Tuesday, 19 March 2019

श्री साईसच्चरित्र चक्रीपारायणास भाविकांचा प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी - शहरातील तोफखाना परिसरातील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग 8 व्या वर्षी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण आयोजित केले होते. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिला भाविक या पारायण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
तोफखाना येथील ठाकुर गल्लीतील विठ्ठल मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गुजरात येथील गिरनार पर्वताच्या 240 पेक्षा जास्त पौर्णिमा यात्रा व 108 हून अधिक सोरटी सोमनाथची यात्रा करणारे व्यक्तिमत्व  प.पू.श्री. प्रमोद केणे काका यांचे दिव्यानुभव कथनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण (52 अध्याय), अवतरणिका ग्रंथ वाचन (53 वा अध्याय) झाल्यानंतर साईबाबांची महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
या सोहळ्यात उपमहापौर मालन ढोणे, अर्चना झिंजे, पूनम ढवण, अश्विनी बिज्जा यांनीही सहभाग घेतला होता. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साईसेवा प्रतिष्ठानचे  अध्यक्ष गणेश झिंजे, उपाध्यक्ष राहुल बिज्जा, सचिव ऋषीकेश अष्टेकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अमोल गुंड, अंकुश वझीरकर, अ‍ॅड. नितेश गुगळे, अमित सासवडकर, विशाल दगडे, उमेश मेरगु, मंगेश रोकडे, विक्रम पाठक, दत्तु कुलकर्णी, समीर पाठक, आशिष आचारी, अमित सद्रे, सुरेंद्र सोनवणे, शिवदिप शिंदे, प्रशांत गोसके, रवी वाघावकर, मयुर सोनेकर, राजेंद्र रामदिन, अमोल मेरगु, किशोर वडझीरकर यांच्यासह जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, बजरंग मार्कंडेय सेवा मंडळ, काळभैरवनाथ मित्रमंडळ, तोफखाना नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

नगरचा पारा 40 अंशापुढे


नगर । प्रतिनिधी - पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा गेल्या तीन दिवसांपासून 37 अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याने शहरात उकाडा जाणवत आहे. पुढील आठवडाभर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात किंचित घट, तर किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्रीचा उकाडा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. सोमवारी नगर येथे राज्यातील उच्चांकी 40.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि नाशिक वगळता बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 36 ते 39 अंशांवर आहे. कोकण विभागातील मुंबईत 31.5, तर सांताक्रुझ येथे 34 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे तापमान अधिक आहे. मराठवाडयात औरंगाबाद येथे 36.6 अंश कमाल तापमान नोंदविले गेले. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे 38 अंश, अकोला, ब्रह्मपुरी, वाशिम आदी भागात कमाल तापमान 37 अंशांपुढे नोंदविले गेले आहे.

विधानसभेचं गणित लक्षात घेता संग्राम जगताप लोकसभेसाठी?


नगर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्तरावर नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत चाचपणी सुरु असल्याने नगर लोकसभा मतदार संघात नेमकी लढत कोणत्या दोन उमेदवारांमध्ये होईल याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मुंबई येथील कार्यक्रमात त्यांच्या उमेदवारीची शिफारस भाजपा संसदीय बोर्डाकडे करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विखे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी डावलली जाईल असे बोलले जाते. परंतु आयात विखेंच्या उमेदवारीस खा. गांधी समर्थकांचा विरोध आहे. एकूणच आजमितीला भाजपा स्तरावर नेमके उमेदवार सुजय विखे पाटील की, विद्यमान खासदार दिलीप गांधी याचा उलगडा होणे बाकी आहे.
भाजपाचा उमेदवार अद्याप अंतिम नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर लोकसभेचे उमेदवार म्हणून आ.अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. राजकीय समीकरणांमध्ये शिवसेना-भाजपा यांच्यात झालेली युती ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कायम राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी आपली व्यूहरचना बदलली असून ते लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर सध्या आ.अरुण जगताप की आमदार संग्राम जगताप यापैकी कोणाला उमेदवारी द्यावयाची हा प्रश्न आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नगर लोकसभेसाठी आ.अरुण जगताप यांच्या नावाला पसंती आहे.
एका बाजूला एकूणच लोकसभा निवडणुकीपासून बाजूला राहण्याचे प्रयत्न करणारे आमदार संग्राम जगताप यांनी युतीचे समीकरण लक्षात घेऊन लोकसभेसाठी स्वत: इच्छुक असल्याचे पक्षस्तरावर कळविले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्तरावर जगताप कुटुंबात नेमके कोणाला उमेदवारी द्यावयाची या विषयीचा निर्णय होणार आहे.
आमदार कर्डिलेंची खेळी
नगर शहराच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय समीकरणे ही नेहमीच बेरजेची ठरली आहेत. सामाजिकदृष्ट्या त्यांची प्रतिमा काय आहे, यापेक्षा राजकीयदृष्ट्या ती नेहमीच मोठी राहिली व त्यांचे राजकीय निर्णयही फायद्याचेच राहिलेत. आगामी विधानसभा लक्षात घेऊन व निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युती लक्षात घेता त्यांच्या स्तरावरुन आ.संग्राम जगताप यांचा लोकसभेचा प्रस्ताव पुढे आल्याची चर्चा आहे.


