Showing posts with label sport. Show all posts
Showing posts with label sport. Show all posts

Tuesday, 19 March 2019

हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंचे यश


नगर । प्रतिनिधी - हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून अनेक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये घवघवीत यश संंपादन करीत आहेत. अजीम काझी, किरण चोरमले, ओंकार येवले, अश्कान काझी, अनुज भोसले या अ‍ॅकॅडमीच्या क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून नगरचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. खेळाडूंंनी अधिक मेहनत घेतल्यास त्यांचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो, असा विश्वास अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद यांनी व्यक्त केला.
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतील क्रिकेटपटूंनी विविध स्पर्धांत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा क्रिकेट कीट बॅग देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद बोलत होते. यावेळी कार्तिक नायर, अमित बुरा, अमोल तांबे, नदीम सय्यद, सर्फराज बांगडीवाला उपस्थित होते. अ‍ॅकॅडमीच्या वतीने गौरव करण्यात आलेल्या अजीम काझीने महाराष्ट्र संघाकडून मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्याने गुजरात विरुद्ध 32 चेंडूंत 39 धावा करून करी संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. 10 सामन्यांमध्ये गोलंदाजी करीत 7 बळी घेतले.
किरण चोरमले याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्याने एक शतक व एकूण 240 धावा फटकावल्या. ओंकार येवले याने केंद्रीय विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ खेलकूद स्पर्धेत पश्चिम विभागाच्या मुंबई संघाकडून प्रतिनिधीत्व करीत चांगला खेळ केला. 
अश्कान काझी याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. अनुज भोसले याची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघाकडून निवड झाली होती. त्यानेही चमकदार कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Saturday, 2 March 2019

अशोकभाऊ फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट व अ.नगर एज्युकेशन सोसायटी आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण


नगर । प्रतिनिधी - अशोकभाऊ फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट, अ.नगर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा क्रिकेट, व्हॉलीबॉल व कबड्डी असो. आयोजित अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक शालेय व खुल्या क्रिकेट, व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते व एल. टी चे महाव्यवस्थापक अरविंद पारगावकर , अ.नगर एज्युकेशन सोसायटी कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी,जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष श्री.दादाभाऊ कळमकर,व्हॉलीबॉल असो.चे एल.बी.म्हस्के, प्रकाश गांधी, अ‍ॅड. के.एम.देशपांडे, गौरव मिरीकर, हेमंत मुथा, प्रा. माणिक विधाते, प्रा.सुनील जाधव,गणेश गोंडाळ,ज्ञानदेव पांडुळे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात फिरोदिया परिवाराचे योगदान पाहता नगर शहराची नवी ओळख निर्माण होईल. क्रीडा क्षेत्राला यामुळे पोषक वातावरण झाले असून चांगले खेळाडू निर्माण होतील. लवकरच या ठिकाणी रणजी क्रिकेट सामने व्हावेत यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अरविंद पारगावकर म्हणाले की, उत्कृष्ट नियोजनाने या सर्व स्पर्धा गाजल्या असून क्रीडा क्षेत्रासाठी गौरव फिरोदिया यांनी सुरु केलेला नवा प्रवास व धोरण नगरच्या नव्हे तर राज्यातील  खेळाडूंना अत्यंत लाभदायक ठरेल. खेळाकडे वाढते आकर्षण व फिरोदिया ट्रस्टचे कार्य पाहता उद्योजकांचा यात सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविक व स्वागतात श्रीमती छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, आज खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष होत असून त्यांना खेळाकडे  आकर्षण वाढावे यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासाठी विविध खेळांच्या राज्य व जिल्हास्तरीय संघटनांनी सहकार्य केले तसेच संस्थेच्या सर्व शाळातील मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतल्यामुळे या स्पर्धा यशस्वी झाल्या.
राज्यस्तरावरील खेळाडूंना विविध क्रीडा स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा क्रिकेट असो.व संघटनेतर्फे प्रा.माणिक विधाते,गणेश गोंडाळ, विजय म्हस्के, शैलेश गवळी यांनी गौरव फिरोदिया यांचा विशेष सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केले तर आभार अ‍ॅड.गौरव मिरीकर  यांनी मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी  रावसाहेब बाबर, कैलास साबळे, संजय विटनोर, मंगेश उपासनी, प्रमोद रामदिन कैलास करपे, प्रीतम जाधव, आकाश थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत अनुष्का काटे प्रथम


