Friday, 1 February 2019

सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विजय शेवाळे


नगर । प्रतिनिधी - अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील सरपंच विजय शेवाळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय नगर तालुकाध्यक्षपदी हिंगणगावचे आदर्श सरपंच आबासाहेब सोनावणे, सरपंच परिषद महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी राजश्री कार्ले पाटील, तर नगर तालुका उपाध्यक्षपदी बापूसाहेब आव्हाड व तालुका उपाध्यक्षपदी धनंजय खर्डे यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने नगर तालुका सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा मेळावा काल, गुरुवारी नगर पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्य समन्वयक अविनाश आव्हाड, जिल्हाध्यक्ष अनिल गिते पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आबासाहेब सोनावणे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल शेडाळे यांनी केले. बापूसाहेब आव्हाड यांनी आभार मानले.नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द व आत्मविश्वास जोपासावा ः गुगळे


नगर । प्रतिनिधी - कठीण व अडचणींच्या परिस्थितीशी सामना करण्याची वेगळी ताकद व उर्मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये असतेच. त्यामुळे अशा मुलांनी जिद्द व आत्मविश्वास जोपासले तर ते यशस्वी होतील, असे मत एमआयआरसी व एसीसी अ‍ॅडचे फायनान्स अ‍ॅडव्हायजर धीरज गुगळे यांनी व्यक्त केले.
आयएमएसमध्ये आयोजित आग्नेयम 2019 आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा धीरज गुगळे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी आयएमएसचे संचालक डॉ. एस. बी. मेहता, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. मीरा कुलकर्णी उपस्थित होते. या स्पर्धेत संगमनेर कॉलेजने सांघिक विजेतेपद मिळविले.
आग्नेयम स्पर्धेचा शुभारंभ संचालक डॉ. एम. बी. मेहता यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. मीरा कुलकर्णी म्हणाल्या, दरवर्षी विद्यार्थी आग्नेयम स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहतात. यावर्षी 18 महाविद्यालयातील 626  विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांत सहभाग घेतला. विविध अशा 8 प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.सांघिक विजेतेपद चषक व दहा हजार रुपये संगमनेर कॉलेजने (संगमनेर) मिळविले. व्यावसायिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत अतुल कुमार व कमलजीत सिंग (अहमदनगर कॉलेज बी. ए. विभाग) हे विजयी तर नरेंद्र देशपांडे व दुर्गेश भाबड (संगमनेर कॉलेज) उपविजयी ठरले. फेस पेंटिंग स्पर्धेत मानसी बोकरीया व ऋतिका अवताडे (रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्टचरर्स) विजयी तर कोमल कोलते व देवशिष खांडेकर (यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज) हे उपविजयी झाले. कोलाज स्पर्धेत नेहल तलवार व भाग्यश्री शिंदे (न्यू आर्टस कॉलेज, अ. नगर) विजयी तर उपविजती वैष्णवी जायले, कांचन जैस्वाल, प्रतीक्षा काकडे, निकिता जे (यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज) हे झाले. मॉक प्रेस स्पर्धेत मंगेश वाघमारे (संगमनेर कॉलेज) विजयी तर दिपाली वारे (रमेश फिरोदिया आर्ट, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, साकुर) उपविजयी झाली. अ‍ॅड मॅड शो स्पर्धेत गणेश आकाश व टीम, प्रोडक्ट्स ब्रूम (प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी, लोणी) विजयी तर मंगेश अक्षय व टीम, प्रोडक्ट कॅमेरा (संगमनेर कॉलेज) हे उपविजयी झाले. गायन स्पर्धेत संकेत रामडे (न्यू आर्टस कॉलेज, नगर) व सागर जीवार (रमेश फिरोदिया आर्ट, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, साकुर) हे विजयी तर अनुजा सराफ (संगमनेर कॉलेज) व अनुराग ढगे (विश्वकर्मा कॉलेज) हे उपविजयी झाले. एक्स टेम्पो स्पर्धेत अक्षय उगले (संगमनेर कॉलेज) विजयी झाला तर रेवनाथ सुतार (अभिनव कॉलेज, अकोले) हा उपविजयी ठरला. ग्रुप  डान्स स्पर्धेत अभिनव कॉलेज ऑफ सायन्स, अकोला संघ विजयी तर रमेश फिरोदिया आर्ट, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, साकुरचा संघ उपविजयी ठरला.
सूत्रसंचालन आयएमएसच्या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रा. डी. ए. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. विक्रम बार्नबस, प्रा. मनोज कुलकर्णी, आयएमएसचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुलींची संख्या वाढल्यास समाजाची विस्कटलेली घडी सुधारेल ः डॉ. सुधा कांकरिया