नगर । प्रतिनिधी -
आनंदऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार्‍या सर्वोत्तम सेवेमुळे सर्वसामान्यांबरोबरच संपन्न परिवाराचा शिबिरात वाढता सहभाग ही समाजाला अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांनी व्यक्त केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्रीआनंदऋषीजी म.सा. यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीनिमित्त महावीर फूड प्रोडक्टचे श्रीमान महावीर बडजाते व श्रीमान अशोक चुडीवाल यांच्या परिवाराच्या सहकार्याने आयोजित मोफत  स्त्रीरोग व गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महावीर बडजाते, अशोक चुडीवाल, किरण बोरा (वडगाव शेरी), ललित छाजेड (पुणे), विनोद छाजेड (वैजापूर), इंजी.श्रीकांत काकाणी, इंजी.संदीप काकाणी, अ‍ॅड. संतोष गुगळे, सचिन कटारिया, आर्कीटेक सौ. कविता जैन, डॉ.प्रकाश कांकरिया, निहारिका बडजाते, कुणाल बडजाते, डॉ. रवींद्र मुथा, डॉ.निलोफर धानोरकर, संतोष बोथरा, डॉ. आशिष भंडारी, बाबुशेठ लोढा, प्रकाश छल्लाणी, डॉ. मनोहर पाटील उपस्थित होते.  
स्वागत करताना डॉ. कांकरिया म्हणाले की, उत्तम आरोग्य सेवा देणे याच उद्देशाने दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने नवनवीन योजना येथे राबविण्यात आल्या आहेत. सध्या नेत्रालय व हृदयरोग विभागाचा लाभ हजारो रुग्णांना झाला आहे. राज्यातील नव्हे तर देशातील रुग्णांना विश्वास व दिलासा देण्याचे कार्य सर्वांच्या सहकार्याने सतत सुरु आहे.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, आता नवीन दोन मजले सेवेसाठी उपलब्ध झाले असून त्याचा अधिक रुग्णांना फायदा होईल.देशात एकाच ठिकाणी सर्वात जास्त डायलेसीस सेवा या हॉस्पिटलमध्ये आता दिली जाईल. 
यावेळी वडगाव शेरीचे सामाजिक कार्यकर्ते किरण बोरा म्हणाले की, प्रत्येक भेटीत या हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवेत नाविन्यता व आधुनिकता दिसून येते. पुण्याचेही रुग्ण येथे उपचारासाठी मोठ्या विश्वासाने येतात. या सेवेत सहभागाचा आनंद आम्हा सर्वांना नेहमीच प्राप्त होतो.
आर्कीटेक्ट कविता जैन यांनी मनोगत सांगितले की आदर्शऋषींचे आशीर्वाद व प्रेरणेमुळे हॉस्पिटलच्या कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले आहे. हॉस्पिटलच्या इंटेरीअरच्या कामातून मिळालेले समाधान लाखमोलाचे आहे. यापुढेही हे कार्य करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.   
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार  करण्यात आला. दि.21 मार्च रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर होणार आहे. त्याचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन फेडरेशनतर्फे  करण्यात आले आहे.शिबिरात 266 महिलांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन दत्ता वारकड यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्स


