि. 24) दुपारी 1 वा. नगर शहरातील टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे मतदार संघातील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांना निरोप पाठविण्यात आले आहेत. 
पुन्हा नगर दक्षिण मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून खा. दिलीप गांधी गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा गांधी यांना होती. त्याचप्रमाणे गांधी यांच्या कार्यकर्त्यांनीही आशा सोडलेली नव्हती. मात्र भाजपने काल (गुरुवार) सायंकाळी उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन नुकतेच भाजपमध्ये आलेले डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गांधी समर्थक नाराज झाले आहेत. गांधी समर्थकांनी काल रात्री उशिरापर्यंत खा. गांधी यांच्या बंगल्यासमोर गर्दी केली होती. यावेळी खा. गांधी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन निवडणुकीतील पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. 24) दुपारी एक वा. टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत कार्यकर्त्यांना निरोप पाठविण्यात आले आहेत.

Tuesday, 19 March 2019

विधानसभेचं गणित लक्षात घेता संग्राम जगताप लोकसभेसाठी?


नगर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्तरावर नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत चाचपणी सुरु असल्याने नगर लोकसभा मतदार संघात नेमकी लढत कोणत्या दोन उमेदवारांमध्ये होईल याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मुंबई येथील कार्यक्रमात त्यांच्या उमेदवारीची शिफारस भाजपा संसदीय बोर्डाकडे करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विखे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी डावलली जाईल असे बोलले जाते. परंतु आयात विखेंच्या उमेदवारीस खा. गांधी समर्थकांचा विरोध आहे. एकूणच आजमितीला भाजपा स्तरावर नेमके उमेदवार सुजय विखे पाटील की, विद्यमान खासदार दिलीप गांधी याचा उलगडा होणे बाकी आहे.
भाजपाचा उमेदवार अद्याप अंतिम नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर लोकसभेचे उमेदवार म्हणून आ.अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. राजकीय समीकरणांमध्ये शिवसेना-भाजपा यांच्यात झालेली युती ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कायम राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी आपली व्यूहरचना बदलली असून ते लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर सध्या आ.अरुण जगताप की आमदार संग्राम जगताप यापैकी कोणाला उमेदवारी द्यावयाची हा प्रश्न आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नगर लोकसभेसाठी आ.अरुण जगताप यांच्या नावाला पसंती आहे.
एका बाजूला एकूणच लोकसभा निवडणुकीपासून बाजूला राहण्याचे प्रयत्न करणारे आमदार संग्राम जगताप यांनी युतीचे समीकरण लक्षात घेऊन लोकसभेसाठी स्वत: इच्छुक असल्याचे पक्षस्तरावर कळविले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्तरावर जगताप कुटुंबात नेमके कोणाला उमेदवारी द्यावयाची या विषयीचा निर्णय होणार आहे.
आमदार कर्डिलेंची खेळी
नगर शहराच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय समीकरणे ही नेहमीच बेरजेची ठरली आहेत. सामाजिकदृष्ट्या त्यांची प्रतिमा काय आहे, यापेक्षा राजकीयदृष्ट्या ती नेहमीच मोठी राहिली व त्यांचे राजकीय निर्णयही फायद्याचेच राहिलेत. आगामी विधानसभा लक्षात घेऊन व निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युती लक्षात घेता त्यांच्या स्तरावरुन आ.संग्राम जगताप यांचा लोकसभेचा प्रस्ताव पुढे आल्याची चर्चा आहे.

Monday, 18 March 2019

गडाखांसोबतच्या अशोभनीय वर्तनाविरूद्ध साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


