Sunday, 31 October 2021

भाई कुंदनलालजी गुरुद्वाराची महापालिका दप्तरी धार्मिक स्थळाची नोंद महापालिकेच्या वतीने गुरुद्वार्‍याच्या करात सूट शीख, पंजाबी समाजाच्या वतीने आमदार जगताप, स्थायीचे सभापती घुले, उपायुक्त डांगे व प्रभाग अधिकारी सालसर यांचा सत्कार


अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वाराला महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आला होता. या संदर्भात गुरुद्वाराची धार्मिक स्थळ म्हणून महापालिकेत नोंद करुन, करात सुट मिळवून दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, उपायुक्त यशवंत डांगे व प्रभाग अधिकारी सालसर यांचा शीख, पंजाबी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तारकपूर येथील गुरूद्वारा 1948 सालापासून अस्तित्वात आहे. सदर जागा स्व. जीताराम ईश्‍वरदास आहुजा यांनी गुरूद्वारासाठी देऊन गुरुद्वाराची स्थापना केली होती. गुरुद्वारा स्थापनेसाठी समाजाचे ज्येष्ठ कुंदनलालजी कंत्रोड, किशनचंद आहुजा, बिकमदास कंत्रोड, नंदलाल कुमार, उत्तमचंद कुमार यांनी पुढाकार घेतला होता. महापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळांना कर नाममात्र दरात असतात. मात्र महापालिका दप्तरी गुरुद्वाराची धार्मिक स्थळ म्हणून नोंद नसल्याने गुरुद्वाराला मागील अनेक वर्षापासून करामध्ये सवलत देण्यात आली नव्हती. गुरुद्वाराची करापोटी मोठी रक्कम थकित होती. या संदर्भात पंजाबी, शीख समाजाचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, राजेंद्र कंत्रोड, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, जसपाल कुमार, सतीश गंभीर, अनिश आहुजा यांनी आमदार संग्राम जगताप व उपायुक्त यशवंत डांगे चर्चा करुन कर कमी करण्याबाबत निवेदन देऊन पाठपुरावा केला. या संदर्भात स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व उपमहापौर गणेश भोसले यांनी बैठक घेऊन सदर धार्मिक स्थळाची नोंद करुन घेऊन त्याप्रमाणे कर आकारण्याचे निर्देश दिले. सध्या गुरुद्वाराला कराच्या रकमेत मोठी सूट मिळाली असून, यापुढे वर्षाला नाममात्र कर लावण्यात येणार आहे.  
तारकपूर येथील धार्मिक वास्तूची गुरुद्वारा म्हणून नोंद करण्यात आली असून, या संदर्भाचे पत्र आमदार जगताप यांच्या हस्ते उपस्थित समाजबांधवांना देण्यात आले. यावेळी जतीन आहुजा, राजू जग्गी, राहुल बजाज, जसपाल कुमार, राज गुलाटी, संजू आहुजा, विकी कंत्रोड, अजिंक्य बोरकर, अभिजीत खोसे आदी उपस्थित होते.

तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारार्‍याची महापालिकेत धार्मिक स्थळ म्हणून नोंद झाल्याचे पत्र समाजबांधवांना देताना आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, उपायुक्त यशवंत डांगे व प्रभाग अधिकारी सालसर समवेत हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, राजेंद्र कंत्रोड, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, जसपाल कुमार, सतीश गंभीर, अनिश आहुजा, संजय आहुजा, जतीन आहुजा, राजू जग्गी, राहुल बजाज, जसपाल कुमार, राज गुलाटी, संजू आहुजा, विकी कंत्रोड, विकी कंत्रोड, अजिंक्य बोरकर, अभिजीत खोसे आदी.

