Saturday, 2 February 2019

शंकराचार्य स्वामींचे नगरमधून प्रस्थान


नगर । प्रतिनिधी - येथील प.पू.सद्गुरू श्रीरामकृष्ण स्वामी महाराजांच्या संकल्पातून श्रीदत्तक्षेत्रमध्ये निर्माण झालेल्या मंदिरातील भगवान श्री दत्तात्रेय मूर्तीचा कुंभाभिषेक व मंदिराचा कलशाभिषेक करण्यासाठी आलेल्या शृंगेरी पीठाधीश्वर शंकराचार्य श्रीश्रीश्री विधुशेखरभारती स्वामींनी येथे सात दिवस थांबून भरभरून आशीर्वाद देत औरंगाबादकडे प्रस्थान केले. त्यांना निरोप देताना श्रीदत्त देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व स्त्री-पुरूष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       श्रीदत्त देवस्थानतर्फे शंकराचार्य स्वामींना मानपत्र अर्पण करण्याचा सोहळा झाला. शृंगेरीपीठाचे प्रशासक पद्मश्री डॉ.व्ही.आर.गौरीशंकरयांचाही सन्मान देवस्थानकडून करण्यात आला. विश्वस्त मोहन शुक्ल यांनी डॉ.गौरीशंकर यांचा परिचय करून दिला.विश्वस्त सचिव श्री.संजय क्षीरसागर, विश्वस्त श्री.देवराज काशीकर, श्री.राजन जोशी, श्री.नितीन जोगळेकर, श्री.दिनेश पटवर्धन व श्री.मोहन शुक्ल यांच्या हस्ते महावस्त्र, मानपत्र व पुष्पहार शंकराचार्य स्वामींना अर्पण करण्यात आले.
विश्वस्त सचिव श्री. संजय क्षीरसागर यांनी देवस्थानतर्फे मनोगत व्यक्त केले. शंकराचार्यांच्या दिव्य सान्निध्यातील आनंददायी क्षणांचे स्मरण करत सर्वांनी त्यांना पुढील यात्रेसाठी निरोप दिला.

रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर्सला पुरस्कार


नगर । प्रतिनिधी - नगर-पुणे रस्त्यावर नुकत्याच झालेल्या जितो महाट्रेड फेअरमध्ये एज्युकेशन व सर्व्हिस विभागात बेस्ट स्टॉल प्रेझेन्टेशन व डिझायनर्सचा प्रथम पुरस्कार एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अरविंद पारगावकर, एसीसीसीचे वरिष्ठ अधिकारी धीरज गुगळे यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार प्राचार्य नितीन बोंडे व विद्यार्थ्यांनी स्वीकारला.
यावेळी सीए रमेश फिरोदिया, जितो नगरचे अध्यक्ष गौतम मुनोत, सचिव अमित मुथा, प्रोजेक्ट अध्यक्ष जवाहर मुथा उपस्थित होते.
रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर्सच्या विद्यार्थ्यांनी या फेअरमध्ये सुंदर असा स्टॉल तयार केला होता. स्केचिंग, पेंटिंग, स्ट्रक्चरचा कलात्मक व कल्पक वापर केलेल्या स्टॉलला भेट देणार्‍यांना वास्तुशास्त्र, कला याविषयी अधिक व सखोल ज्ञान प्राप्त झाले. नाविन्यपूर्ण रचनेमुळे आर्किटेक्टचे महत्व कळाले. ऋषिकेश झेंडे, प्रतीक शिंदे, रोशन कुडकर, संकेत तांबे, ओंकार शेटे, यश जाधव, सिद्धी कांकरिया यांनी सुरेंद्र गाडे व कलाकार रवींद्र सातपुते यांच्या सहकार्याने या स्टाँलची रचना केली होती.
त्याचबरोबर जितो महाट्रेड फेअरमधील ऐतिहासिक दालनाच्या सजावटीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे अतुलनीय योगदान होते. नगरच्या ऐतिहासिक वास्तूच्या दालनाची नाविन्यपूर्ण सजावट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. साक्षी मुथा, वैष्णवी गुजर, साक्षी पडवळ, ज्ञानेश्वरी सोमाणी, प्रज्ञा तुळसकर, सिरीन तांबोळी, यश भंडारे, मृणाली डहाळे, रुची बेदमुथा यांनी रात्रदिवस मेहनत करून नगरी वारसा दर्शन दालनाची निर्मिती केली. या दोन्ही पुरस्काराबद्दल संस्थेचे प्रमुख सीए रमेश फिरोदिया व डॉ. शरद कोलते यांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