नगर । प्रतिनिधी - ज्येष्ठ साहित्यिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्व यशवंतराव गडाख यांच्यासोबत झालेल्या अशोभनीय वर्तणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यिक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन दिले.
0यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ.दीपक, जयंत येलूलकर, मा.आ.अनिल राठोड, प्रा.माणिक विधाते, मेधाताई काळे, शिवाजी साबळे, राजेंद्र गांधी, डी.एम.कांबळे, अशोक गायकवाड, पवन नाईक, संजू तनपुरे, सुरेश चव्हाण, राजेंद्र उदागे, श्रीनिवास बोजा, क्रांतीकला अनभुले, व्ही.एन देशपांडे, अंगद गायकवाड, साहेबान जहागीरदार, संतोष बलदोटा, डॉ.भूषण अनभुले, चंद्रकांत पालवे, बापू चंदनशिवे, शैलेश गवळी, ज्ञानेश शिंदे, अजित जगताप, मनीष चोपडा, अतुल रच्चा, संजय दळवी, हरिभाऊ डोळसे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव गडाख हे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अतिशय संस्कृत संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रासोबतच जिल्ह्यात सांस्कृतिक साहित्यिक जडण-घडण रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाला संदर्भात अटकेसाठी आलेल्या पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनी येथील निवासस्थानाची झडती घेतली. 
पोलिसांनी अशा प्रकारचे वर्तन केल्याने त्यांना मनस्ताप झाला असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी ही अपेक्षा तसेच झालेल्या प्रकाराची आपण आपल्या स्तरावर चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मानवसेवेच्या कार्यात दानशुरांचा सिंहाचा वाटा : डॉ. प्रकाश कांकरिया


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण तंतोतंत अंमलात आणण्यासाठी जैन सोशल फेडरेशन पूर्ण समर्पित भावनेने काम करीत आहे. या सेवाभावी कार्यात अनेक दानशूरांचा सहभाग असतो. अशा मदतीतूनच रूग्णसेवेचे मोठे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल अव्याहतपणे करीत आहे. या सेवाकार्याच्या विस्तारात अनेक ज्ञात-अज्ञात दानशूर मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. अशा मदतीमुळे मानवसेवेच्या कार्याचा विस्तार होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या चौथ्या व पाचव्या मजल्याच्या कामाचे लोकार्पण दि.28 मार्च रोजी होत आहे. या कार्याला हातभार म्हणून स्व.सौ सरयूताई रसिकलालजी संघराजका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हॉस्पिटलच्या 4 थ्या मजल्यावरील स्पेशल रूमसाठी संघराजका परिवाराने 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. हसमुख ऑटोमोबाईल्सचे रसिकालालजी लक्ष्मीचंदजी संघराजका यांनी या मदतीचा धनादेश नुकताच डॉ.कांकरिया यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ.सुधा कांकरिया, शिंगवी चष्माघरचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.डी.मिश्रा, डॉ.निसार शेख, प्रकाश छल्लानी आदी उपस्थित होते.
संघराजका म्हणाले की, आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्यासारख्या महान विभूतींच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशन रूग्णसेवेचा वसा चालवत आहे. गोरगरीब रूग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरत आहे. केवळ नगरच नव्हे तर राज्याच्या, देशाच्या विविध भागातून याठिकाणी रूग्ण येत असतात. प्रत्येकाला आपुलकीची व जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतात. अशा या कार्यासाठी मदतीचा हात देताना मनस्वी आनंद होत आहे. आचार्यश्रींच्या कृपाशिर्वादामुळेच ही मदत करणे शक्य झाल्याचे आम्ही मानतो. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले.

जि.प.कर्मचारी सोसायटीच्या कर्जावरील व्याजदरात कपात : शशिकांत रासकर


नगर । प्रतिनिधी - जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत कर्जावरील व्याजदर आणखी एक टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील चार वर्षात सोसायटीने सभासदहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यातूनच कर्जावरील व्याजदर 4 वर्षात 2 टक्के कमी करून तो 12 टक्क्यावरून 10 टक्क्यापर्यंत आणण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षापासून दि.1 एप्रिलपासून नवीन कमी झालेले व्याजदर लागू होतील, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शशिकांत रासकर व व्हाईस चेअरमन मोहन जायभाये यांनी दिली.
या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन रासकर यांनी सांगितले की, सभासदांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता जवळ जवळ झाली असून, भविष्यात संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचा मानस आहे. संचालकांनी खर्चात काटकसर करून संस्थेला अधिकाधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. कर्जावरील व्याजदर कमी करण्याची सभासदांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करणारा निर्णय सर्व संचालकांनी एकमताने घेतला आहे. याचा सभासदांना मोठा लाभ होणार आहे.
व्हाईस चेअरमन जायभाये म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी सोसायटी कामधेनू आहे. सभासदाला केंद्रस्थानी ठेवून संचालक मंडळ अतिशय पारदर्शी व सर्वोत्तम कारभार करीत आहे. संस्थेच्या उत्कर्षात सर्व सभासदांच्या सहकार्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच सभासदांना फायदेशीर ठरतील असे अनेक चांगले निर्णय घेता आल्याचे समाधान आहे. येणार्या काळातही सभासदांच्या चांगल्या सूचनांचा विचार करून त्यानुसार आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस, सुभाष कराळे, सोपान हरदास, संजू चौधरी, अरूण शिरसाठ, हरि शेळके, राजाबापू पाठक, नारायण बोराडे, अशोक काळापहाड, विलास वाघ, वालचंद ढवळे, संतोष नलगे, अरूण जोर्वेकर, ज्ञानदेव जवणे, भरत घुगे, प्रताप गांगर्डे, उषा देशमुख, इंदू गोडसे विलास शेळके, राहुल कांबळे, व्यवस्थापक अविनाश शिदोरे, उपव्यवस्थापक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

