Tuesday, 19 March 2019

ज्ञानदीप शिक्षण संस्थेचा उतर महाराष्ट्रात झेंडा क्रीडाशिक्षक नंदकुमार शितोळे यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार प्रदान


अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे क्रीडाशिक्षक नंदकुमार शितोळे यांना नाशिक येथील के. एन. डी. बहुउदेशीय मंडळ व क्रीडा साधना यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील सिडको महेश भवनमध्ये हा पुरस्कार सोहळा थाटात पार पडला. हा पुरस्कार नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते तर जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, कार्याक्रमाचे आयोजक व भारतीय तलवारबाजीचे खजिनदार अशोकराव दुधारे, आप्पासाहेब शिंदे, आनंद पवार, शिवाजी निरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शितोळे यांना प्रदान करण्यात आला.
श्रीगोंदा तालुक्यात शिक्षणाची ज्ञानगंगा तळगाळात पेाहचावी या उच्च विचाराने स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी ज्ञानदीप शिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेच्या श्री रामेश्‍वर (चिखली) विदयालयात नंदकुमार शितोळे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील 10 वर्षातील क्रीडा क्षेत्रातील तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील कामगिरी व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा विचार करुन उत्तर महाराष्ट्र  क्रीडारत्न शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच त्यांना हिवरेबाजार येथे झालेल्या राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आदर्श क्रीडा संघटक पुरस्कार देखील मिळाला होता. 
शितोळे यांना मिळालेल्या या पुरस्काराने संस्थेचे नांव उत्तर महाराष्ट्राच्या नकाशावर जाऊन पोहचले आहे. या पुरस्कार सोहळ्यात नगर,नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या 5 जिल्ह्यातील शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, विश्‍वस्त अनुराधाताई नागवडे, संस्थेचे निरीक्षक बी.के. लगड, सचिन लगड, छत्रपती व ज्ञानदीप संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सेवकवृंद, चिखली विदयालयांचे मुख्याध्यापक बी.आर. नागवडे, सरपंच राजेंद्र झेंडे, सोसा. चेअरमन रामदास झेंडे आदिंसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Monday, 18 March 2019

गडाखांसोबतच्या अशोभनीय वर्तनाविरूद्ध साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


नगर । प्रतिनिधी - ज्येष्ठ साहित्यिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्व यशवंतराव गडाख यांच्यासोबत झालेल्या अशोभनीय वर्तणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यिक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन दिले.
0यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ.दीपक, जयंत येलूलकर, मा.आ.अनिल राठोड, प्रा.माणिक विधाते, मेधाताई काळे, शिवाजी साबळे, राजेंद्र गांधी, डी.एम.कांबळे, अशोक गायकवाड, पवन नाईक, संजू तनपुरे, सुरेश चव्हाण, राजेंद्र उदागे, श्रीनिवास बोजा, क्रांतीकला अनभुले, व्ही.एन देशपांडे, अंगद गायकवाड, साहेबान जहागीरदार, संतोष बलदोटा, डॉ.भूषण अनभुले, चंद्रकांत पालवे, बापू चंदनशिवे, शैलेश गवळी, ज्ञानेश शिंदे, अजित जगताप, मनीष चोपडा, अतुल रच्चा, संजय दळवी, हरिभाऊ डोळसे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव गडाख हे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अतिशय संस्कृत संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रासोबतच जिल्ह्यात सांस्कृतिक साहित्यिक जडण-घडण रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाला संदर्भात अटकेसाठी आलेल्या पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनी येथील निवासस्थानाची झडती घेतली. 
पोलिसांनी अशा प्रकारचे वर्तन केल्याने त्यांना मनस्ताप झाला असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी ही अपेक्षा तसेच झालेल्या प्रकाराची आपण आपल्या स्तरावर चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मानवसेवेच्या कार्यात दानशुरांचा सिंहाचा वाटा : डॉ. प्रकाश कांकरिया