सोमवारपासून नाट्यनगरी दुमदुमणार


नगर । प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत संगीत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी माउली सभागृह, सावेडी येथे सोमवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी होत आहे. ही स्पर्धा नगरमध्ये प्रथमच होत असल्यामुळे नगरच्या सांस्कृतिक वर्तुळासाठी ती अभिमानाची बाब ठरली आहे.
नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात संगीत, साहित्य, नाट्याची उज्ज्वल परंपरा तशी पूर्वीपासूनच आहे. यासाठी पूर्वी अनेकांनी योगदान दिलेले आहे. विशेषतः स्व. गो.म. देवस्थळी, डॉ. श्रीराम रानडे, रघुनाथराव क्षीरसागर, ल. का. कुलकर्णी, रासोटे सर, मालशे सर, चंद्रकांत भोंजाळ, भारत ससाणे,  विलास गिते, श्रीधर अंभोरे, प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, अनिल क्षीरसागर, अण्णासाहेब रानडे, नाथबुवा दीक्षित अशा अनेकांनी संगीत साहित्य व नाट्यांची उज्ज्वल परंपरा टिकून अधिकाधिक यशस्वी केलेली आहेत.
संगीत नाट्य क्षेत्रात रुस्तुम काका  हाथीदारू यांना प्रति बालगंधर्व म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते, तर रावसाहेब दुधाडे यांना युवा गंधर्व म्हणून ओळखले जाते. संगीत नाट्य रंगभूमीवर बालगंधर्वांचा वारसा म्हणजे गंधर्व गायकी जोपासली ती स्व. तात्यासाहेब तांबोळी, वसंतराव पाठक, पंडितराव भावे, तात्या भावे, गावडे, वाबळे, उषाताई शास्त्री, आशाताई देशपांडे, बाबूराव जाधव, शुन्नूमियासय्यद असे अनेक रुस्तुम काका बालगंधर्वांची गाणी गात असत. त्यांना केडगाव देवीचे बापूकाका गुरव व तात्या भावे तबला-व्हायलीनची साथसंगत करत असत.
‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक अ.ए.सो.च्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी मोने कलामंदिरमध्ये 1969साली सादर केले होते. रघुनाथ केसकर, मु.स.जोशी, शिवा दीक्षित, मुळे सर, कालिंदी कुलकर्णी, कुमुदिनी करमरकर, ल.भ. कुलकर्णी आदींनी हा प्रयोग यशस्वी केला होता.
या स्पर्धा नगरच्या सर्व गायकांना व वादकांना मार्गदर्शक ठरणार आहेत. नाट्यसंगीत आशयानुसार कसे गायिले जाते, ऑर्गनची साथ कशी पोषक करावी तबल्याची भरगच्च साथ कशी असते अशा अनेक दृष्टिकोनातून ही फार मोठी संधी आहे. तसेच व्यावसायिक संगीत नाटके नगरला येत नसल्याने  नगरच्या संगीत रसिकांनी अवश्य उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी  करण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीनाथ नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या