आयात केलेला उमेदवार नकोच, कार्यकर्त्यांची इच्छा!


नगर । प्रतिनिधी - राजकारण म्हटलं की, पक्षबदल आलाच. असेच काहीसे गणित आता राजकीय पक्षांमध्ये तयार झाले आहे. एखाद्या पक्षाने तिकीट नाकारले की लगेच दुसर्‍या पक्षात  प्रवेश करुन आपले नशीब अजमावण्याचे प्रकार हल्ली वाढत चालले असल्याचे चित्र आहे. प्रवेश होताच आपल्याला तिकीट कसे मिळेल यासाठी फिल्डींग लावली जाते. मात्र, या अशा पक्षप्रवेशाला कार्यकर्ते चांगलेच कंटाळलेले दिसत असून आता सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हे इतर पक्षातील नेता नको तर आमच्या पक्षातील जुन्याजाणत्या आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यालाच तिकीट द्यावे अशी मागणी होताना दिसत आहे. यातून ‘आयात’ नको तर निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्या असाच काहीसा सूर आळवला जात आहे.
सध्या राजकीय पक्षातील नेते चांगलेच कामाला लागले असून नगर दक्षिणेत कुणाला तिकीट निश्चित होणार याची गणिते आखली जात आहेत. नगर दक्षिणसाठी काही नेत्यांची नावे चर्चेत येत असताना आयात केलेला उमेदवार नको अशी ठाम भूमिका मांडली जात  आहे. जो पक्ष ‘आयात’ केलेला उमेदवार देईल त्याची निश्चितच पंचाईत होणार आहे. सध्या राजकीय वातावरणात पक्षबदलाचे वारे वाहत असल्याने पक्षाची  विचारधारा मान्य होणार का ?  हा प्रश्नच आहे. जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर पोहोचले असून भविष्यात हे वळण कोठे जाणार? हे आताच सांगणे कठीण झाले आहे. राजकीय वस्तुस्थिती पाहता विचारांचे कार्यकर्ते आणि प्रचारासाठीचे कार्यकर्ते असे दोन भाग पक्षात पडणार आहेत हे मात्र निश्चित. राजकारणात कोणी कोणाचा जास्त दिवस मित्र नसतो व जास्त दिवस शत्रू नसतो. आपण ऐकले होते मात्र हा अनुभव आपल्याला आपल्याच जिल्ह्यात येताना दिसत आहे. 
सध्या देशाच्या राजकारणात जिल्ह्याचे नाव चांगलेच गाजत आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय  यांनी भाजपात प्रवेश करुन आपल्याला उमेदवारी मिळणार या विश्वासाने कामाला सुरुवात केली आहे. परंतु,  दुसर्‍या बाजूला आता खा. गांधी हे देखील दुपटीने सक्रिय झाले असून कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी रणनीती आखली जात आहे. वास्तविक पाहता विखे आणि गांधी यांनी एकमेकांवर चांगलीच टीका केली होती. तसेच विखे यांनी भाजप प्रवेशाआधी भाजपवर केलेल्या टीकेची व्हिडीओ क्लिप व्हारयल होत असून एकप्रकारे विखे यांना खिंडीत गाठण्याचा प्रकार सुुरु झाला आहे. दुसर्‍या बाजूला विखे यांची उमेदवारी  भारतीय जनता पार्टीमधून जवळपास निश्चित करण्यात आली असे मानले जात आहे.  यावर  आता  भारतीय  जनता  पार्टीचे खासदार दिलीप  गांधी  हे  देखील आपल्यालाच उमेदवारी  मिळावी यासाठी दबाव निर्माण करुन कामाला लागले आहेत. 
यावर आता नगर दक्षिणचा तिढा कधी सुटणार आणि कोण  उमेदवार असणार याकडे आता राजकीय पक्षांसह मतदारसंघातील सर्व रहिवाशांचे लक्ष वेधलेले दिसत आहे. राज्याच्या राजकारणानेही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची खास दखल घेतल्याचे चित्र आहे.त्यामुळे या वेळेची निवडणूक ही निश्चितच रंगतदार होणार असून कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे दिसत आहे.