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण तंतोतंत अंमलात आणण्यासाठी जैन सोशल फेडरेशन पूर्ण समर्पित भावनेने काम करीत आहे. या सेवाभावी कार्यात अनेक दानशूरांचा सहभाग असतो. अशा मदतीतूनच रूग्णसेवेचे मोठे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल अव्याहतपणे करीत आहे. या सेवाकार्याच्या विस्तारात अनेक ज्ञात-अज्ञात दानशूर मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. अशा मदतीमुळे मानवसेवेच्या कार्याचा विस्तार होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या चौथ्या व पाचव्या मजल्याच्या कामाचे लोकार्पण दि.28 मार्च रोजी होत आहे. या कार्याला हातभार म्हणून स्व.सौ सरयूताई रसिकलालजी संघराजका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हॉस्पिटलच्या 4 थ्या मजल्यावरील स्पेशल रूमसाठी संघराजका परिवाराने 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. हसमुख ऑटोमोबाईल्सचे रसिकालालजी लक्ष्मीचंदजी संघराजका यांनी या मदतीचा धनादेश नुकताच डॉ.कांकरिया यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ.सुधा कांकरिया, शिंगवी चष्माघरचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.डी.मिश्रा, डॉ.निसार शेख, प्रकाश छल्लानी आदी उपस्थित होते.
संघराजका म्हणाले की, आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्यासारख्या महान विभूतींच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशन रूग्णसेवेचा वसा चालवत आहे. गोरगरीब रूग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरत आहे. केवळ नगरच नव्हे तर राज्याच्या, देशाच्या विविध भागातून याठिकाणी रूग्ण येत असतात. प्रत्येकाला आपुलकीची व जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतात. अशा या कार्यासाठी मदतीचा हात देताना मनस्वी आनंद होत आहे. आचार्यश्रींच्या कृपाशिर्वादामुळेच ही मदत करणे शक्य झाल्याचे आम्ही मानतो. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले.

कापूरवाडीच्या यात्रेची हगाम्याने सांगता


नगर । प्रतिनिधी - कापूरवाडी (ता. नगर) येथे कानिफनाथ यात्रेनिमित्त अशा जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते.  दोन दिवस ही यात्रा भरते. शनिवार, दि. 16 रोजी सकाळी कानिफनाथांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी महाआरती करण्यात आली. गावातील ग्रामस्थांनी 12 वाजता 9 दिवसांचा उपवास मंदिरामध्ये सोडला. संध्याकाळी करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा झाला. तसेच छबिनाही काढण्यात आला.
 रविवारी यात्रा कमिटीच्या वतीने भव्य हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. या हगाम्यात नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. काही कुस्त्या पापणी बंद होण्याच्या आत निकाली निघाल्या. मल्लानीं  डावपेच टाकत प्रेक्षकांची मने जिंकली. 
चांगल्या कुस्त्यांसाठी प्रेक्षकामधून बक्षिसे लावण्यात येत होती. शंभर रुपयांपासून एकवीस हजार रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी अक्षय कर्डिले, सरपंच संभाजी भगत, उपसरपंच मारुती कचरे,  शिवाजी दुसुंगे, राजू भगत, धनंजय खर्से, बाजार समिती संचालक जगन्नाथ मगर, कानिफनाथ कासार, वसंत आगरकर,  प्रशांत दुसुंगे, सचिन तोडमल, जावेद शेख, अशोक भगत, दिलीप भालसिंग, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे उपस्थित होते. 
पंच म्हणून मुन्ना शेख, रावसाहेब कराळे, माणिक धनगर, साहेबराव दुसुंगे, गणेश भगत, जावेद शेख, शिवाजी दुसुगे यांनी काम पाहिले. 
या हगाम्यात मोठ्या संख्येने मल्ल सहभागी झाले होते.हगाम्याचे सूत्रसंचालन सरपंच संभाजी भगत, कानिफनाथ कासार यांनी केले.