नगर । प्रतिनिधी - श्रीनाथ नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांची फसवणुक झाली आहे. या पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश नाशिक विभागीय सहनिबंधक यांनी दिले असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याने व पतसंस्थेचे ऑडिट करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ संतापलेल्या ठेवीदारांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
 जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक केलेल्या पोपट एकनाथ शेवाळे यांच्या श्रीनाथ नागरी पतसंस्था मर्या. या पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याकामी विभागीय सहनिबंधक नाशिक विभाग नाशिक यांनी दि.4 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा उपनिबंधक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने तसेच सदरच्या पतसंस्थेचे ऑडिट करण्यास या विभागाचे लेखापरिक्षक बी.ई. टेकाळे टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ पतसंस्थेच्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सहकार विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपहार करण्यास पतसंस्थांना वाव मिळत असल्याचा आरोप ठेवीदारांच्या कृती समितीचे अध्यक्ष गणेश गिते यांनी केला. श्रीनाथ नागरी पतसंस्थेची चौकशी व ऑडिट पुर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांना देण्यात आले. अन्यथा दि.12 फेब्रुवारी पासून जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष गणेश गिते, राजेंद्र कुमार डोंगरे, सोपान शेवाळे, बाबासाहेब शेवाळे, समीर भगत, बबन शिंदे, लिंबराज डोंगरे आदी उपस्थित होते.

पगार रखडल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा आक्रोश


नगर । प्रतिनिधी - ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे तीन महिन्यापासून तर नऊ महिन्या पर्यंतचे ऑनलाईन पगार रखडल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आक्रोश आंदोलन करण्यात आले. हलगीच्या निनादात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली. 
पुर्व सुचना देऊन आंदोलन करण्यात आले असताना जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक आणखी संतापले होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजे पर्यंत आंदोलन चालू होते. शेवटी ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी दळवी यांनी ऑनलाईन थकित पगार दि.7 तारखे पर्यंत देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 
बुरुडगाव रोडवरील भाकपच्या कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात राज्य सह सचिव अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, जिल्हा संघटक मारुती सावंत, कार्याध्यक्ष संदीप आल्हाट, सुनिल शिंदे, योगा कानडे, राजेंद्र कोरडे, भाऊसाहेब गिरवले, संजय शेलार, दादासाहेब साळवे, राहुल पोळ, एकनाथ वखरे, महादेव ढगे, देविदास साळवे, अशोक गुंजाळ, शांताराम पारधे आदिंसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.    
 गेल्या वर्षापासून ग्रामपंचायत आकृतीबंधातील कर्मचार्‍यांसाठी ऑनलाईन पगार सुरु झाल्याने सर्व आनंदात होते. मात्र ऑनलाईन पगार होताना अनेक त्रुटी निर्माण होऊन त्यामध्ये दुरुस्त्या झाल्या. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार हे काम व्हावे असे ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश आहेत. मात्र जवळपास तीन ते नऊ महिने होऊन देखील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार त्यांच्या बँकेत जमा झालेले नाहीत. ज्यांचे पगार जमा झाले, त्यांचे पगार कमी जास्त अदा करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांचे पुर्ण पगार होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे कर्मचार्‍यांवर उमासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वास्तविक ग्रामसेवक, बिडीओ व जिल्हा परिषद यांनी समन्वय साधून दर महिन्याला 25 ते 31 तारखे पर्यंत कर्मचार्‍यांची माहिती डाटामध्ये भरुन पगारविषयक सर्व पूर्तता करणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी कोणत्याही तालुक्यातून होताना दिसत नसल्याने, कर्मचार्‍यांचे वेळेवर पगार होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा 1 ते 10 तारखे पर्यंत दर महिन्याचा पगार जमा होणे आवश्यक आहे. ऑनलाईन पगाराबाबत पुर्तता होत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जर सर्व कर्मचार्‍यांचे ऑनलाईन कामकाज पुर्ण झालेले नसेल तर निदान ज्या कर्मचार्‍यांची पगारविषयक पूर्ण माहिती भरली गेली त्यांचे पगार रोखून न ठेवता अदा करावेत, थकित पगार तातडीने अदा करुन ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे ऑनलाईन पगार मिळावेत.