विखेंच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये उभी फूट!


नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे काँग्रेसमधून पक्षात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये गावपातळीपासून उभी फूट पडली आहे. डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध वाढत चालला असून भाजपच्या तालुकास्तरावरील पदाधिकार्‍यांनी पत्रके काढून पुन्हा खा. दिलीप गांधी यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
डॉ. सुजय विखे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी भाजपकडून डॉ. विखे यांनाच नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डॉ. विखेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखेंनी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. मात्र, उमेदवारीवरून भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे पहायला मिळत आहे. 
डॉ. विखे उमेदवारीच्या दृष्टीने सुमारे दोन वर्षांपासून जिल्ह्यात संपर्क अभियान राबवत आहेत. डॉ. विखे यांनी गावा-गावात सभा घेऊन भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. त्यामुळे साहजिकच भाजपच्या गाव, तालुका पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये डॉ. विखेंबद्दल अगोदरच नाराजीचा सूर होता. त्यातच डॉ. विखे भाजपमध्ये आले. त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात असल्याने गाव, तालुकापातळीवरील पदाधिकार्‍यांमध्ये असंतोष वाढला आहे. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आता पत्रके काढून डॉ. विखेंच्या उमेदवारीला जाहीर विरोध दर्शवत खा. दिलीप गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे पहावयास मिळत आहे.
नगरची भाजप झाली काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. मात्र नगर जिल्ह्याची काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित भाजपाकडे वाटचाल सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. त्यातील आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. स्नेहलता कोल्हे या काँग्रेसमधून तर आ. मोनिका राजळे, आ. शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते हेही पूर्वी राष्ट्रवादीत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा अपवाद असून ते पूर्वीपासून भाजपमधीलच आहेत. तर खा. दिलीप गांधी हे पक्षात गेल्या 45 वर्षांपासून कार्यरत असून, एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मात्र आता खा. गांधी यांना डावलून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले डॉ. सुजय विखे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जात असल्याने नगरची भाजप ही काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


भाजप पदाधिकार्‍यांची मेळाव्याकडे पाठ
नाशिकमध्ये भाजपचा नुकताच विभागीय मेळावा झाला. या मेळाव्यास नगर जिल्ह्यातील जिल्हा भाजप व भाजयुमोचा एकही पदाधिकारी गेला नाही. यामागे डॉ. सुजय विखेंचा पक्षप्रवेश व संभाव्य उमेदवारीची किनार असल्याचे बोलले जात आहे. पुढे अशीच परिस्थिती राहिल्यास भाजपचे पदाधिकारी डॉ. सुजय विखे यांचे काम करतील की नाही, याबाबत साशंकताच आहे.