नगर । प्रतिनिधी - भारतीय संस्कृती ही सण व उत्सवाने परिपूर्ण आहे. प्रत्येक सण व उत्सव महत्वपूर्ण संदेश घेऊन येतो. तसाच संक्रांतीचा सण तिळासारखा स्नेह व गुळाचा गोडवा घेऊन येतो. संक्रांती अर्थात सकारात्मक क्रांती व्हावी, या उद्देशाने महिलांना वाणही दिले जाते. त्यानुसार भृंगमहाऋषी विकास प्रतिष्ठानने आज समाजाला सुविचाराचे वाण दिले आहे. हा सुविचार म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा हा विचार समाज मनामध्ये जागृत झाला तर घराघरातून स्त्री जन्माचे स्वागत होऊन मुलींची संख्या वाढेल. त्यातून समाजाची विस्कटलेली घडी व्यवस्थीत होईल. आज स्त्रीभ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे लग्नाला मुली मिळत नाहीत, अशी वास्तवता स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी मांडली.
कल्याण रस्त्यावरील गणेशनगर येथील भृंगमहाऋषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, योग शिक्षक सुरेश पाटील, लक्ष्मणराव पोकळे, मनोज बनकर, शरद ठाणगे, गणेश शिंदे, पोपट रासकर, पोपट शेळके, वैशाली नळकांडे, सविता शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठानच्या शिल्पा पोपट शेळके म्हणाल्या, या परिसरात भृंगमहाऋषी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात. महिला बचत गटांचा मेळावा, वृक्षारोपण, विविध सण उत्सवांमध्ये महिला उत्साहाने भाग घेत असतात. यावर्षी हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांना वाणाबरोबरच सामाजिक संदेश देण्यासाठी डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक ज्योती पोपट रासकर यांनी केले. त्या म्हणाल्या, महिलांनीच महिलांच्या विकासात हातभार लावला पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन आपली उन्नत्ती साधण्याची गरज आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त एकमेकींचे सुख-दु:ख वाटून घेण्याचा व महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका पुष्पा बोरुडे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे यांचा प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी भृंगमहाऋषी विकास प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव केला.
मुलींच्या जन्माचे स्वागत कन्याजन्म आनंद सोहळ्याने करण्याचा संकल्प करुन सामूहिक शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन पोपट शेळके यांनी केले. पोपट रासकर यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील पारंपरिक कला जोपासण्याची गरज ः आशिमिक कामटे


नगर । प्रतिनिधी - गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक अविष्कार म्हणजे तमाशा. तमाशा हा महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. लहानपणापासूनच लावणीची आवड असल्याने पुरुष असूनही लावणी करण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. भूमिका समजून अभिनय करण्यात खरा आनंद आहे, असे मत लावणीसम्राट व नृत्य दिग्दर्शक आशिमिक कामटे यांनी व्यक्त केले.
शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण झाले. या कार्यक्रमात कामटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सिताराम खिलारी, जयंत वाघ, अलकाताई जंगले, निमाताई काटे, मुकेश मुळे, मेघाताई काळे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य प्रा. मच्छिंद्र म्हस्के आदी उपस्थित होते.
कामटे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात एकतरी कला जोपासली पाहिजे. अभ्यासाबरोबरच आपणास ज्या कलेविषयी आवड आहे, ती जोपासली पाहिजे. त्यातून तुम्हाला आनंद तर मिळेलच परंतु त्याचबरोबरच त्या कलेत नैपुण्य मिळविल्यास करिअरही करता येऊ शकते. महाराष्ट्रातील पारंपारिक कला जोपासण्याची आज गरज आहे.
याप्रसंगी रा. ह. दरे म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. जिद्द व चिकाटीने कोणतेही काम केल्यास यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असल्यास समाजामध्ये मान-सन्मान मिळतो. शिक्षणाचा उपयोग स्वत:चे जीवन समृद्ध करण्यासाठी करा. मेंदू ठासून पगारी, भाडेतत्वाने देणे बंद करा. माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा.
यावेळी आशिमिक कामटे व त्यांच्या सहकार्‍यांनी ‘रंग लावणीचे’ महाराष्ट्राची ओळख व अस्मिता असलेल्या लावणीचे विविधरंगी आविष्कार सादर केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संगीत विभागाने गण सादर केला. स्वागत प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. मच्छिंद्र म्हस्के यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. राजेंद्र जाधव यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. उध्दव उगले व प्रा. राजेंद्र जाधव यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. सुभाष ठुबे यांनी आभार मानले.