Monday, 22 April 2019

होमिओपॅथी उपचार पध्दती आनंदी जीवनशैलीचा मंत्र


नगर । प्रतिनिधी -
होमिओपॅथी जगात लोकप्रिय असलेली सर्वमान्य उपचार पध्दती आहे. या उपचारांतून आजार तर बरा होतोच याशिवाय निरोगी जीवनशैलीचाही मंत्र मिळतो. नगरमध्ये डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिक अशीच निरोगी व आनंदी जीवनशैली सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मागील पंधरा वर्षांपासून करीत आहे. याचा असंख्य रूग्ण लाभ घेत आहेत. विविध आजार तपासणी व उपचार शिबिरांच्या माध्यमातून या क्लिनिकने हाती घेतलेले कार्य खर्या अर्थाने वैद्यकीय पेशाचाही सन्मान वाढविणारे आहे, असे प्रतिपादन सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष सीए डॉ.परेश गांधी यांनी केले.
नगरमध्ये गेल्या दीड दशकापासून होमिओपॅथी उपचार सर्वांना उपलब्ध करून अनेक रुग्णांना व्याधीमुक्त करणार्‍या सारसनगर येथील डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकच्यावतीने सारसनगरमध्ये विविध आजारांवर होमिओपॅथी उपचारांची विशेष शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांचा समारोप प्रोस्टेट, हर्निया, स्पॉण्डीलायटीसीस तपासणी व उपचार शिबिराने झाला. यावेळी शिबिरासाठी सहकार्य करणारे सुनील चोरबेले यांच्यासह पलक बोरा, मनीषा चोरबेले, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा, डॉ.सचिन बोरा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा यांनी सांगितले की, 1 ते 13 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या या शिबिरांचा जवळपास 352 रूग्णांनी लाभ घेतला. विना इंजेक्शन, विना शस्त्रक्रिया परिणामकारक व दुष्परिणाम विरहीत उपचार होमिओपॅथीचे वैशिष्ट्य आहे. या शिबिरांमध्ये मूळव्याध, त्वचारोग, श्वसन समस्या, महिलांचे आजार, किडनी समस्या, केसांच्या समस्या, पोटाच्या समस्या, हाडांचे आजार, मानसिक समस्या, प्रोस्टेट हर्निया, स्पॉण्डीलायटीस अशा अनेक आजारांसह विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच मतिमंद, गतीमंद मुलांच्या संबंधित समस्यांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. प्रत्येक शिबिराला रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
वेळोवेळी अशी शिबिरे घेवून या अतिशय उपयुक्त उपचार पध्दतीचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर रूग्णांवरही विना शस्त्रक्रिया व विना इंजेक्शन उपचारांची सुविधा आहे. कॅन्सर रूग्णांना वेदनामुक्त व आनंदी जीवन जगता यावे यासाठी होमिओपॅथी पध्दतीने त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचाही लाभ अनेक रूग्णांना होत आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉ.सचिन बोरा यांनी आभार मानले.

दि. 23 ते 25 दरम्यान मास्टर अँड मिस फोटोजेनिक स्पर्धेची ऑडिशन


नगर । प्रतिनिधी -
येथील  प्रतिबिंब  संस्थेच्या वतीने फोटो, मॉडेलिंग, फॅशन, व्यक्तिमत्व सौंदर्य यावर आधारित फोटोजेनिक 2019 स्पर्धा घेण्यात येणार असून तसेच विविध टायटल देण्यात येणार आहेत. त्यासाठीची ऑडिशन दि. 23 ते 25 एप्रिलला रोज दु. 3 ते संध्या. 7 पर्यंत स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर येथे होणार आहे.
नगरमध्ये मागील वर्षी साईबनमध्ये बेस्ट फेस ऑफ अहमदनगर सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी  मास्टर/ मिस्टर/मिस /ि मसेस फोटोजेनिक 2019 स्पर्धा  घेत आहोत अशी माहिती मुद्रा कांबळे यांनी दिली.
स्पर्धा पुढील  गटात घेतल्या जाणार असून जेन्टस -1) 5 ते 15व योगट मास्टर फोटोजेनिक  2) 15 वर्षपुढील मिस्टर  फोटोजेनिक  लेडीज - 1) 5 ते 15 वयोगट लिटिल  फोटोजेनिक 2)  15 ते 25 मिस फोटोजेनिक 3)25 वर्षांपुढील मिसेस  फोटोजेनिक असे गट आहेत.  स्पर्धेत विविध बक्षिसे व टायटल देण्यात येणार आहेत. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ऑडिशनमधून निवड झालेल्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी खास प्रोफेशनल ट्रेनर आहेत. तसेच त्यांचे फोटोसेशन करून पोर्टफोलिओ अल्बम बनविण्यात  येणार आहेत. नंतर त्यांची फायनल स्पर्धा होणार आहे.
निवड झालेल्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा सर्व उपक्रम मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर.मो. 9822118913 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात उन्हाचा पारा वाढला