Wednesday, 6 March 2019

येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय ः सुजय विखे


नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणार उतरणार या संदर्भातील अंतिम निर्णय आगामी दोन दिवसांत घेणार असल्याचे नगर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच पुढे ते म्हणाले की, जनता माझ्यासोबत आहे हे महत्त्वाचे. त्यामुळे कोणाच्याही साथीची अपेक्षा न ठेवता निवडणूक लढवणार आहे.
डॉ.सुजय विखे हे आज (दि. 6) वैयक्तिक कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा उमेदवारीच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली.
गेल्या तीन वर्षापासून मी तयारी करतो आहे. सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून माझे कार्य चालू आहे. गेल्या पंधरा वर्षात कोणतेही ठेास काम नगर शहरात होवू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांची उद्घाटने केली जात असल्याचे जनता जवळून पाहते आहे. मी विकासकामे करेल असा विश्वास जनतेमध्ये असेल तरच ते मला मतदान करतील. सबका साथ सबका विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे आई-वडिलांना माझ्या प्रचारासाठी अजूनतरी पुढे यावे लागले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून प्रसारमाध्यमांनी माझे नांव महाराष्ट्रभर पोहचविण्याची कामगिरी बजावली. निवडणुकीसाठी माझ्याशी कोणत्याही पक्षाने अद्याप संपर्क केला नाही. येत्या दोन दिवसांत मी माझा अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. पाण्याची पातळी वाढवणे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. औद्योगिक विकासावर विशेष भर देण्याचा आमचा मानस आहे असेही विखे म्हणाले.

शहरातील उड्डाणपूल व चारपदरी बायपास रस्त्याचे शुक्रवारी भूमिपूजन


नगर । प्रतिनिधी - नगरकरांच्या जिव्हाळ्याचा व नगर शहरातील बहुचर्चित सक्कर चौक ते अशोका हॉटेलदरम्यान होणार्‍या चौपदरी उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथून व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मार्केट कमिटीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील पटांगणात जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातून 3.08 किमीचा उड्डाणपुल व 40.600 किमी चारपदरी बायपास रस्त्याचे काम होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपमहापौर मालन ढोणे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रफुल दिवान आदी उपस्थित होते.
यावेळी खा. गांधी म्हणाले, आजपर्यंत माझ्यावर कोणी कितीही टीकाटिपण्णी केली तरी मी मतदारसंघाच्या विकासापासून अजिबात विचलीत झालो नाही आणि भविष्यात होणारही नाही. इतर राजकीय लोकांसारखे मी अन् माझ्या भाजपच्या नेत्यांनी शहरातील उड्डाणपुलाचे कोणतेही भूमिपूजन किंवा उद्घाटन केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेक वर्षापासून सतत पाठपुरावा केला. आज त्याला यश आले आहे. अनेकांनी या उड्डाणपुलाचे राजकारण केले. भाजप विरोधकांनी पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र विकासकामांसाठी राजकारण नाही तर मानसिकतेची गरज असते. भाजप सरकार नुसते बोलतच नाही तर करून दाखविते, त्याचे हे उदाहरण आहे. पुणे-नगर हायवे शहरातून गेला आहे. सन 2006 मध्ये या हायवेचा विस्तार झाला. चेतक एन्टरप्राईजेस या ठेकेदाराकडे त्याचे काम होते. शिरूर ते नगर रस्त्याच्या कामात 70 कोटी रुपयांचा एकेरी उड्डाणपूल हा ठेकेदार करणार होता. सध्याचे सगम हॉटेल ते नेवासकर पंपापर्यंतचा हा उड्डाणपूल होणार होता. तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दोनदा उड्डाणपुलाचे भूमिपूजनही केले. मात्र त्यात पुढे राजकीय हस्तक्षेप झाला. ठेकेदाराला मारहाण झाली. त्यामुळे त्याने काम सुरू होण्यापूर्वीच सोडले. राजकीय श्रेयवादात स्थानिक नेत्यांनी तीनदा नारळ फोडला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मला कौल दिला. खासदार झाल्यानंतर उड्डाणपुलाचा विषय हातात घेतला, तो मार्गी लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला. माझ्या त्यावेळच्या खासदारकीच्या काळात केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस आघाडी सरकार होते. त्यामुळे सरकार दरबारी दाद मिळाली नाही. ती पाच वर्षे वाया गेली. मात्र 2014 साली केंद्रात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार विराजमान झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. नगर शहरातून 222 क्रमांकाचा विशाखापट्टणम नॅशनल हायवे गेला असल्याने मंत्री गडकरी यांनी या रस्त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये मंजूर केले होते. त्याच वेळेस त्यांचे या उड्डाणपुलाकडे लक्ष वेधले. या विशाखापट्टणम रस्त्याच्या कामातून नगर शहराचा उड्डाणपूल व्हावा यासाठी पाठपुरावा केला. भाळवणी येथे या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी स्वत: मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांना नगरचे रस्ते दाखविले. शहरातील रस्त्याची दुरवस्था दाखविली. शहरात चांगले रस्ते करण्यासाठी त्यांना हे सगळे रस्ते नॅशनल हायवेकडे वर्ग करण्यास गळ घातली. त्यांनी ती तत्काळ मंजूर करून  रस्त्यांचा व उड्डाणपुलाचा डीपीआर करण्यासाठी अधिकारी नगरला पाठविले. सुरूवातीला साडेसातशे कोटी रुपयांचा निधी होता. त्यातून सक्कर चौक ते डीएसपी चौकदरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित होता. पूर्वीच्या चेतक कंपनीकडून उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचा 70 कोटी रुपयांचा निधी वगळून हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करायचा होता. बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी फक्त कागदी घोडे नाचविले अन् वेळकाढूपणा केला. सरकारला तसे कळविण्याची तसदीही घेतली नाही. दीड वर्षाच्या विलंबानंतर चेतककडून काम वगळल्याचे पत्र दिले गेले. त्यानंतर शासनाकडून एनओसी आली ती केंद्राकडे पाठविली. या दीड वर्षाच्या काळात विशाखापट्टणम् नॅशनल हायवेचे काम वाढत गेले अन् नॅशनल हायवेसाठी दिलेले साडेसातशे कोटीही अपुरे पडले. पर्यायाने नगरच्या उड्डाणपुलास केवळ साडेतीनशे कोटी मिळू शकले. या निधीतून होईल तितका उड्डाणपूल करून घ्या, पुन्हा निधी देतो असे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले आहे. पुढच्या टप्प्यात आणखी निधी मिळणार आहे. त्यातून थेट महापालिका इमारतीपर्यंत उड्डाणपूल करण्यासाठी वचनबध्द आहे. सक्कर चौक ते अशोका हॉटेल दरम्यान चौपदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी 280 कोटी केंद्र शासनाकडून तर राज्य शासनाकडून 52 कोटी मिळाले आहेत. आपल्या कार्यकाळात नुसते बोललो नाही तर करून दाखविले अन् प्रत्यक्ष उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही करू शकलो याचे समाधान आहे.