‘साईसूर्य नेत्रसेवा’तर्फे आयोजित ‘विवाह दृष्टीभेट’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



नगर । प्रतिनिधी - येथील मानकन्हैय्या ट्रस्ट, साईसूर्य नेत्रसेवातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून कॉन्टूरा लेसर उपचाराने चष्म्याचा नंबर घालविण्याच्या हेतूने ‘विवाह दृष्टीभेट’ नेत्रशिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात वीरमातांचा व महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला,  अशी माहिती संयोजिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
 सुरूवातीस शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. वीरमाता श्रीमती दगडाबाई तुकाराम वामन, श्रीमती पारूबाई अंबादास शिंदे यांचा सन्मान साडीचोळी, धनादेश, भेटवस्तू, मानपत्र देऊन करण्यात आला.
 वीरमातांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे नेत्रशिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आशाताई फिरोदिया, मीनाताई मुनोत, डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छायाताई फिरोदिया होत्या.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.  डॉ. प्रकाश कांकरिया यांनी चष्मा घालविण्याचे तंत्रज्ञान, अत्याधुनिक लेसर प्रणाली कॉन्टूरा या उपचार पध्दतीविषयी उपस्थितांना माहिती दिली.
याप्रसंगी महिला पत्रकार मीनाताई मुनोत, शिल्पा रसाळ, कीर्ती खेडकर, पूजा गुंदेचा, प्रियंका चिखले, प्रियंका पुंड, नूतन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती मीनाताई मुनोत, आशाताई फिरोदिया, पूजा गुंदेचा, शिल्पा रसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. 
 शिबिरासाठी डॉ. प्रकाश कांकरिया डॉ. वर्धमान कांकरिया यांच्यासह डॉ. अनिल सिंग, डॉ. राजपाल उसनळे, डॉ. स्मिता पटारे, डॉ. अजिता गरूड, डॉ. स्वप्नील राठोड यांनी परिश्रम घेतले. सुरेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.

जि.प.कर्मचारी सोसायटीच्या कर्जावरील व्याजदरात कपात : शशिकांत रासकर


नगर । प्रतिनिधी - जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत कर्जावरील व्याजदर आणखी एक टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील चार वर्षात सोसायटीने सभासदहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यातूनच कर्जावरील व्याजदर 4 वर्षात 2 टक्के कमी करून तो 12 टक्क्यावरून 10 टक्क्यापर्यंत आणण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षापासून दि.1 एप्रिलपासून नवीन कमी झालेले व्याजदर लागू होतील, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शशिकांत रासकर व व्हाईस चेअरमन मोहन जायभाये यांनी दिली.
या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन रासकर यांनी सांगितले की, सभासदांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता जवळ जवळ झाली असून, भविष्यात संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचा मानस आहे. संचालकांनी खर्चात काटकसर करून संस्थेला अधिकाधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. कर्जावरील व्याजदर कमी करण्याची सभासदांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करणारा निर्णय सर्व संचालकांनी एकमताने घेतला आहे. याचा सभासदांना मोठा लाभ होणार आहे.
व्हाईस चेअरमन जायभाये म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचार्यांसाठी सोसायटी कामधेनू आहे. सभासदाला केंद्रस्थानी ठेवून संचालक मंडळ अतिशय पारदर्शी व सर्वोत्तम कारभार करीत आहे. संस्थेच्या उत्कर्षात सर्व सभासदांच्या सहकार्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच सभासदांना फायदेशीर ठरतील असे अनेक चांगले निर्णय घेता आल्याचे समाधान आहे. येणार्या काळातही सभासदांच्या चांगल्या सूचनांचा विचार करून त्यानुसार आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस, सुभाष कराळे, सोपान हरदास, संजू चौधरी, अरूण शिरसाठ, हरि शेळके, राजाबापू पाठक, नारायण बोराडे, अशोक काळापहाड, विलास वाघ, वालचंद ढवळे, संतोष नलगे, अरूण जोर्वेकर, ज्ञानदेव जवणे, भरत घुगे, प्रताप गांगर्डे, उषा देशमुख, इंदू गोडसे विलास शेळके, राहुल कांबळे, व्यवस्थापक अविनाश शिदोरे, उपव्यवस्थापक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सेवाभाव जपण्याचे काम ः डॉ. बोरा