प्राचार्या गीता गिल्डा यांना निरोप


नगर । प्रतिनिधी - गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्वांसमोर कौतुक झाले तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते, या हेतूने आयोजित हा पारितोषिक सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमातून मिळणारा आनंद सर्वांना अधिक महत्वाचा आहे, असे प्रतिपादन बजरंग दरक यांनी केले.
श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूल व मोहनलाल रामअवतार मानधना ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व प्राचार्या सौ. गीता गिल्डा यांचा निरोप समारंभ बजरंग दरक यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्रीगोपाल धूत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, सहसचिव राजेश झंवर, श्रीगोपाल जाखोटिया, लक्ष्मिकांत झंवर, रामसुख मंत्री, सत्यनारायण सारडा आदी उपस्थित होते.
यावेळी गोपाल धूत म्हणाले, स्पर्धेत प्रथम क्रमांक एकालाच मिळतो. अशावेळी इतरांनी सहभाग घेतला नाही तर त्याला महत्त्व राहील का? खरे तर सहभागातून विद्यार्थी घडतात, म्हणूनच त्यांचे कौतुक झाले पाहिजे. प्राचार्या गिल्डा यांचे योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याची स्तुती व कौतुक म्हणजे संस्थेचीच स्तुती आहे. त्यांच्या काळात संस्थेने भरीव प्रगती केली आहे. यापुढेही त्यांचे सतत मार्गदर्शन मिळेल.
यावेळी नंदकुमार झंवर, सहसचिव राजेश झंवर, श्रीगोपाल जाखोटिया, लक्ष्मिकांत झंवर, राधिका जेऊरकर, अंजना पंडीत, लोळगे, विद्यार्थी सार्थक घोरपडे यांनी प्राचार्या गिल्डा यांच्याविषयी आलेले अनुभव सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिवाजीराव कर्डिले खिंडीत सापडणार, की खिंड भेदणार?



नगर - जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना धोबीपछाड देत शून्यातून जिल्ह्यात व राज्यात राजकीय अस्तित्व निर्माण करणारे नगर-राहुरी मतदारसंघातील भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना आगामी विधानसभेत पराभूत करण्यासाठी थेट बारामतीकरांनीच कंबर कसली आहे. त्याची प्रचिती काल, शुक्रवारी जेऊरच्या सभेत पाहावयास मिळाली. मतदारसंघातील नगर तालुका, पाथर्डीचे शिवसेना पदाधिकारी व राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित बैठक घेतली. सर्वांनी एकजुटीने कर्डिलेंना पराभूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. नगर तालुका आणि पाथर्डीचे मतदारच कर्डिलेंना घरचा रस्ता दाखवू शकतात. सर्व सहकार्य मी करायला तयार आहे. राष्ट्रवादीची सर्व फौज तुमच्या पाठीशी करतो. फक्त भाजपचा आमदार घरी बसवा असा इशारा पवारांनी पदाधिकार्‍यांना बैठकीत दिला. त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पावलं उचलली असून नक्कीच बदल करण्याचे आश्वासन यावेळी पवारांना दिले. भल्याभल्यांना राजकारणात चेकमेट देणारे कर्डिले हरणार्‍यातले नसून त्यांनीही विकास कामांच्या उद्घाटनांचा जोर वाढविला आहे. निवडणूक जिंकण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. परंतु बारामतीकर ज्या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करतात त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्डिले खिंडीत सापडणार, की खिंड भेदणार याबाबत आता संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 
  राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा दोन दिवस नगर जिल्ह्यात झाली. काल शुक्रवारी रात्री 8 वाजता जेऊर (ता.नगर) मध्ये अर्थातच आ.शिवाजी कर्डिले यांच्या मतदारसंघात परिवर्तन यात्रेची सांगता सभा झाली. या सभेवेळी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व नगर तालुका राष्ट्रवादी, काँग्रेसह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मोठी गर्दी जमवली होती. या सभेत भाजपशिवाय सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणातून कर्डिलेंना टार्गेट केले गेले तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचेही जगजाहीर बोलून दाखविले. 
राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हा तरूण चेहरा असून त्याला सर्वांनी सहकार्य करण्याची सादही पवारांनी घातली. म्हणजे प्रत्यक्षरित्या तनपुरेच विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याचे जाहीर झाले. या सभेत तनपुरे यांनी दोन-अडीच हजार कार्यकर्ते राहुरीतून आणले होते. सभेत तनपुरेंनीही शक्तीप्रदर्शन