Tuesday, 5 March 2019

एमआयडीसीतील व्ही. एस. इंजिनिअरिंग कंपनीतील कामगारांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे सेफ्टी मॅनेजर चंद्रकुमार भंडारी व नेव्ही रिटायर्ड अनिल अकोलकर यांनी व्ही. एस. इंजिनिअरिंग कंपनीतील कामगारांना आपली सुरक्षा कशी करावी याबाबत माहिती दिली. याप्रसंगी विश्वनाथ पोंदे, किशोर रेणावीकर, मुकुंद पंत, अजित चाबूकस्वार, दिलीप गंधे उपस्थित होते. 
कामगारांनी आपली वैयक्तिक सुरक्षा कशी करावी, तसेच कंपनीचीही सुरक्षितता कशी करावी, याबद्दल चंद्रकुमार भंडारी यांनी सखोल माहिती दिली. कंपनीत काम करताना कामगारांनी स्वतःला काहीही इजा होऊ नये, यासाठी जास्त काळजी घ्यावी. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह यशस्वी झाल्यासारखा होईल, असे ते म्हणाले.
अनिल अकोलकर म्हणाले की, आगीचे तीन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे कपडे, प्लास्टिक व कचरा यापासून लागलेली आग, दुसर्‍या प्रकारची म्हणजे लिक्विड, केमिकल व गॅस यापासून लागलेली आणि तिसरा प्रकार म्हणजे इलेक्ट्रॉनिक, मशिनरी यापासून लागलेली आग. आग लागूच नये, यासाठी कामगारांनी कंपनीत काम करताना विशेष काळजी घ्यावी, तसेच आग लागली तर घाबरून न जाता तीन मिनिटांच्या आत आग विझवण्याचा प्रमत्न करावा.