नगर । प्रतिनिधी - अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल येथे झालेल्या राज्यस्तरीय अलोहा अ‍ॅबॅकस स्पर्धेत कर्नल परब स्कूलची इ.2रीची विद्यार्थिनी अनुष्का काटे हिने लेव्हल 1-ग्रुप 1 मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. अनुष्का ही अलोहा अ‍ॅबॅकस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या नगरमधील आनंद अ‍ॅकेडमीच्या केंद्रात अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण घेत आहे. अनुष्काने नगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत 5 मिनिटात 70 पैकी 69 गणिते सोडवून प्रथम क्रमांक मिळविला.
अनुष्का ही जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ.सीमा व अजयकुमार काटे यांची कन्या असून, तिने आतापर्यंत इंग्रजी व गणित ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. तिला आई सौ.सीमा, आर्मी स्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ.संगीता काटे आणि आनंद अ‍ॅकेडमीच्या संचालिका सौ.सुरेखा लोढा यांचे मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत नासिक, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, श्रीरामपूर आणि नगरमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात सर्वात छोट्या अनुष्काने हे नेत्रदिपक यश मिळविले. छोट्या वयात इतके यश मिळविल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tuesday, 26 February 2019

पोलीस भरतीत होणार प्रथम लेखी परीक्षा


नगर । प्रतिनिधी- पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आता प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, असे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर बुध्दिमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता, पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान होणार्‍या दुर्घटनना या बाबी विचारात घेऊन राज्य शासनाच्या गृह विभागाने नुकताच एक आदेश काढला आहे. त्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणार्‍या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमदेवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येणार असल्याने भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. त्यामुळे जिल्ह्याबारहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केेलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल.

Monday, 25 February 2019

इंडस वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थांचा सर्वांगीण विकास ः यादव


नगर । प्रतिनिधी - इंडस वर्ल्ड स्कूलच्या माध्यमातून वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमामुळे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षीत यादव यांनी केले. 
इंडस वर्ल्ड स्कूलच्या इंडोत्सव 2019 चे उद्घाटन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संचालक विनायक देशमुख, प्रभारी प्राचार्य कविता सुरतवाला, विविध विषयांच्या शिक्षकांबरोबरच क्रीडाशिक्षक व पालक उपस्थीत होते. प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
गतवर्षी दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रोहन साळुंके व अमित चव्हाण, मुलींमध्ये प्रथम आलेल्या ज्ञानदा मानेराव यांना स्व. सुधाकर देशमुख, स्व. भाऊसाहेब कर्डिले, स्व. रामचंद्र धस यांच्या स्मरणार्थ व प्रथम प्राचार्य प्रगती कपूर यांच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात आली. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार आदित्य मिरगणे यास देण्यात आला. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या यशश्री शेळके, मंदार म्हस्के, वरूण शेटे, ध्रुव वाघ, आदेश शेवाळे, अब्दुल शेख, ओम स्वामी, सार्थक गोरे, तेजस्विनी मिरगणे यांचा विषेश सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी ध्रुव वाघ, श्रद्धा ठाकूर, ब्युटी सिंग, समृध्दी गांधी यांनी केले.

सीएस फाऊंडेशन परीक्षेत निहारिका राक्षसभुवनकर भारतात 20 वी


नगर । प्रतिनिधी - कंपनी सेक्रेटरी (सचिव) अभ्यासक्रमाच्या फाऊंडेशन परीक्षेत नगरच्या निहारिका सुधीर राक्षसभुवनकर हिने देशात 20वा क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला आहे. येथील लोढा हाईटस्मधील एफ.सी.ए.चे सीए पवनकुमार, दरक सर व सीए शबनम हरदवानी यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दि कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला. 
देशभरातील 80 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून 62.11% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निहारिकाचे शालेय शिक्षण श्री समर्थ विद्या मंदिर येथे झाले. निहारिका सारडा कॉलेजमध्ये प्रथम वर्षासाठी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे.

Wednesday, 20 February 2019

योग्य मार्गदर्शन मिळाल्यास युवक नाव कमावतील


नगर । प्रतिनिधी - आजचा युवक हा मोबाईल आणि सोशल मीडियावरच अ‍ॅक्टीव्ह असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातून या युवकांना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठी या युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नाव कमावू शकतात. त्यांना विविध स्पर्धा परीक्षा, मैदानी खेळ, सामाजिक दायित्व याकडे वळविणे गरजेचे आहे. कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे. या स्पर्धेत राज व शिवराज याने मिळविलेल्या यशामुळे नगरचे नाव राज्यपातळीवर चमकमविले आहे, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. राज व शिवराज पुढील स्पर्धेत नगरचे नाव कुस्ती क्षेत्रात निश्चित उंचावतील, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. 
पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज संजय जाधव व शिवराज रावसाहेब कार्ले यांनी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नंदनवन उद्योग समुहाचे संजय जाधव, दत्ता जाधव, संजय वाल्हेकर, वैजिनाथ लोखंडे, चिकू सरोदे आदी उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले, नगरमध्येही अनेक गुणवंत खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या खेळाने नगरचे नाव सर्वदूर पसरविले आहे. राज व शिवराज यांच्या राज्यस्तरीय यशामुळे ते पुढील स्पर्धाही चांगल्यापद्धतीने खेळून राष्ट्रीय स्तरावर चमकतील. या खेळाडूंना आमचे प्रोत्साहन राहील, असे सांगितले.
इंजिनिअर डिप्लोमा स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने पंढरपूर येथे या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज जाधव याने 61 किलो वजन गटात तर शिवराज कार्ले याने 85 किलो वजन गटात यशस्वी झुंज देत गोल्ड मिळविले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Monday, 18 February 2019