नगर । प्रतिनिधी -
शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, तापमान 40 अंशांच्या घरात जात असल्याने नगरकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
गेल्या दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर उन्हाचा पारा पुन्हा वाढला आहे. तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तीन दिवस उन्हाची तीव्रता जाणवली नाही. शहरात सध्या राजकीय वातावरण जसे जसे तापत गेले तसाच उन्हाचा जोरही वाढत गेला असल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिना सुरु झाला तशी तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-अधिक होत राहिले. गेल्या आठवड्यापासून शहरातील तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला आहे. दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नगरकर घराबाहेर पडणे टाळत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असूनही शहरातील रस्त्यावर  दुपारी सामसूम दिसत होती. दिवसभराचा उकाडा व त्यात भारनियमनाचा त्रासही सहन करावा लागत आहे.

संत निरंकारी चॅरिटेबलतर्फे बुधवारी रक्तदान शिबिर


नगर । प्रतिनिधी -
निरंकारी मिशनतर्फे बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या स्मृती दिवसानिमित्त 24 एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त बुधवार दि. 24 एप्रिल रोजी संत निरंकारी सत्संग भवन, मिस्कीन रोड येथे सकाळी 10 ते दु. 12.30 यावेळेत सत्संग प्रवचन तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या नगर शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मिस्कीन रोड, जॉगिंग पार्कसमोरील निरंकारी सत्संग भवन, नगर येथे सकाळी 9 ते दु. 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होईल.
शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल धूत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येईल. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती निरंकारी सेवा दल शिक्षक अनिल टकले यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या 24 वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित केली जात असून, निरंकारी भक्तगण व नागरिक मोठ्या श्रद्धेने येऊन रक्तदान करतात. सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे या कामी सहकार्य लाभते. तसेच जिल्ह्यातही निरंकारी मंडळाची शाखा असलेल्या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे दि. 24 एप्रिल या एकाच दिवशी देशभरात अनेक ठिक़ाणी रक्तदान शिबिरांचे आयेाजन केले जाणार असून त्याद्वारे एकाच दिवशी 20 हजारहून अधिक युनिटस् रक्त संकलित होणार आहे.