उमेदवारीसाठी सुजय विखेंचे दबावतंत्र


नगर । प्रतिनिधी - विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांचा अद्याप भारतीय जनता पार्टीशी कोणताही संपर्क झालेला नाही. भाजपाचा कोणताही नेता यांच्या संपर्कात नाही. त्यांचे जे उमेदवारीसाठी चालले आहे ते फक्त दबावतंत्र आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबावतंत्र आणत आहेत. माझी त्यांची भेटही नाही. त्यामुळे विखे पिता-पुत्रांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या बातम्या फक्त राजकीय चर्चाच आहेत, अशी स्पष्टोक्ती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज नगरमध्ये केली.
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे सकाळी औरंगाबादहून पुण्यास जाताना भाजप शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबले होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व खासदार दिलीप गांधी यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे तासभर सविस्तर चर्चा झाली. निवडणुकीची जोरदार तयारी करा अशी सूचना यावेळी खा.दानवे यांनी खा. गांधींना केली.
ते म्हणाले, लोकसभेसाठी भाजपाचा अद्याप कोणताही उमेदवार निश्चित नाही. राज्याची पार्लामेंट्री बोर्डाची पहिली बैठक सात तारखेला होणार होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौर्‍यामूळे ही बैठक आता अकरा तारखेला होणार आहे. या पहिल्या बैठकीत चर्चा होईल त्यानंतर पुन्हा पार्लामेंट्री बोर्डाची  दुसरी बैठक झाल्यानंतर केंद्राच्या पार्लामेंट्री बोर्डाकडे राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी  पाठवण्यात येईल. केंद्रीय पार्लामेंट्री बोर्डने मान्यता दिल्यानंतर उमेदवार जाहीर करण्याची भाजपची पद्धत आहे. त्यामुळे मी जरी राज्याध्यक्ष असलो तरी अद्याप माझी उमेदवारी जाहीर झालेली नाही. नगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. देशात फक्त आता नरेंद्र मोदीच सर्वांचे उमेदवार आहेत. पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली देशात भाजपची सत्ता येणार असल्याने  जालन्यातही मोदी व नगरमध्येही मोदी असेच वातावरण सर्वत्र आहे.

Monday, 4 March 2019

भाजप, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिब्यावर मुद्दस्सर शेख सभापती


नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी प्रथमच बहुजन समाजवादी पार्टीला संधी मिळाली आहे. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर बसपाचे नगरसेवक मुद्दस्सर शेख यांची आज मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली. त्यांना एकूण दहा मते मिळाली असून त्यांचा विजय झाला. तर सेनेचे योगीराज गाडे यांना सहा मते मिळाली असून त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. 
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सेनेचे योगीराज गाडे, राष्ट्रवादीचे अविनाश घुले व बसपाचे  नगरसेवक मुद्दस्सर शेख या तिघांनी अर्ज दाखल केले होते. आज सोमवारी सकाळी 11.15 मिनिटाने मनपाच्या स्थायी समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सर्वप्रथम या अर्जांची छाननी झाली. छाननीत तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली होती. या दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सेनेचे योगीराज गाडे व मुद्दस्सर शेख यांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांच्यामध्ये सरळ-सरळ लढत झाली. या लढतीत शेख यांना दहा मते मिळाली. त्यामध्ये भाजप-3, राष्ट्रवादी-5, काँग्रेस-1, बसपा-1 असे मिळून दहा मते शेख यांना मिळाली आहेत. तर योगीराज गाडे यांना सेनेच्याच सर्व सहा सदस्यांनी मते दिली. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर बसपाचा सभापती नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
दरम्यान महापौर निवडणुकीत सेनेविरोधात झालेली आघाडी स्थायीतही कायम राहिली. भाजपने शेख यांना दिलेला शब्द पाळला.शेख सभापती झाल्याने त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Saturday, 2 March 2019

संधी मिळाल्यास नगर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य ः सुजय विखे