नगर । प्रतिनिधी - भगवान महावीरांनी आपल्या संदेशातून अनेक विविध विधान शिकवले आहेत. त्यातूनच निरोगी जीवनाचा संदेश दिला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल हे निरोगी जीवन जगण्यासाठीच सुरु झाले आहे. दिवसेंदिवस महाग होत चाललेली आरोग्य सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात होत असल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर्स माणुसकीच्या भावनेतून काम करत आहेत. सहज पेलतील, असे उपचार येथे होत असल्याने सर्व रुग्ण समाधान व्यक्त करत येथून जातात. आज अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे हे फक्त नावालाच घेतली जातात. परंतु आनंदऋषीजी हॉस्पिटल हे खर्‍या अर्थाने सेवाभावनेने काम करत आहे, असे प्रतिपादन सी.ए. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. परेश बोरा यांनी केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त स्व.सुशीलाबाई लखमीचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार आयोजित दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.परेश बोरा व बडीसाजन ओसवाल क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुशील भंडारी यांच्या हस्ते झाले. 
याप्रसंगी आयोजक सतीश बोथरा, अजित बोथरा, अपर्णा बोथरा, प्रतिभा बोथरा, बडीसाजन क्रेडिट सोसायटीचे संचालक सचिन कटारिया, दीपक बोथरा, संतोष सुंदेचा, राखी सुंदेचा, गणेश कांकरिया, प्रितम राका, डॉ.मनोहर पाटील, संतोष बोथरा, डॉ.प्रकाश कांकरिया, कुंदन कांकरिया, सतीश लोढा, डॉ.सतीश राजूरकर, डॉ.अभिजित भातकुलकर, डॉ.सौ.निलोफर धानोरकर, डॉ.रवींद्र मुथ्था, प्रकाश छल्लानी आदी उपस्थित होते.
संतोष बोथरा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये दरवर्षी काहीतरी नावीन्य असावे यासाठी प्रयत्न असतो. गरजूंना येथे अत्यल्प दरात शस्त्रक्रिया होणार आहेत. वाढत्या आजारांचे निदान होण्यासाठी दरवर्षी अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करुन अत्यल्प दरात रुग्णांना सेवा देत आहे. त्यामुळे हॉस्पिटलचा विश्वासार्हतेत वाढ होत आहे. लवकरच या ठिकाणी 52 बेडचा अत्याधुनिक आय.सी.यू. विभाग सुरु करण्यात येणार आहे. पुढील वर्षात रुग्णांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
प्रास्ताविकात डॉ.प्रकाश कांकरिया म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमधून निघालेली ही सेवेची गंगा अविरत वाहत जात आहे. सुसज्ज हॉस्पिटल, ब्लड बँक, अत्याधुनिक नेत्रालय मानवसेवेसाठी उभारले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एन.ए.बी.एच. मान्यता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांचे समाधान व्हावे, असेच काम होत आहे. आजच्या शिबिरांतर्गत गरोदर महिलांसाठी मेडिटेशनचे धडे डॉ.सुधा कांकरिया या देणार आहेत.
सचिन कटारिया म्हणाले, हॉस्पिटलचे सुरु असलेले हे अत्याधुनिक आरोग्य सेवेचे अविरत सुरु असलेले कार्य असेच सुरु राहो. त्यासाठी आम्हीही यात खारीचा वाटा उचलत आहे. डॉ.सतीश राजुरकर म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून रुग्णांना कमी वेदना व सुलभ उपचार कसे मिळतील यासाठी रुग्णालय विशेष परिश्रम घेत आहे. दि. 18 मार्च ते 18 जूनपर्यंत हे शिबिर सुरु राहणार असून, यामध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे हार्निया, पित्ताशय, गर्भाशय, व्यंधत्व, अ‍ॅपेडिंक्स शस्त्रक्रिया आदींविषयी माहिती दिली.
डॉ.अभिजित भातकुलकर, डॉ.सतीश राजूकर, डॉ.सौ.निलोफर धानोरकर, डॉ.रवीद्र मुथा यांनी या शिबीरात 156 रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले. 
प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. मंगळवार दि. 19 मार्च रोजी स्त्री रोग तपासणी शिबिर होणार आहे.