स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार : आ.संग्राम जगताप


नगर । प्रतिनिधी - वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या स्मशानभूमीसह समाजातील इतर प्रश्नही खूप महत्वाचे आहेत. स्मशानभुमीबाबत तातडीने उपाय योजना राबविण्याबाबत या प्रभागातील नगरसेवक व मी स्वत: प्रयत्न करुन हा विषय तातडीने मार्गी लावणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
आ.जगताप म्हणाले की, वीरशैव लिंगायत समाजाला मनपाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देऊ, त्यावर समाज मंदिर बांधण्यासाठी आमदार निधी देऊ. समितीच्या वतीनेही या ठिकाणी श्रमदान व इतर उपक्रम राबवावेत असेही त्यांनी सांगितले. 
काटवन खंडोबा रोडवरील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची झालेल्या दुरावस्थेची पाहणी  आ.संग्राम जगताप यांनी केली. यावेळी वीरशैव लिंगायत स्मशानभुमी सुधार समितीच्यावतीने नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. 
 याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, प्रशांत गायकवाड, प्रकाश भागानगरे, सुवेंद्र गांधी, दत्ता जाधव,  संभाजी पवार, गणेश नन्नवरे, स्मशानभूमी सुधार समितीचे  संतोष तोडकर,  वैजिनाथ लोखंडे, अध्यक्ष संजय कोरपे, संजय फिरोदे, प्रा.वसंत बैचे, दिलीप तोडकर, नंदू चिखले, गणेश वाळेकर, कैलास हुंडेकरी, विनय नगरकर, विनय होनराव आदि उपस्थित होते.
 माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी म्हणाले, समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्रित प्रयत्न केले जातील. केंद्रात, राज्यात व महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्याने समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करुन ते सोडविण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणार आहोत. 
उपमहापौर मालन ढोणे, माजी महापौर सुरेखा कदम व सुवर्धा जाधव, प्रशांत गायकवाड, प्रकाश भागानगरे, विद्या खैरे यांनीही मनोगत व्यक्त केले. 
यावेळी विजय क्षीरसागर, वैजीनाथ हडतगुणे, गणेश वाळेकर, प्रकाश हडतगुणे, प्रकाश हापसे, अ‍ॅड.डि.एस. लोखंडे, नंदू चिखले, तात्या कंठाळे, अ‍ॅड.नितीन जंबुरे, शिवलिंग डोंगरे, नंदकुमार फिरोदे, योगेश कंठाळे, दिलीप तोडकर, शरद सुगंधी, आदिनाथ तोडकर, शशिकांत गुळवे, अमोल राळेगणकर, संदिप क्षीरसागर, प्रितम तोडकर, अमित बेद्रे, संतोष घोडके, राजेश बिडवाई, ट्रस्टचे अध्यक्ष संजय फिरोदे, भारत होनराव, विशाल होनराव, महिला अध्यक्षा अर्चना कोरपे, अर्चना वाळेकर, निर्मला होनराव, विद्या सुगंधी, मीना हापसे, मनिषा कंठाळे आदिंसह समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सत्ताधार्‍यांना सरकार चालविण्याची अक्कल नाही ः धनंजय मुंडे