नगर । प्रतिनिधी - कुठल्याही शहराचा विकास तेथील औद्योगिक वसाहतीवर अवलंबून असतो.  नगरमध्ये एम.आय.डी.सी स्थापन होऊन अनेक वर्ष झाली. परंतु उद्योगांना स्थलांतरित व्हावे लागले त्यामुळे नगरचा विकास थांबला आहे. संधी मिळाल्यास नगर औद्योगिक वसाहती संदर्भात, तिथे नवीन उद्योगधंदे येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होण्यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न करू, असे प्रतिपादन युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी केले. नगर शहरामध्ये विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते
औद्योगिकीकरण हाच विकासासाठी राजमार्ग आहे. त्यामुळे कुठल्याही शहराची वेगाने विकास होण्यास मदत होते. गत काही वर्षांपासून राज्यातील अनेक शहरांनी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून शहराचा विकास साधला. दुर्दैवाने  नगरमध्ये एमआयडीसीची स्थापना होऊन या एमआयडीसीमध्ये अपवाद सोडला तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मोठे उद्योग शिल्लक राहिले आहेत. यातील काही उद्योग हे राजकीय कारणांमुळे स्थलांतरित झाले आहेत. आपल्याला नगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास उद्योगांना पोषक असे वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील व  उद्योगांच्या माध्यमातून छोटे व मध्यम, लघु उद्योग सुद्धा स्थिरावतील तसेच नगरच्या अर्थकारणाला चालना मिळेल असा विश्वास आपल्याला आहे या उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारी समाप्त होईल. त्यामुळे संधी मिळाल्यास पहिले प्राधान्य हे नगर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नासंदर्भात असेल असे विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी विखे यांच्या हस्ते तालीम संघाच्या सत्काराचा कार्यक्रम सर्जेपुरा येथे घेण्यात आला. सप्तपदी लॉन्स व प्रभाग क्रमांक 14 मध्ये नागरिकांशी संवाद साधण्यात आला. या विविध कार्यक्रमांचे आयोजन वैभव लांडगे, जितेंद्र लांडगे, सुभाष लोंढे, नीलेश खरपुडे, संजय झिंजे, अजय औसरकर, निखिल वारे, धनंजय जाधव, बाळासाहेब पवार या कार्यकर्त्यांनी केले होते. या  बैठकींसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनपात युती दुभंगलेलीच




नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती व महिला बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतीच्या निवडी सोमवार, दि. 4 मार्च रोजी होणार आहेत. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस होता. सेनेकडून योगीराज गाडे, राष्ट्रवादीकडून अविनाश घुले व भाजपच्या पाठिंब्याने मुद्दस्सर शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. स्थायीसाठी भाजपने उमेदवार दिला नाही. मात्र बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी सेना- भाजप अशी लढत असल्याने मनपात युती होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी नगरच्या मनपात मात्र युती दुभंगलेलीच दिसते आहे.  
महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी सेनेकडून पुष्पा बोरूडे व उपसभापती पदासाठी सुवर्णा गेनप्पा यांनी तर भाजपकडून सभापतीपदासाठी लता शेळके यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपसभापती पदासाठी गेनप्पा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तिथे भाजप व राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही. तर बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी लता शेळके व सेनेच्या पुष्पा बोरूडे यांच्यात सरळ-सरळ लढत होणार आहे. त्यामुळे युतीचा धर्म नगरच्या नेत्यांनी पाळलेला दिसत नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने महिला व बालकल्याण समितीसाठी एकही अर्ज भरला नाही. त्यामुळे महिला बालकल्याणमध्ये सेना-भाजप अशीच निवडणूक होईल. 
मनपाच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 वाजता स्थायी सभापतीच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ होईल. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काम पाहतील. सर्वप्रथम स्थायी समितीच्या सभापतीची व त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या निवडी होणार आहेत. उमेदवारी अर्ज साठी आज शेवटचा दिवस असल्याने दुपारी 1.45 मिनिटाने सेनेकडून अर्ज दाखल झाला आहे. तर राष्ट्रवादीकडून
सभापती पदासाठी घुले यांनी 2.15 वाजता अर्ज भरला. त्यापाठोपाठ लगेच मुद्दस्सर शेख यांनीही अर्ज दाखल केला. मनपाच्या दृष्टीने आर्थिक केंद्रबिंदू असणार्‍या स्थायी समितीच्या सभापती पदासाठीची लढत चुरशीची होणार आहे. दरम्यान, भाजपने मात्र स्थायीसाठी उमेदवार दिला नसल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.