कराटे खेळाने मुलांच्या आत्मविश्वासात वाढ ः शेख


नगर । प्रतिनिधी - कराटे असा खेळ आहे, यात शरीरराबरोबरच मानसिक स्वाथ्यही चांगले राहते. मुलांच्या बौद्धीक विकासातही त्याचा चांगला उपयोग होत असल्याने मुलांनी मैदानी खेळाला महत्व दिले पाहिजे. विशेषत पालकांनी मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. खडतर परिश्रम करुन विद्यार्थ्यांनी आज विविध बेल्ट मिळविले आहेत. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागून त्याचा पुढील आयुष्यात मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.
वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांच्या हस्ते बेल्ट प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रशिक्षक रमजान शेख, अब्दुल शेख, तन्वीर खान, ईशान होशिंग, बिलाल शेख, राहुल वाघ, सोनल मिश्रा, साक्षी होशिंग, आदिती जाधव आदी उपस्थित होते.यलो बेल्ट माही खवाळे, विधी गुंदेचा, ऑरेंज बेल्ट तनवी वारुळे, मनवा सोनवणे, अदित्य खाडे, स्नेहल धामणे, वैभव भांबरे, हर्षद खराडे, कृष्णा कोरडे, अभिनव काकडे, चिराग शिंगवी, यशश्री कोरडे, श्रीजन विश्वकर्मा, विराज कांबळे, आर्यन गोरे, तन्वी घीगे, ग्रीन बेल्ट उदय त्रिंबके, जोयेसी डिसुझा, साक्षी पवार, वैष्णव खराडे, देवांग सोनी, अध्यायन पाचारणे, अदित्य साठे, ओंकार माने, अदित्य दरेकर, सिद्धार्थ थोरे, आदित्य केदारी, ओम गायकवाड, सेजल कटारिया, ब्ल्यू बेल्ट ओम पेटकर, अनुष्का कांकरिया, वैष्णवी भांबरे, विशाल थोरे, उमेश फटांगरे, तन्वी जाधव, प्रिती जेठे, वेदिका गांधी, पर्पल बेल्ट सोहम गुंड, श्लोक शिंदे, वैभवी सोनी, ओमराज कदम, अदित्य भोसले, तुळशीदास सोंडगे, मयंक दिवटे, करिष्मा क्षत्रिय, ओम बेंडाळे, ब्राऊन बेल्ट शायलिन पाचारणे, यश कोलते, गोल्डन ब्राऊन बेल्ट साम्यक मुनोत, सई दरेकर, स्वयंम गांधी, हसनैन शेख, ओंकार शिंदे, प्रतिक व्यवहारे, कार्तिक निक्रड, आयुष कानडे, ब्लॅक बेल्ट तेजश्री वारुळे, अर्पिता शिंदे, आयान सिंग, इशिता झंवर, अद्वैवत पुुंड, यश तासतोडे, फस्ट डेन मयूर माने, पार्थ चंदे, सेकंड डेन रुची बोगावत आदींनी यश मिळविले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्त खेळाडूचा कास्ट्राईबच्या वतीने गौरव


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत राहुल थोरात याने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल त्याचा कास्ट्राईब महासंघाच्या वतीने गौरव करण्यात आला. कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या हस्ते राहुल थोरातचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य उपसचिव प्रा.निवृत्ती आरु, राज्य उपसचिव के.के. जाधव, जिल्हा सरचिटणीस सुहास धिवर, विजय भांबळ, दत्ता रणसिंग, वसंत थोरात, मुस्ताक शेख, शकुंतला सुर्वे, रंजना गोसावी आदि उपस्थित होते.
नुकतीच 64 वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा बंगलोर (कर्नाटक) येथे पार पडली. महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना राहुल थोरात याने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत थोरात यांचा तो नातू असून, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता 9 वी मध्ये शिकत आहे. एन.एम. पवळे म्हणाले की, राहुल थोरात याने राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्ह्याचे नांव उंचावले आहे. 
खेळाडूंना प्रोत्साहन व पाठबळ दिल्यास ते निश्चित उत्तम कामगिरी करीत असल्याचे सांगून, त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

अझीम काझी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात


नगर । प्रतिनिधी - हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकेडमीचा खेळाडू अझीम काझी याची बीसीसीआयअंतर्गत सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात निवड झाली आहे. तब्बल 15 वर्षांनी या संघात अनुपम संकलेचा नंतर अहमदनगरमधील काझी याची निवड झाली आहे. तसेच किरण चोरमले याची पश्चिम विभागीय 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. अहमदनगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ. अरुण जगताप यांनी या निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकेडमीमध्ये उच्च प्रशिक्षण, मार्गदर्शन दिले जात असल्याने येथून अष्टपैलु खेळाडू निर्माण होत आहेत. यापुढेही अ‍ॅकेडमी खेळाडूंना मार्गदर्शन देत राहिल.