नगर । प्रतिनिधी - अनेक खोटी आश्वासने देऊन भाजप सरकारने जनतेला आशेला लावले. मात्र, प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काहीही पडले नाही. सरकार चालवायला अक्कल लागते. सत्ताधार्‍यांना ती नसल्यामुळेच असे घडते आहे, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
पारनेर येथे काल, गुरुवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा व युवा नेते नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी प्रवेश यानिमित्त आयोजित सभेत श्री. मुंडे बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, दिलीप वळसे, आमदार वैभव पिचड, आमदार रोहीत जगताप, रोहीत पवार, सर्जेराव निमसे, अंकुश काकडे, अविनाश आदिक, पोपटराव गावडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उदय शेळके, सबाजी गायकवाड, दीपक पवार, अशोक सावंत, कपिल पवार, संदीप वर्पे, बाबाजी तरटे, उद्धव दुसुंगे, विक्रम कळमकर, प्रशांत गायकवाड, शंकर नगरे, सुदाम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. मुंडे पुढे म्हणाले की, आमचा पक्ष शब्द पाळणारा असून, पारनेरला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, भाजप सरकारच्या पापात शिवसेनेचाही वाटा आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून ते ऊठसूट सत्तेवर लाथ मारीन असे म्हणतात. परंतु तसे करीत नाहीत. सरकारने विविध कर आकारून जनतेची लूट चालविली असून, या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी हा पक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांवर चालणारा आहे. पक्षात तालुक्यात अनेक गट असले तरी त्यांना एकत्र आणून तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचाच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छगन भुजबळ म्हणाले की, भाजप सरकारने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे मोदींना चोर म्हणतात, तर दुसरीकडे त्यांच्याच साथीने सत्तेत भागीदार होतात, अशी टीका त्यांनी केली. यावेळी अनेकांची भाषणे झाली.

नगरची जागा राष्ट्रवादीला


नगर । प्रतिनिधी - नगर-दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी-काँग्रेसला मिळाली आहे. त्यामुळे तीन-तीन वेळा या जागेसंदर्भात चर्चा करण्याची काहीच गरज नाही. मुळात सर्व जागांचा तिढा सुटलेला आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे एकत्र जागेची घोषणा करतील. नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असून कोणीही अपक्ष उभा राहणार नसून आघाडीचा एकच उमेदवार दिसेल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशनजळील असणार्‍या राष्ट्रवादी भवनात आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री मधुकर पिचड, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. 
यावेळी पवार म्हणाले की, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा कालपासून नगरमध्ये आली असून नगरमध्ये कर्जत-जामखेड व पारनेरसारख्या ठिकाणी मोठ-मोठ्या सभा झाल्या आहेत. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद नगर जिल्ह्यात मिळाला आहे. या सरकारने राज्यात व देशात जनतेला वेड्यात काढले आहे. शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान या सरकारने केलेले दिसून येते. शेती व पाण्यावर शून्य नियोजन आहे. आमच्या काळात पाण्याचा विभाग माझ्याकडे होता. अतिशय सक्षमपणे पाणीवाटपाचा काम आम्ही केले. या जिल्ह्यात मोठ-मोठी धरणे असून दुष्काळात पाणीवाटपाचा विषय यांना मार्गी लावता आला नाही. जनतेला आंदोलने करावी लागत आहेत. उसाच्या दरावरून अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतो आहे. योग्य हमीभाव उसाला मिळत नसून योग्य तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी केली, ती फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसा दिसत नाही. या देशात बँकांमध्येच घोटाळा होतो आहे. सरकारश संलग्न असणार्‍या बँकांमधूनच भ्रष्टाचार होताना दिसतो आहे. यामध्ये एसबीआय बँक सुध्दा सुटलेली नाही. शेतकर्‍यांच्या पिकाला या साडेचार वर्षात हमीभाव मिळाला नसल्याने शेतकरी नाराज असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. यासह अनेक विषय या सरकारच्या काळात आ वासून उभे आहेत. परंतु यांना सोडविता येत नाहीत. या सर्व विषयांवर राज्यभर आमच्या पक्षाने परिर्वतन यात्रा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काढली आहे. त्यामुळे नक्कीच परिवर्तन होणार असून जनता आता आमच्या पाठीशी खंबीर उभी राहिलेली आहे. या परिवर्तन यात्रेत राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला आहे, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.