महावीर इंटरनॅशनल वीर-वीरा शिरुर केंद्राचे पदग्रहण


नगर । प्रतिनिधी -
समाजातील दुर्बल घटकांची विविध मार्गाने सेवाभावी कार्य करणार्‍या महावीर इंटरनॅशनल या संस्थेने 45 वर्षांत देश-विदेशात लौकिक प्राप्त केला व आज भगवान महावीर स्वामीजींच्या जन्मदिनी शिरुर (जि. पुणे) येथे सुनील बाफना व समीक्षा बाफना यांच्या प्रेरणेने वीर आणि वीरा केंद्राचे पदग्रहण होत आहे. त्यानिमित्त महावीरांना अपेक्षित असलेले सेवाभावी कार्य म्हणून या सदस्यांनी पुणे येथील नामांकित 15 डॉक्टर व हार्डीकर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने 400 रुग्णांची तपासणी करुन पुण्य कमावले, हे अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना यांनी केले.
बाफना यांच्या हस्ते वीर-वीरा सदस्यांचा शपथविधी पार पडला, यावेळी ते बोलत होते. झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा व वीरा माजी अध्यक्षा बरमेचा यांनी वीरांना शपथ दिली. नवकार मंत्र, महावीरांची प्रार्थनानंतर सर्व ज्ञात-अज्ञात मृतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.  सेक्रेटरी सुदर्शन दुगड यांनी उपस्थितांचे स्वागत करुन महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
नगरच्या वीरा केंद्र अध्यक्षा उज्ज्वला बोथरा यांनी महावीर चिन्हाने वीर-वीरांना सन्मानित करुन शुभेच्छा दिल्या. शिरुर केंद्राचे अध्यक्ष सुनील बाफना यांनी महाआरोग्य शिबिरास सहकार्य करणार्‍या डॉ. हर्डीकर व त्यांच्या सदस्यांचे आभार मानले व 400 हून अधिक रुग्ण आप्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. वीरा केंद्राच्या नूतन अध्यक्षा समीक्षा बाफना व सचिव सपना दुगड यांनी शिरुर शहरात महिला व युवतींसाठी भरीव सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला. उपाध्यक्ष अभय चोरडीया यांनी शिरुर केंद्राच्या नियोजित उपक्रमांचा आढावा सादर केला व शिरुरच्या समाजबांधवांचे सर्व उपक्रमांना सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.
सुप्रिका दुगड हिने या उपक्रमास उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल संघपति शांतीलालजी कोठारी यांनी तिचा सत्कार केला. लवकरच आपण शिरुर शहरात युवती केंद्र सुरु करु असे सुप्रिका हिने जाहीर केले व त्यास उपस्थित सर्व युवतींनी प्रतिसाद दिला. संघपति शांतीलाल कोठारी यांनी आपल्या भाषणात महावीर इंटरनॅशनलचे कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व या केंद्राद्वारे शिरुर येथे भरीव कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास नगर केंद्राचे माजी अध्यक्ष महेंद्र लोढा, उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा, संचालक मनोज शेटिया, माणकचंद कटारिया, राजेंद्र बोथरा, सुवालाल ललवाणी, श्रेणिक नहार व वीरा केंद्राच्या उपाध्यक्षा निर्मल बाफना, माजी अध्यक्षा सरला बरमेचा, अध्यक्षा उज्ज्वला बोथरा, वैशाली शेटिया, मंजुषा ललवाणी, सजनबाई कटारिया व सचिव सुरेखा संचेती, शोभा लोढा आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतीलाल बाफना, चोरडिया, दुगड आदी परिवार व शिरुरचे बंधू-भगिनी उपस्थित होते. वैभव गादिया यांनी आभार मानले.

मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ


नगर । प्रतिनिधी -
वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या वतीने नगरमध्ये साळी समाजातील सर्व महिला, मुली व मुलांसाठी  मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कॉम्प्युटर, शिवणकाम, ब्युटीपार्लर व फोटोग्राफीच्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे  उद्घाटन स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकेच्या जवळ, दिल्लीगेट, अहमदनगर येथे राज्य स्वकुळसाळी समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा  सौ. मृणाल कनोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  सुषमा साळी, मंगला मानकर, प्रशिक्षक सौ. अनुजा कांबळे, महेश कांबळे, सुनील साळी, सौ.सविता हावरे, महेश ढोरजे यांच्यासह फाउंडेशनचे संपर्क प्रमुख, प्रशिक्षणार्थी, समाजबांधव उपस्थित होते.
मृणाल कनोरे म्हणाल्या की, मोफत प्रशिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत मोफत प्रशिक्षण मिळत होते, आता सध्याचा जमान्यात मोफत देणे अवघड आहे तरी वर्ल्ड साळी फाउंडेशनने नोकरी न करता समाजातील युवक-युवतींनी स्वतःचा व्यवसाय करावा या हेतूने आयोजलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
या शिबिरात वय वर्षे 15 च्या वरील कोणीही समाजबांधव सहभागी होऊ शकतो. असे संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिर पूर्ण  करणार्‍यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय/निमशासकीय स्तरावरील कर्ज योजना यांच्या माहितीद्वारे मदत करण्यात येईल.
तसेच असहाय, गरीब, गरजू महिला, मुली व मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.