नगर । प्रतिनिधी - 
येथील जैन सोशल फेडरेशन संचलित प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्सचे आयोजन केले असून यामध्ये सर्वसामान्य जनतेसोबतच गरोदर माता, स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे 85% पेक्षा जास्त आजार हे मनोकायिक (सायकोसोमॅटिक) आहेत. म्हणजे कमजोर व अशक्त मनामुळे निर्माण झालेले आहेत. जर आपण मनालाच शक्तीशाली बनविले तर भविष्यात होणार्‍या आजारापासून आपली सुटका होईल.
 तसेच आजार झालाच असेल तर औषधोपचारासोबतच मेडिटेशन करणे आवश्यक आहे. मेडिटेशनमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमधील हिलींग पॉवर (रोग बरा होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा) वाढते व रूग्ण इतर रूग्णांपेक्षा लवकर व पूर्ण बरा होतो. हृदयरोग, कॅन्सरसारख्या गंभीर रोगावर झालेल्या संशोधनाद्वारे हे सिध्द झाले आहे.
 आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये  मेडिटेशनची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे केवळ आरोग्याच्या समस्येवरच नव्हे तर इतरही संकटांवर सहज मात करता येते असे हजारोंचे अनुभव आहेत. 
गरोदर माता, स्तनदा माता समवेत त्यांचे पती, सासुबाई, आई, नणंद, बहिण किंवा इतर नातेवाईकांनाही याचा लाभ घेता येईल. किंबहुना गरोदर माता/ स्तनदा माता समवेत कमीत  कमी एक नातेवाईक असणे आवश्यक आहे.
 सदर कोर्स 25 मार्च ते 30 मार्च या कालावधीत दुपारी 4 ते 5.30 या वेळेत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर (आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या बेसमेंटला, आनंदऋषीजी मार्ग, अहमदनगर येथे होईल.
 आई, बाळ व परिवार यांच्या निरोगी व सुखी  जीवनाची  गुरकिल्ली म्हणजेच राजयोगा मेडिटेशन जीवनपध्दती होय. यामुळे  जीवन सहज, सुंदर, निरोगी व आनंदी बनवण्यास मदत होणार आहे. नावनोंदणी संपर्क प्रिया दिदी 9850887838 श्री दत्तात्रय वारकड 9766494901. सदर कोर्स संपूर्णत: मोफत असून जास्तीत जास्त व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंचे यश


नगर । प्रतिनिधी -
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून अनेक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये घवघवीत यश संंपादन करीत आहेत. अजीम काझी, किरण चोरमले, ओंकार येवले, अश्कान काझी, अनुज भोसले या अ‍ॅकॅडमीच्या क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून नगरचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. खेळाडूंंनी अधिक मेहनत घेतल्यास त्यांचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो, असा विश्वास अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद यांनी व्यक्त केला.
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतील क्रिकेटपटूंनी विविध स्पर्धांत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा क्रिकेट कीट बॅग देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद बोलत होते. यावेळी कार्तिक नायर, अमित बुरा, अमोल तांबे, नदीम सय्यद, सर्फराज बांगडीवाला उपस्थित होते. अ‍ॅकॅडमीच्या वतीने गौरव करण्यात आलेल्या अजीम काझीने महाराष्ट्र संघाकडून मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्याने गुजरात विरुद्ध 32 चेंडूंत 39 धावा करून करी संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. 10 सामन्यांमध्ये गोलंदाजी करीत 7 बळी घेतले.
किरण चोरमले याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्याने एक शतक व एकूण 240 धावा फटकावल्या. ओंकार येवले याने केंद्रीय विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ खेलकूद स्पर्धेत पश्चिम विभागाच्या मुंबई संघाकडून प्रतिनिधीत्व करीत चांगला खेळ केला. 
अश्कान काझी याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. अनुज भोसले याची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघाकडून निवड झाली होती. त्यानेही चमकदार कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री साईसच्चरित्र चक्रीपारायणास भाविकांचा प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी -
शहरातील तोफखाना परिसरातील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग 8 व्या वर्षी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण आयोजित केले होते. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिला भाविक या पारायण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
तोफखाना येथील ठाकुर गल्लीतील विठ्ठल मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गुजरात येथील गिरनार पर्वताच्या 240 पेक्षा जास्त पौर्णिमा यात्रा व 108 हून अधिक सोरटी सोमनाथची यात्रा करणारे व्यक्तिमत्व  प.पू.श्री. प्रमोद केणे काका यांचे दिव्यानुभव कथनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण (52 अध्याय), अवतरणिका ग्रंथ वाचन (53 वा अध्याय) झाल्यानंतर साईबाबांची महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
या सोहळ्यात उपमहापौर मालन ढोणे, अर्चना झिंजे, पूनम ढवण, अश्विनी बिज्जा यांनीही सहभाग घेतला होता. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साईसेवा प्रतिष्ठानचे  अध्यक्ष गणेश झिंजे, उपाध्यक्ष राहुल बिज्जा, सचिव ऋषीकेश अष्टेकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अमोल गुंड, अंकुश वझीरकर, अ‍ॅड. नितेश गुगळे, अमित सासवडकर, विशाल दगडे, उमेश मेरगु, मंगेश रोकडे, विक्रम पाठक, दत्तु कुलकर्णी, समीर पाठक, आशिष आचारी, अमित सद्रे, सुरेंद्र सोनवणे, शिवदिप शिंदे, प्रशांत गोसके, रवी वाघावकर, मयुर सोनेकर, राजेंद्र रामदिन, अमोल मेरगु, किशोर वडझीरकर यांच्यासह जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, बजरंग मार्कंडेय सेवा मंडळ, काळभैरवनाथ मित्रमंडळ, तोफखाना नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.